संत कबीर निरुपण Sant Kabir Nirupan...भाग २- Read right Now


कबीर गुरुसाहेब दोहा...भाग २


जंत्र मंत्र सब झुठ है, मति भरमो जग कोय I

सार शब्द् जाने बिना, कागा हंस न होय Il


भावार्थ :- 


आगमामध्ये आणि निगमामध्ये विविध यंत्र आणि मंत्राची इतकी रेलचेल आहे की, हया यंत्रांचा आणि मंत्रांचा अभ्यास करताना  मनुष्याच्या मनामध्ये ते परम गतीस नेण्यास कारण असल्याबाबत साहाजिकच बुध्दीभ्रम निर्माण होवून जातो. आणि तो त्यामध्येच गुंतून पडतो. ज्यायोगे मूळ ध्येयापासुन तो वंचित रहातो.


अशा बुध्दीभ्रमास बळी पडलेल्या मनुष्यांसाठी संत कबीर साहेबजी  हया दोहयातुन मोलाचा उपदेश करतात की, हे विविध प्रकारचे यंत्र आणि मंत्र सर्व खोटे आहे. त्यामुळे मनुष्य  मनामध्ये विनाकारण बुध्दीभेद होतो. कोणतेही यंत्र आणि मंत्र योगे मनुष्याचे आत्म्यास परम गती प्राप्त होवू  शकत नाही. जगामध्ये परम गतीस नेण्यासाठी मनुष्य जीवाला मायेच्या आणि अज्ञानाच्या आवरणाखाली दडलेल्या स्वत :च्या आत्म्याचे ज्ञान होणे अत्यंत आवश्यक  आहे. हे आत्मज्ञान झाले तरच माया आणि अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या पापी  मनुष्याच्या जीवास शुध्द आत्मस्वरुप प्राप्त होईल. याशिवाय मोक्षाचा मार्ग जगात उपलब्ध नाही.


हया ठिकाणी कावळा हा शब्द् भोग विलास लिप्त पापी जीवासाठी  प्रतीक म्हणुन वापरला आहे. तर हंस हा शब्द आत्म्याचे परम ज्ञान प्राप्त झालेल्या जीव जो शुध्द आत्म्यात परिवर्तित झाला आहे त्यासाठी प्रतीक म्हणुन वापरला आहे.


---------------------------------------


बिरछा कबहुं न फल भखै, नदी न अंचवै नीर I

परमारथ के कारने, साधु धरा शरीर Il

भावार्थ :- 


ज्याप्रमाणे वृक्ष कधीही स्वत: ला लगडलेल्या फळांचे भक्षण करीत नाही. तसेच नदी कधीही ती प्रवाहित करुन नेत  असलेल्या जलाव्दारे स्वत: ची  तृष्णा शांत करीत नाही. तदवतच साधुने जगाचे परम तत्वाचा अर्थ सर्वसामान्य माणसांना समजून, त्यांचा उध्दार व्हावा हया हेतुने शरीर धारण केलेले असते असे कबीर साहेब हया दोहयातुन आपल्याला सांगतात.


वरील दोहयाचे अवलोकन केले असता दिसुन येते की, संतांची विभुती जगाच्या कल्याणाकरीता असतात .  साधु स्वदेहाचे कल्याण कधीच साधत नाही. याचाच अर्थ आपल्या आजूबाजुला जो साधु किंवा सज्जन स्वत:साठी  जगत असेल किंवा स्वदेहाच्या भोगविलासात लिप्त असेल तो साधु नसुन ढोंगी आहे आणि असा साधु काय परमार्थ ज्ञान देणारॽ म्हणुन आपली नैतिक,मानसिक, आर्थिक ,  शारीरिक आणि सामाजिक फसवणुक टाळणेसाठी  अशा लोकांपासुन आपण चार हात लांबच राहीलेले बरे असाही सल्ला हया दोहयातुन मिळतो. अप्रत्यक्षपणे हया दोहयातुन बुवाबाजी आणि अंधश्रध्देपासुन दुर रहाणेविषयीचे उपदेशात्मक्‌ कार्य कबीर साहेबांकडून अप्रत्यक्षपणे साधल्या गेले आहे. पण समाजाचे कान तेव्हाही बहिरे होते. आजही बहीरेच आहे. उपदेशातुन बोध् घेणारा एखाद दुसराच असतो. पण त्याला देखील वेडा म्हणुन शिक्केमोर्तब केल्या जाते हीच शोकांतिका आहे.


---------------------------------------


ज्ञानी अभिमानी नही, सब काहू सो हेत I
सत्यवान परमार थी, आदर भाव हेत II

भावार्थ :- 


ज्याला जगाच्या परम सत्याचे ज्ञान झालेले आहे, असा आत्मज्ञानी मनुष्य् कधीही अभिमानी असुच शकत नाही. कारण आत्मज्ञान झाल्यावर अहंकार अभिमान अशा मनुष्याचे ठायी राहूच शकत नाही. त्यांचे मनामध्ये सदैव सर्वांचे हिताचाच विचार असतो. अशा व्यक्ती नेहमी सत्याच्या मार्गावरच पथाचरण करणा-या असुन, सर्वाविषयी त्यांचे मनामध्ये आदरभाव कायम असतो. सदरचा दोहा हा ज्ञानी मनुष्याची लक्षणे वर्णन करणारा आहे. ज्यामध्ये ही लक्षणे आढळून येत नाही तो ज्ञानी असुच शकत नाही. संत कबीरांचे दोहे वाचनातुन मनुष्याला भौतिक आणि अध्यात्मिक फसवणुक टाळून, निर्धोक अध्यात्मीक मार्ग क्रमण करणे सहज शक्य आहे.   


---------------------------------------


शब्द् सम्हारे बोलिये, शब्द के हाथ न पांव I
एक शब्द औषधि करे, एक शब्द करे घाव II

भावार्थ: 


आपण जे काही बोलतो, ते बोलताना शब्दांचा वापर जपून करावा असा सल्ला हया दोहयातुन संत कबीर साहेबांनी आपल्याला दिला आहे. ते हया दोहयातुन म्हणतात की, शब्दांना हात पाय नसतात. पण हेच शब्द दु:खीतांना दिलासा देण्यासाठी वापरल्यास औषधीचे काम करतात. आणि फुट पाडण्यासाठी वापरल्यास लोकांच्या मनामध्ये जखमाच निर्माण करतात. सबब मोजके आणि मार्मीक बोलावे. जेणेकरुन शब्दांव्दारे योग्य परिणाम साधल्या जावून विधायक व्यक्ती आणि  समाजनिर्मिती होईल. राष्ट्रहितास बाधक होईल असे बोलू नये.


---------------------------------------


करता था तो क्यों रहा, अब करि क्यौं पछताय I
बोवै पेड बबूल का, आम कहां ते खाय I

भावार्थ : 


वारंवार वाईट कामे करणा-या मनुष्याला हया दोहयातुन संत कबीर साहेब म्हणतात की, तुला वारंवार समजावून देखील तु करीत असलेल्या वाईट कृत्यांपासुन कधीही परावृत्त झाला नाहीस. मग आताच  कां तु वाईट कामे करण्याचे थांबविले आहेस ॽ आता कां तुला तुझ्या कृत्यांबाबत पश्चात्ताप वाटतो आहे. कारण तु केलेल्या वाईट कृत्यांचे वाईट फळे तुला आता भोगायला मिळत आहे म्हणुन ॽ


जर मनुष्याने बाभळीचे झाड लावले तर त्याला काटेच येणार ना ? बाभळीच्या झाडाला मधुर आंबे लागुन, त्यांची गोड चव चाखायला मिळेल अशी अपेक्षा करणेदेखील चुकीचे आहे. आपण जसे कर्म करु तसेच त्याचे फळ आपणांस भोगण्यासाठी येणार. चांगल्या कामांचे चांगलेच फळ मिळेल आणि वाईट कामांचे सदैव वाईटच फळ मिळणार. यात कधी बदल होत नाही. म्हणुन सदैव चांगली कर्म करीत रहावी. यातच कल्याण आहे.


---------------------------------------


कहता हूं कहि जात हूं, कहूं बजाये ढोल I
श्वासा खाली जात है, तीन लोक का मोल II

भावार्थ : 


कबीर महाराज म्हणतात की, मी सांगतोय. मी ढोल वाजवू वाजवू सांगत सुटलोय की, एक एक श्वास निरर्थक जात आहे. जे अत्यंत मौल्यवान आहेत. तिन्ही लोकांचे (स्वर्ग, पृथ्वीलोक आणि पाताळ)  मोल प्रदान करुनही गेलेले  श्वास कधी परत मिळत नाहीत. म्हणुन श्वास असेपावेतो त्यांचे सार्थक करुन घ्यावे. वेळ वाया घालवू नये.


हया दोहयांमधील गुढाचा भाग असा आहे की, ईश्वराकडून प्रत्येक प्राणीमात्राला ठराविक श्वासांची संख्या नेमून दिलेली आहे. जो मनुष्य् ईश्वराचे नामस्मरणात लीन रहातो त्याला अधीक श्वास वापरण्याची गरज पडत नाही. शिवाय प्रत्येक श्वास सत्कारणी लागत असल्याने तो मनुष्य देह प्राप्तीचे मूळ कारण असलेले ईप्सित ध्येय  हया जीवनातच प्राप्त करतो.थोडक्यात काय तर मनुष्याने कासवाप्रमाणे योगी होवून रहावे. जो अत्यंत कमी श्वास वापरतो. त्यामुळे सर्वात दीर्घायुष्य भोगतो.   पण जो मनुष्य भोगी ,विलासी ,चंचल आणि  स्वैर जीवन जगतो तो अत्यंत जलद गतीने श्वास वापरुन, लवकरच तो मनुष्य  देह यात्रा संपवून मृत्यूपंथास जातो.ससा आणि माकड हे असेच भोगी मनुष्याचे प्रतिकात्मक रुप आहे. जे जलद आपली नियत श्वास संख्या पुर्ण करतात. परिणामी श्वासाअभावी अवेळी मृत्यूपंथास जातात.   अशा प्रकारे भोगी मनुष्य वारंवार हया जीवन मरणाच्या चक्रात अडकून रहातो. पण हे कुणाच्याच ध्यानात येत नाही. कुणी त्याकडे लक्ष देत नाही. मनुष्य  देह कां मिळाला ॽ हे विसरुन सर्व इंद्रियांची तृष्णा भागविण्यात गर्क आहेत.


---------------------------------------


गुरु लोभी शिष लालची, दोनो खेले दांव I
दोनो बूडें बापुरे,चढि पाथर की नांव II

भावार्थ : 


ज्या गुरुचे मनीचा लोभ सुटला नाही. आणि ज्या शिष्याच्या मनातली लालसा संपली नाही. असे गुरु आणि शिष्य एकमेकांकडून आपले लक्ष गाठण्यासाठी वारंवार डावपेच करतात. युक्त्या प्रयुक्त्या लढवितात. अशा गुरु आणि शिष्यांचे कल्याण कसे होईल ॽकारण लोभ, लालसा ही सर्व मायेच्या कक्षेतील विपदा आहेत. ज्यांची मायाच सुटली नाही त्यांचे मनातुन अज्ञान संपुष्टात येणार नाही. अज्ञान संपुष्टात आल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञान प्राप्तीशिवाय हा भवसागर तरुन मोक्षपदाला जाता येणार नाही.


म्हणुन संत कबीर साहेबांनी लोभी गुरु आणि लालची शिष्यांचे वर्णन दगडाच्या नावेतील प्रवासी असे केले असुन,  त्यांची नौका कधीही भवसागर पार होणार नसुन, ती मध्येच काळमुखी बुडणार असल्याचे सांगतात.  जे गुरु आपल्या शिष्यांना केवळ भौतिक कामनांच्या पूर्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतात. आणि शिष्य् देखील अशा मार्गदर्शनातच धन्य होतात ते गुरु आणि शिष्य हया प्रकारात मोडतात.त्यांची अध्यात्मिकता ही केवळ मुलामा असुन, प्रत्यक्षातला प्रकार मात्र वरुन किर्तनासारखा दिसत असला तरी आतुन तमाशाप्रमाणे वेगळाच असतो.


---------------------------------------


कामी लज्जा न करै, मन मांही अहलाद I
नींद न मांगै साथरा, भूख न मांगे स्वाद II

भावार्थ :- 


कबीर साहेब म्हणतात की, कामवासनेच्या अधीन असलेल्या व्यक्ती, कामवासनेची शांती करणेसाठी कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही. निद्रा आल्यावर त्यास अंथरुणाची देखील गरज रहात नाही. त्याला दगडावर देखील झोप येते. तसेच जोराची भुक लागल्यावर बेचव अन्न देखील मनुष्य ग्रहण करतो. सांगायचे तात्पर्य असे की, वेळ आल्यावर मनुष्य आहे त्या परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेतो.


---------------------------------------


सूम थैली अरु श्वान भग दोनो एकसमान I
घालत मे सुख ऊपजै, काढ निकसै प्रान II

भावार्थ : 


कबीर महाराज म्हणतात की, कंजूष व्यक्तीची थैली आणि श्वानाचे शिश्न यांना एकसारखेच समजावे. कारण कंजुष व्यक्ती पैसे मिळाल्यावर आपल्या थैलीत भरताना अत्यंत उतावीळपणे व आनंदाने भरतो. तसाच कुत्रा देखील मैथुन करताना अत्यंत अधाशीपणे मैथुनरत होतो. पण ज्यावेळी कंजुष व्यक्तीला त्या थैलीमधुन पैसे काढून देण्याची वेळ येते त्यावेळी कुत्र्याला आपले शिश्न मैथुन संपल्यावर काढताना जो जीवघेणा त्रास होतो तसाच त्रास होतो. थोडक्यात मायेप्रती आसक्तीभाव ठेवून दु:खच वाटयाला येते. जे हया दोहयातुन वर्णन केले आहे.


---------------------------------------


सांच बराबर तप नही, झुठ बराबर पाप I
जाके हिरदे सांच है, ताके हिरदे आप II

भावार्थ : 


सत्य बोलणे आणि सत्यमार्गावर चालणे यासारखे श्रेष्ठ् तप नाही.  खोटे बोलण्यासारखे मोठे पाप नाही. ज्याच्या हृदयामध्ये सत्यता वास करुन असते, त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास असतो. म्हणुन सत्यवचनी आणि आचरणी व्यक्ती ईश्वरासमान पुजनीय असतो.


---------------------------------------


गुरवा तो सस्ता भया, पैसा केर पचास I
राम नाम धन बेचि के, शिष्य करन की आस II

भावार्थ :- 


रामनामाची विक्री करुन, शिष्यांकडून पैसे मिळविण्याची कामना करणारे गुरु तर जगात भरपूर आहेत. त्यांची किंमतही ठरलेली आहे. असे गुरु वारंवार लोकांना ठकविण्याचे मार्ग शोधतच असतात. अशा लोभी गुरुंपासुन शिष्यांनी सावध राहीले पाहीजे असे संत कबीर साहेब हया दोहयातुन सांगतात.


---------------------------------------


दीप कू झोला पवन है, नर को झोला नारिI
ज्ञानी का झोला गर्व है, कहै कबीर पुकारि II

भावार्थ :- 


संत कबीर म्हणतात की, दीपकाला पवन विझवितो. पुरुषाच्या पतनाला  परस्त्रीची अभिलाषा कारण ठरते. ज्ञानी मनुष्याच्या ज्ञानाचा नाश अहंकाराने होतो. म्हणुन वादळात दिपक लावू नये, परस्त्रीची कामना बाळगू नये. आणि ज्ञानियाने कधीही अहंकारास बळी पडू नये. हया गोष्टी मनुष्याने सदैव लक्षात ठेवून आचरण केले पाहिजे. 


---------------------------------------


पांच तत्व का पूतरा, रज बीरज की बूंद I
एकै घाटी निसरी, ब्राम्हण क्षत्री सूद II

भावार्थ :- 


संत कबीर म्हणतात की, रज-वीर्याच्या एका थेंबातुन पंच महाभुतांच्या तत्वांच्या संयोगातुन बनलेल्या मनुष्यास काय माहिती की, ब्राम्हण,क्षत्रिय, आणि क्षुद्र हया जाती वेगळया नसुन एकच आहेत. आणि सर्वांच्या ठायी परमात्म्याचा निवास आहे. कारण जाती मनुष्याने बनविल्या परमात्म्याने नाही. परमात्म्याच्या दृष्टीने मनुष्या मनुष्यात कोणताही भेद नाही. मग मनुष्याने तरी असा भेद का पाळावा ॽ. संत कबीरांनी त्या काळातही जातिव्यवस्थेबाबत केलेले हे विवेचन अत्यंत परखड आणि मार्मिक आहे. आधुनिक काळात जगात कोणत्याही कोप-यात बोललेल्या एखादया व्यक्तीचा ध्वनी अवघ्या विश्वात गुंजण्यास वेळ लागत नाही. भौतिक साधनांव्दारे आपण सगळया जगाला एक बनवलंय. हया पासुन मानवाने बोध घेवून मानवता हा एकच विश्वधर्म मानायला हवा. यातच समस्त विश्वाचे कल्याण आहे. नव्हे तर ती काळाची व आपलीही गरज बनत चालली आहे.तन मन लज्जा ना रहे, काम बान उर सालI
एक काम सब वश किए, सुर नर मुनि बेहाल II

भावार्थ : 


कबीरजी म्हणतात की, ज्याचे हृदय काम वासनेच्या बाणाने घायाळ झालेले आहे, त्याचे शरीर आणि मनामध्ये लज्जा नामक कोणतीही गोष्ट शिल्लक रहात नाही. हया काम वासनेने देव, मनुष्य्, मोठ मोठे मुनि हया सगळयांना वश करुन, त्यांचे अध:पतन केलेले आहे. वास्तविक कामवासना अत्यंत क्षणभंगुर बाब आहे. हया मिथ्या इंद्रियभोगातुन कुणालाही सुखप्राप्ती होत नाही. खरे सुख केवळ आत्म्यातच लाभू शकते. तरीही कामवासनेने अध:पतन झालेल्यांची प्राचीन ग्रंथांमधील यादी तर फार मोठी आहेच. पण आधुनिक युगातही हे कामवासनेचे गारुड लोकमनावरुन उतरायचे नांव घेत नाही. याऊलट आधुनिकतेमुळे नैतिकता अधिकच लोप पावून, कामवासना शांतीसाठी कोणताही विधिनिषेध उरलेला नाही. तात्पर्य मानवी जीवनात कामाचे स्थान हे भोग म्हणुन न रहात योग म्हणुन ठेवावे. जेणेकरुन नैतिकता टिकून राहील. मनुष्य हा विचारशील प्राणी असल्याने मनुष्यजीवनात नैतिकचे स्थान फार मोठे आहे.


---------------------------------------


साहिब तेरी साहिबी, सब घट रही समाय I
ज्यों मेहंदी के पात में, लाली लखी न जाय II

भावार्थ : 


संतश्रेष्ठ कबीर साहेब हया दोहयात म्हणतात की, हे परम परमेश्वरा, तुझे परमतत्व सर्व अणु रेणु, सजीव निर्जीव यांना व्यापुनही उरलेले आहे. तु आत्म्यांचाही आत्मा आहेस. आपणा्स ज्ञात असो वा नसो आम्ही नेहमी त्याच्याच स्वरुपात अस्तित्वात असतो. त्याच्यातच सगळी हालचाल आणि सगळी कार्ये करीत असतो. ज्याप्रमाणे हिरव्याकंच मेहंदीच्या पानांमध्ये लपलेली लाली जशी सर्वसामान्यांना नजरेने ओळखू येत नाही.त्याप्रमाणे तुझे स्वरुप जाणावयाचे झाल्यास हया पापी नरदेहाने हे शक्य नाही. तुझ्या स्वरुपाबाबतची अंधुकशी जाणीव देखील मंत्रमुग्ध करुन जाते. हेच तुझे थोरपण आहे.त्या ईश्वराचे स्वरुप ज्ञातही नाही वा अज्ञातही नाही. या दोन्हीपेक्षा तो अनंत पटीने श्रेष्ठ आहे. या विश्वात तो जर आनंदस्वरुप बनून ओतप्रोत भरुन राहिलेला नसता तर येथे कोण क्षणभर तरी जगू शकला असता ॽ क्षणभर तरी श्वासोच्छवास करु शकला असता ?

--------------------------------------------


जाप मरे,अजपा मरेख् अनहद भी मर जाये I

सुरति समानी शब्द् में, ताकों काल न खाये I

अर्थ : 


सर्व वाणींच्या पलीकडे जावे. श्वासांची गती थांबावी. हृदयाचे ठोकेचुकावे. स्थिती साक्षीभावाने निर्विकार व्हावी. अशा पराच्याही पुढील निगमवाणी जी अव्यक्त् रुपात अणु रेणुत प्रकृती पुरुषाच्या रुपात विदयमान आहे. अशा निशब्द् धारकाला काळ मारु शकत नाही. तो सदेह अमर असतो असे संत कबीर साहेब हया दोहयात मानवाला सांगतात.


-------------------------------------------


 कबीर बैरी सबल है, एक जीव रिपु पाँचI

अपने अपने स्वाद को , बहुत नचावै नाच I


अर्थ : 


संत कबीरदासजी म्हणतात की, हे मनुष्या तु सावधान रहा. कारण तु एकटा जीव आहे. आणि तु जो हा देह धारण केला त्यास पांच इंद्रिये आहेत. एकवेळ तुला असे वाटेल की, ते तुझे मित्र आहेत. कारण जीभ तुला सेवन करावयाच्या पदार्थांची चव कशी आहे याचे ज्ञान करुन देते.बोलायचे कसे ते शिकविते.  डोळे तुला हे जग कसे आहेॽ हे दाखविते. कान तुला कोण् कोण् काय बोलतो आहेॽ हे सांगतात. नाक तुला विविध प्रकारच्या पदार्थांच्या गंधाची ओळख करुन देतात.तसेच हा देह जगविण्यासाठी आवश्यक् तो प्राणवायू श्वासांच्या रुपाने घेतात.  त्वचा स्पर्शाची संवेदना सांगुन जाते. पण हेच तुझे खरे शत्रु आहेत. 


जे आपली लालसा पुर्ण करणेसाठी तुला लाभलेल्या दुर्लभ मनुष्य् देहाला विविध प्रकारची प्रलोभने दाखवून, तुला त्यांच्याच मोहामध्ये गुंतवून ठेवतात. तुझ्याकडून हवी तशी कर्म करवून घेतात. तुला नाच नाच नाचवतात.  ज्यामुळे  तु हया जगात कशासाठी आलास ॽयाचे तुला आता भानच राहीले नाही. म्हणुन तु त्यांचे दास्यत्व् सोड. आणि हया ईंद्रियांना तु आपला दास बनव, गुलाम बनव. त्यामुळे ज्या ध्येयाच्या पुर्तीसाठी  तु हया जगात हा मनुष्य् देह धारण करुन आलास, ते ध्येय प्राप्त् करणे सुलभ होईल.


कबीर साहेबांचा हा दोहा बारकाईने वाचला असता आपल्या ध्यानात यायला हवे की, आपले इंद्रियांचे चोचले पुरविणे मनुष्याच्या भौतिक आणि त्यापेक्षाही जास्त् अध्यात्मिक प्रगतीस घातक आहेत. जीभेला आवडते म्हणुन जास्त् साखर खाल्ली तर मधुमेहाचा धोका आहे. मधुमेह झाल्यास आयुष्य् कमी होते. जीभेला आवडेल असे मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही शरीराचेच नुकसान होते. परिणामी लवकर शरीराचे विघटन होते. डोळयांना आवडेल ते बघण्यास दिले तर माणसाचे नैतिक अध:पतन होते. कानाला स्तुती आवडते म्हणुन जर स्तुतीच ऐकत राहिले तर आपल्यातील उणीवा कशा समजणार ॽ थोडक्यात काय तर इंद्रियांना आवडणा-या गोष्टी पुरविण्यात आत्म्याचे अहीत आहे आणि ते आपण टाळले पाहीजे तरच मानवाचे पर्यायाने आत्म्याचे  भौतिक आणि अध्यात्मिक कल्याण होईल. हया दृष्टीने कबीर साहेब म्हणतात, मानवाची इंद्रियेच मानवाचे शत्रु आहेत. त्यामुळे मानवाने त्यांचे दास्यत्व् न स्विकारता. हया इंद्रियांनाच मानवाने दास केले पाहीजे तरच या मनुष्य् देहात जन्माला येवून, काहीतरी साध्य करता येईल . 


----------------------------------


प्रेम बिना धीरज नही, बिरह बिना बैरागI

सतगुरु बिना मिटते नही, मन मनसा के दाग I

अर्थ :- 


ज्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही, तो संयमाचा- धैर्याचा अर्थ समजू शकत नाही.संयम अथवा धैर्य काय असतेॽ हे जाणुन घ्यायचे असेल तर मनामध्ये प्रेम निर्माण होणे आवश्यक् आहे. तसेच विरहाची वेदना विरहामुळे ज्याला वैराग्य् आलेले आहे तोच सांगू शकतो. जो विरहाच्या वेदनेमध्ये घायाळ नाही तो वैराग्याचे बखान करु शकत नाही. वैराग्य् काय असते हे सांगु शकत नाही.  ज्याप्रमाणे प्रेम आणि धैर्य/संयमाचा आणि विरह-वैराग्याचा परस्पर् संबंध आहे. तसाच संबंध सदगुरु आणि शिष्याचे हृदयादरम्यान प्रस्थापित झालेला असतो. सदगुरुंच्याशिवाय हया जगामध्ये शिष्याचे मनातील ईच्छा-आकांक्षा-मोह-लालसेचे- संकल्प् विकल्पाचे  डाग कुणीही मिटवू शकत नाही. ही किमया फक्त् आणि फक्त सदगुरु महाराजच करु शकतात असे संत कबीर साहेबांनी हया दोहयामधुन सांगुन, सदगुरु महाराजांचा महिमा वर्णन केलेला आहे. अशा परम अविनाशी सदगुरु महाराजांचे चरणपादुकांना माझा शतश: प्रणाम. 


_________________________कागत लिखे सो कागदी,  को व्यहारि जीवI

आतम द्रिष्टी कहां लिखै, जित देखो तित पीवI

अर्थ :- 


शास्त्र आणि पुराणे हयामधील मजकूर हा केवळ वेदांच्या आधारावर लेखकाने केलेला लेखनप्रपंच आहे. तो साधनेअंती - आत्मज्ञाना अंती जीवाला आलेला व्यावहारिक अनुभव थोडाच आहे. किंवा लिहीणा-याने त्या मजकूराचा प्रत्यक्षपणे अनुभव देखील घेतलेला असतो की नाही कुणास ठाऊक ॽ. म्हणुनच कबीर महाराज म्हणतात की, आत्मदृष्टी जागृत झाल्यावर प्राप्त् झालेला परमात्म्याचा अनुभव हा कुठेही लिहीलेला रहात नाही. कारण बघणा-याला जिकडे पहावे तिकडे परमात्माच दिसतो. मग लिहीण्याच्या कोण फंदात पडेल हो.  परमात्म्याचे स्वरुप पहात रहाणे हा एक पुर्ण परमानंदाचा भाग आहे. तो भोगत राहण्या ऐवजी लिहीण्याचे क्षुल्लक कार्य कोण करेल कायॽ.


_________________________पर नारी पैनी छुरी मति कोई करो प्रसंग I

रावन के दश शीश गये, पर नारी के संग  I

अर्थ :- 


परस्त्रीशी संबंध ठेवणे ही बाबच मुळी अनैतिक आहे. म्हणुन संत कबीरजी म्हणतात की, परस्त्री ही एखादया धारदार सुरीसारखी आहे. तिच्याशी कोणताही रतिप्रसंग अथवा संबंध ठेवण्याचा विचारही मनात आणू नये. जिथे रावणासारख्या महापराक्रमी, बुध्दीमान- नितीवान राजाला परस्त्रीच्या अभिलाषेने आपले दहा शीर गमावून, मृत्यूपंथाला जावे लागले, तिथे सामान्य् मानसाचा काय पाड ॽ


पण आधुनिक युगात संत कबीरांचे हे म्हणणे समाजमनाने अडगळीला ठेवल्यासारखे दिसते. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडले की, अनैतिक संबंधामुळे घडलेल्या अनर्थांच्या कित्येक बातम्या आलेल्या दिसतात. आज आपण राहणीमानामुळे आधुनिक झालेलो असलो तरी विचारांचे काय ॽ त्यात शुध्दता आली तर निकोप समाजमन तयार होण्यास मदत होईल. हयासाठीच कबीरांचे हे विचार गंभीरपणे आचरणात आणणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे यात शंकाच नाही.


वास्तविक नितीमत्तापूर्ण आचरण हेच विचारात परिपूर्णता आणते. आपले भौतिक जीवन आणि त्याचबरोबर अध्यात्मिक जीवन जर अंतिम ध्येयापावेतो न्यावयाचे असेल तर पारदर्शी चरित्र्यपुर्ण आचरणाची गरज आहे. व्याभिचार करुन कुणीही व्यक्ति भौतिक जीवन सुखी करु शकत नाही. तसेच अशी व्यक्ती अध्यात्मिक जीवनात कवडीचीही प्रगती करु शकत नाही.


________________________कवि तो कोटिन कोटि है, सिर के मुंडै कोट I

मन के मुंडै देख करि, ता सेग लीजय ओट I

अर्थ :- 


हया जगामध्ये उपदेश करणा-या लोकांची  कमतरता नाही. ते तर असंख्य् आहेत. याशिवाय डोक्याचे मुंडन करुन, अधिकारवाणीने वावरणा-यांची संख्याही कोटयावधीमध्ये आहे.पण पोकळ उपदेश आणि वेशाने साधु असल्याचा दिखावा कोणत्याही कामाचा नाही.  कारण ज्याने मनाचे मुंडन केले, ज्याने उधळणा-या मनाच्या वारुला काबुत आणून, त्याला अंतर्मुख केले आणि आत्मज्ञानाची प्राप्ती केली, आणि माया मोहाचा त्याग केला अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे. कारण मनाला सदविचारांनी काबूत आणण्याचे सामर्थ्य्स हजासहजी प्राप्त् होणे अवघड आहे.त्याहीपुढे त्याला अंतर्मुख करण्याचे काम अवघड आहे. अंतर्मुखी मनुष्याने देहामध्ये आत्मदृष्टीने परमात्म्याचा शोध घेतलेला असतो.आणि त्याचा माया मोह गळून पडलेला असतो, त्याला आत्मज्ञान प्राप्त् झालेले असते.  म्हणुनच अशा व्यक्तीचे श्रेष्ठत्व् संत कबीरांनी हया दोहयामध्ये वर्णन करुन, ते पुढे म्हणतात की, जर कुणाला मनाचे मुंडन केलेली व्यक्ती जर सापडली तर त्याचे शरणागत व्हा. त्याचेकडून खरे ज्ञान मिळवा आणि मानवी देह मिळाल्याचे सार्थक करा.


हया दोहयातुन जे केवळ वरकरणी अगाध ज्ञान असल्याचे ढोंग करुन, उपदेशाचे सोंग करतात, साधु असल्याचा दिखावा करुन बाहयजगात वावरतात त्यांचेकडे कोणतेही आत्मज्ञान नसते. ते संतांचा आव आणतात पण त्यांचे गुण पचवू शकत नाही.  अशा व्यक्ती केवळ इतरांना ज्ञानाचा, अध्यात्मिक अधिकाराचा दिखावा करुन, फसवितात. आणि मतलब साध्य् करुन घेतात.अशा व्यक्तीचा उपदेश आचरणात आणणे हा आत्मघात करुन घेतल्यासारखे आहे. म्हणुनच अशा पोपटपंची करणा-या बागडबिल्ल्या ढोंगी लोकांचा पर्दाफाश हया दोहयातुन संत कबीरांनी करुन, मनाचा योगी हाच खरा साधु आणि आत्मज्ञानी असल्याचे समस्त् मानवाला सांगितले आहे. आणि अशाच व्यक्तीच्या उपदेशाने जीवनाचे सार्थक होणार असल्याचे सांगून, त्यांनी केलेला उपदेश आचरणात आणणे योग्य् असल्याचे सांगितले आहे.


________________ऐसी ठाठन ठाठिये, बहुरि ना येह तन होये I

ज्ञान गुदरी ओढिये, काटि ना सखि कोये I

अर्थ :- 


संत कबीर साहेबांनी हया दोहयातुन समस्त् मानव जातील उपदेश केला आहे की, आपला वेश असा ठेवा की, पुन्हा हा देह हा मनुष्य् जन्म् नसावा. वेशात कोणताही बडेजाव न ठेवता, ज्ञानरुपी गोदडी पांघरा जी कुणीही हिसकावून घेवू शकणार नाही. कारण वेश साधा असला तरी ज्ञान असेल तर तो मनुष्य् नीतीमत्तापूर्ण  बनतो. मनुष्य् नारळाप्रमाणे आहे की बोराप्रमाणे आहे हे त्याच्या नितीवर अवलंबून आहे. जी त्वरीत ओळखण्याची कला ख-या अध्यात्मवादात आहे. अशा व्यक्तीला त्याच्यासमोर आलेल्या व्यक्तीचा पिंड कसा आहे हे ओळखता येते. त्यामुळे त्याची मानसिक, शारिरीक,आर्थिक आणि सामाजिक फसवणुक कुणीही करु शकत नाही.अशी व्यक्ती मृगजळामागे धावून जीवन निरर्थक घालवित नाही. पण केवळ वरकरणी वेशात थाटमाट आणि बडेजाव करणारी व्यक्ती आत्मज्ञानाअभावी फसवणुकीला बळी पडते. आणि सर्वस्व् गमावून बसते. 


_________________________मन मक्का, मन व्दारिका, काया कासी जानI

दस व्दारे का देहरा, तामै ज्योति पीछानI

भावार्थ :- 


देहामध्ये एकूण दहा दरवाजे आहेत. 2-डोळे, 2-कान,नाक-  2,ओठ-1,लिंग/योनि-1,गुदा-1,भृकूटीमध्य्-1 त्यापैकी स्थुल देहाचे इतर 9 दरवाजे बंद करुन, भृकूटीमध्यावरील अंत:चक्षुव्दारे (दसवे व्दार)अंतर्मुखी होवून, देहामधील ब्रम्हांडामध्ये असलेल्या पंचतत्व् आणि सुर्य-चंद्रापलीकडे परमात्मा ज्योर्तिलिंग स्वरुपात विदयमान आहे, त्याचा शोध घेतला पाहीजे.


देहातुन देहापलिकडे जाण्याचा हा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. ती योगियांसाठी देखील मरनासन्न् कसोटी आहे. हया कसोटीतुन गेले म्हणजे त्या परमात्म्याचा शोध लागेल. तेव्हा कुठे आपल्याला कळेल अरे आपण ज्याला आजवर मक्केत शोधत होतो, व्दारिकेमध्ये शोधत फिरत होतो, काशीला जावून बघण्याचा प्रयत्न् करीत होतो, तो तर आपल्या देहात बसलेला आहे. मक्का, व्दारिका आणि काशी बाहेर नसुन, ती आपल्या देहातच आहे. पण हया मरणासन्न् कसोटीतुन जाण्याचा मार्ग मनुष्याच्या स्वताकदीवर मिळत नाही. त्यासाठी केवळ आणि केवळ सदगुरु महाराजांचीच कृपा आवश्यक् आहे.सदगुरु कृपेसाठी आवश्यक् असलेली चारित्र्यपूर्ण आचरणाची पात्रता अंगी येणे अनिवार्य आहे.तेव्हा कुठे त्यांच्या कृपायोगेच देहातील ब्रम्हांड आणि त्यात स्थित मक्का,व्दारिका,काशी चा शोध लागुन, तेथे असलेला परमात्मा सापडेल.


संत कबीरांचा हा दोहा म्हणजे  मनुष्याच्या सगुणाकडून निर्गुणाकडे  होणा- या  वाटचालीचेच दिशानिर्देशनाचे  वर्णन आहे. हया दोहयामधील रहस्यांची अनूभुती होण्यासाठी सदगुरु महाराजांची कृपा आवश्यक् आहे. त्याशिवाय ते साध्य् होवू शकत नाही.


_________________________अपना तो कोई नही, देखी ठोकि बजायीI

अपना अपना क्या करि मोह भरम लपटायी I

भावार्थ :- 


मनुष्य् जन्माला आल्यापासुनच मृगजळामागे धावत फिरतो. कितीही धावलं तरी ते मृगजळ हाती येत नाही. मनुष्य् बालपणात असतो तेव्हा त्याचे आई-वडील-सवंगडी-भाऊ-बहीण-आप्त् सोयरे हेच त्याचं विश्व् असतं. आणि ते सर्व माझं आहे हे त्याच्या मनावर नकळत कोरले जाते. मोठं झाल्यावर लग्न् झाल्यावर बायका-मग मुले यांचा  त्या विश्वात समावेश होतो. त्यांचेसाठी वाटेल ते काबाडकष्ट्, लबाडया करुन धनसंचय करतो. त्यांना सुखात ठेवण्याच्या प्रयत्नात दु:खही भोगतो. हळूहळू वेळेप्रमाणे त्यालाही कळायला लागते की, सुरुवातीपासुन आपण ज्यांना आपलं आपलं म्हटलं त्यापैकी तर बरेच आपल्याकडे मतलब निघुन जाताच पाठ फिरवून गेले. जवळ आहेत ते केवळ बोटावर मोजण्याइतकेच काही जण. त्यापैकी कोण केव्हा सोडून जाईल याचाही नेम सांगता येत नाही. ही जाणीव ज्यावेळी होते त्यावेळी तो काही करु शकण्याच्या स्थितीत उरलेला नसतो. काळीजच फाटून जाते. हाती रहातो तो केवळ घोर पश्चाताप  आणि अशातच परमात्म्याकडून मिळालेले नियत श्वास संपले की, मृत्यू येतो. आणि अशाप्रकारे एका मृगजळामध्ये धावणा-या करोडो प्रवासांपैकी एका प्रवासाचा अंत होतो. मृगजळामागे धावण्याच्या प्रयत्नात परमात्म्याचे  स्मरण् राहून गेल्यामुळे, पुन्हा जन्ममरणाच्या गर्तेतला प्रवास सुरु होतो.


हया मृगजळाच्या नादी लागुन, दुर्लभ मानव जन्म् असाच वाया जावू नये म्हणुन, संत श्री कबीर साहेब मानवाला सावधान करताना म्हणतात की, हया जगात आपलं असं कुणीच नाही. हयाची निट पडताळणी करुन पहा. हे माझे ते माझे असं काय म्हणतोस मानवाॽ तु तर मोह मायेच्या फंदयात सापडल्यामुळे असं म्हणतोय. पण ज्यावेळी निर्णयाची वेळ येते. त्यावेळी आपले म्हणणारे एक एक काढते पाय घेतात. मेल्यानंतर सगळे सोबत येतात. फक्त् स्मशानापर्यंत तेथुन पुढचा प्रवास केवळ एकटयानेच करायचा. वाल्या कोळी देखील असाच मोह मायेच्या फंदयात अडकून बसला होता. पण नारदाच्या उपदेशाचा मनावर परिणाम झाला. त्याने स्वत्:च्या बायका मुलांचीही परिक्षा घेतली. त्या परिक्षेत ती नापास झाली. आणि मग वाल्याने नारदांच्या सांगण्यानुसार रामनामाची माळा जपली. त्याचा कायापालट होवून वाल्मिकी झाला. मोक्षपदाचा अधिकारी झाला.


कबीरांच्या हया दोहयाचे बारकाईने वाचन केले असता दिसुन येते की, हया जगात कुणीच आपले शाश्वत् सोबती नाहीत. मग हया सर्वांपासुन दुर जायचे का ॽ. तर त्याचे उत्तर  नाही असेच आहे. हया सर्व गोतावळयात राहूनही, कशातच गुंतले नाही पाहीजे असाच कबीर साहेबांच्या म्हणण्याचा अर्थ दिसतो. संसार करा पण गुंतू नका. संगळया रंगात रंगूनही रंग माझा वेगळा ठेवा. गुंत्यात सा-या गुंतूनही पाय मोकळाच ठेवा.  हेच तत्व् वापरुन, हा मनुष्य् देह कां मिळाला ॽयाचे चिंतन करुन, तो ज्या उददेशासाठी मिळाला त्या उददेशाची पुर्तता करा. आणि आपल्या ख-या सोय-याच्या भेटीअंती आपल्या ख-या घरी कायमचा वास करा. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास मोक्षाची कास धरा. जसा वाल्याला नारद मुनी गुरु मिळाले. तसेच आपणही सदगुरु स्मरणात राहून, आपले कर्तव्य् निष्काम भावनेने पार पाडून, अंतिम ध्येयापासुन विचलित न होता वाटचाल सुरु ठेवावी. यातच मानवी देह आणि जीवनाची सार्थकता आहे.


________________________मन चलता तन भी चले, ताते मन को घेर | 

तन मन दोई बसि करै, राई होये सुमेर | 


अर्थ : 


मानवी शरीर मनाच्या नियंत्रणाखाली काम करते . म्हणजे मन जसं म्हणेल त्याप्रमाणे शरीराची कृती असते . म्हणून सर्वात अगोदर मनावर नियंत्रण करायला पाहिजे . जी  व्यक्ती मनावर नियंत्रण मिळविते त्या व्यक्तीचे शरीरावरही नियंत्रण आपोआप प्राप्त होते   . मग अशी  व्यक्ती कितीही लहान असली तरी ती अल्पावधीत आपल्या कर्तृत्वामुळे उत्तुंग पर्वतासारखी किर्तीवान  बनते असा संत कबीर साहेबांच्या ह्या दोह्याचा अर्थ आहे.


पण आपण काय करतो तर मनाचे लाड पुरवितो . त्यामुळे आपलं मन हट्टी बनते . अशा व्यक्तीचे मनच अध:पतन होण्यास कारण होते . जगात थोर संत पुरुष आणि  यशस्वी झालेल्या व्यक्तींची चरित्रे वाचली असता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कि त्या मन म्हणेल त्या मार्गे गेल्या नाहीत . तर मनालाच त्यानी सदमार्गावर चालविलं . त्यामुळे त्यांची चरित्रे  आज आदर्श चरित्र कसे असावे ? याचे प्रमाण म्हणून आपल्यासमोर आहेत . तनाचे योगी नाही तर मनाचे योगीच उद्धरल्या जातात ,  अशाच व्यक्ती जगाच्या कायम स्मरणात राहतात . भोगी तर बुडबुड्यासारखा जन्माला येवुन किड्यासारखा कधी मृत्यु पावतो हे कळतही नाही . कुणीही व्यक्ती जन्माने योगी अथवा भोगी नसतो . तर ज्या व्यक्तीने मनाचे दास्यत्व स्विकारले तो अल्प सुखाच्या प्राप्तीसाठी अनंत काळचा दु:खी बनतो . ज्याने मनाला दास केले तो योगी बनुन जगावर आपले नाव कोरुन देहाशिवाय अमर होतो 


_____________चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह| 

जिसको कछू नहीं चाहीये वाही शाहंशाह।


अर्थ :- 


मानवाची इच्छा ही सर्व  कष्टांचे उगमस्थान आहे . ज्याने आपल्या सर्व ईच्छा आणि अपेक्षांचा लय केला. त्याच्या सर्व चिंताच नष्ट होतात . अशा व्यक्तीचे मन मग जगाची अथवा जगातील कुठल्याही गोष्टीची पर्वा करीत नाही .असं बेपर्वा मन सदैव चैतन्याने उल्हासित असतं . ज्याला कोणत्याही गोष्टींची आवश्यकता उरलेली नाही अशी व्यक्ती ख- या अर्थाने जगाचा  शहेनशहा म्हणजे सर्व राजांचा राजा असते असे कबीर महाराजानी ह्या दोह्यातुन मानवाला सांगितले आहे .  आपल्या गरजा किंवा अपेक्षा कमी ठेवणे हा मनाला चिंतामुक्त ठेवण्याचा  सोप्पा राजमार्ग आहे. आणि ज्याने आपल्या ईच्छा - गरजांवर विजय मिळविला अशी व्यक्ती कोणताही राजपाठ नसतानाही जगाचा अनभिषिक्त महाराजाच असते . 


आज तुमच्या आमच्या दु:खाचं कारण काय ? तर आपण आपल्या गरजा विनाकारण वाढवुन ठेवल्या आहेत . आणि त्या गरजांची पुर्तता करण्यासाठी किती किती उपद्व्याप करावे लागतात ? .आणि त्यातुन मनाला नाना प्रकारच्या चिंतानी ग्रासलं जातं . चिंताग्रस्त मन कधीही निर्भय राहु शकत नाही . आणि मग ह्या चिंतेंच्या जाळ्यातुन सुटण्यासाठी केलेल्या धडपडीने मनुष्य समस्यानी  अधिकच वेढला जातो . आणि मग मुळ ध्येयापासुन मनुष्य भरकटल्या जातो . भरकटलेलं जीवन आणि भरकटलेले जहाज कुठल्या किना- याला लागेल ? त्याला किनारा मिळेल कि न मिळेल याची काहीही शाश्वती नाही . मग ही संधी पुन्हा केव्हा मिळेल ? न मिळेल कुणी सांगावं ! .


______________लोग भरोसे कौन के, बैठे रहे उरगाय I

जीय रही लूटत जम फिरे, मैंढा लूटे कसाय I


अर्थ: 


संतश्रेष्ठ् कबीरजी म्हणतात की, जगातील सर्व व्यक्ती कुणाच्या भरवश्यावर बसुन आहेत. ज्याप्रमाणे कसाई मेंढयाचा जीव हिरावून घेतो. त्याप्रमाणे यम देखील आपल्या देहातील आत्म्याची लूट करायची संधीच शोधत आहे.


जगात जन्माला आलेल्या सर्वच व्यक्ती केवळ उपजिविका करुन, आपले आणि कुटूंबाचे उदरभरणाचे काम करीत आहेत. पोट भरले की, मग देह धर्मपालन करतात.आणि हयाच चक्रात सतत मग्न् रहातात.  पण कुणीही हा मानवी देह कां लाभला ॽ. त्याचे सार्थक कसे करावे ॽ याचा विचार करुन, परमेश्वराच्या ध्यान-धारणेत लागून,  पैलतीर गाठण्याचा प्रयत्न् करत नाही . हया देहाला एक ना एक दिवस अंत आहे हे सर्वांना ठावूक आहे.  यमराज तर केवळ कधी हया देहातील आत्म्याचे-जीवाचे हरण करुन घेवून जावू यासाठी संधीची वाट पाहून आहे. यमाला संधी मिळाल्यावर तो ही संधी दवडणार नाही याचीही कल्पना जगातील सर्व जीवांना आहे. तरी ते इतके कसे शांत जणु काही कुण्याच्या भरवश्यावर, कुणाची तरी वाट पहात असल्यासारखे वाटताहेत असे दिसते असे कबीर महाराज म्हणतात.


तात्पर्य् असे की, केवळ जन्माला आल्यावर संसारात रमून रहाणे इतकेच मनुष्याचे कर्म नसावे. तर त्या परम अविनाशी परमात्म्याचे स्मरणात राहून, मनुष्य् जन्माचे सार्थक करावे हा मूळ उददेश आहे. आणि तो कधीही विसरु नये. नाहीतर पुन्हा जन्म् आणि मरणाच्या फे-यात अडकून त्यातच फिरत बसल्याशिवाय पर्याय रहाणार नाही.


__________________


गुरु पारस के अन्तरो, जानत है सब संत I

वह लोहा कंचन करे,ये करि लेय महंत I


अर्थ :- 


संत कबीर म्हणतात की, गुरु आणि परिसामधील फरक सर्व संत म्हणजे ज्ञानी पुरुषांना माहीती आहे. परिस केवळ लोखंडाला सोने करतो. म्हणजे जे लोखंड कमी मोलाचे आहे, परिस आपल्या स्पर्शाने त्याला सोन्यात रुपांतरीत करुन,  भलेही  मौल्यवान बनवेल. पण परिसाकडे लोखंडाला परिसासारखे बनविण्याचा गुण नाही.ती किमया जगामध्ये केवळ गुरु आणि गुरुच करु शकतात. म्हणुन  गुरु हे परिसापेक्षाही महान आहेत. जे शिष्यांना ज्ञानाचा अनुग्रह करुन, स्वत्: सारखे बनवितात. हा गुरुचा अगाध महिमा आहे.


आज आधुनिक युगात गुरुंची कमी नाही. पण गुरु महाराज करीत असलेली किमया मात्र ब-याच गुरु म्हणवुन घेणा-यांकडे आढळून येत नाही. अशावेळी ती व्यक्ती गुरु समजू नये. अशा गुरुंपासुन नेहमी सावध राहण्याची आवश्यकता आहे.


_________________


माया माया सब कहैं, माया लखै न कोयI

जो मन से ना उतरे माया कहिए सोय I

अर्थ :- 


संत कबीर महाराज म्हणतात की, माया माया तर सर्वच म्हणतात. पण हया मायेची ओळख कुणालाही नाही. मग ही माया कशी ओळखायचीॽ असा प्रश्न् आपल्याला पडणे स्वाभाविकच आहे. तर त्याचे उत्तरात कबीर महाराज म्हणतात की, जी मनावर वरचढ होते ती माया आहे. जी मनाला तीच्या म्हणण्याप्रमाणे नाचविते. मनुष्य् मायेच्या अधीन  होण्याचा अंत अध:पतनातच होतो.


आपण माया कुणाला म्हणतोॽ सुंदर स्त्री, धनसंपत्ती, किर्ती, लोभ, मोह. पण प्रत्येकवेळा माया त्याच रुपात समोर येईल असे नाही. यापेक्षाही वेगळया रुपात ती येवून, मनावर आरुढ होते आणि मनाला तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला विवश करते ती माया आहे. कारण मनाचे अधीन शरीर आहे. एकदा का मायेने मनाचा ताबा घेतला की, शरीराला मनाच्या इच्छेप्रमाणे वागावे लागते. आणि असा मनुष्य् मायेच्या झपाटयात जरी आला तरी त्याला मात्र याबाबत तीळमात्रही कल्पना येत नाही की, आपण जी कृती करतो आहे ती मायेच्या अंमलाखाली येवून करतोय. कारण मायेला मनुष्य् ओळखुच शकत नाही.


मनावरुन मायेचं हे भुतासारखं झपाटलेपण दुर करायचं असेल तर मनामध्ये सदगुरु महाराजांचे नामस्मरण होत असणे अनिवार्य आहे. मनात नामस्मरण सुरु असेल तर ही माया भस्म  होवून जाईल. जगामध्ये मायेची ओळख् केवळ सदगुरु महाराजच करुन देवू शकतात. मायेला ओळखणं हे मनुष्य् प्राण्याच्या ताकदीबाहेरील गोष्ट् आहे.


------------------------------------------------------------------------------------------

जंगल ढेरी राख की, उपरि उपरि हरियाय I

ते भी होते मानवी, करते रंग रलियाय I

भावार्थ :- 


जो मनुष्य् संपूर्ण आयुष्य् रंगविलासात दंग होता, ज्यावेळी अशा  मनुष्याचे निधन होते, त्यावेळी त्याचे पार्थिव शरीराला लगेचच दहन करण्यात येते. दहनानंतर त्या मनुष्याचे स्थुल देहाची राख होवून जाते. त्या ठिकाणी काही कालांतराने हिरवे गवत उगवते. आणि सगळीकडे हिरवळ दिसु लागते. या ठिकाणी काही काळापूर्वी एखादया मनुष्य् देहाचे दहन केले होते असे कुणाला सांगूनही खरे वाटत नाही. कारण तिथे कशाचेही अस्तित्व् उरलेले नसते असे सांगून श्री संत कबीर साहेब म्हणतात की, क्षणभंगुर हया मानवी देहाचा शेवट शेवटी राखेतच होणार आहे. कालांतराने ती राखही आपल्याला दिसणार नाही. 


जीवनाच्या हया सत्याला मानवाने जवळून ओळखले पाहिजे. आणि आपले जीवन असे जगले पाहिजे की, जगण्याचे काहीतरी सार्थक झाले पाहीजे.देहाचे भोग कितीही भोगले तरी त्याचे पर्यावसान शेवटी राखेतच होणार आहे. देहाचे भोगाला कोणताही अर्थ नाही. कितीही भोगले तरी हा वणवा अधीकच भडकणार. त्यातुन निष्पन्न् काहीच होणार नाही. म्हणुन शरीरातुन आत्मा गेल्यानंतरही, पार्थिव शरीर जळून गेल्यानंतर त्याचे राखेलाही सुगंध आला पाहीजे. देहाशिवायही मनुष्याला जगता आले पाहीजे. पण कबीर साहेबांचे हे म्हणणे गांभीर्याने घेवून आपणापैकी किती जण तसे वागतात ॽ. कबीर साहेबांचे सोडा पण आज किमान आपण माणुस म्हणुन तरी जगू शकत आहोत काय ॽ असा प्रश्न्म नाला विचारला असता त्याचे उत्तर होकारार्थी असण्याची शक्यता फार कमी आहे. आज जगात स्थुल देहाचे भोगाकडे मानवीबुध्दीची ओढ असल्याने नैतिकता, अध्यात्मिकता यांचा लोप होण्याची संभावना निर्माण होवून, सगळीकडे अनाचाराचे थैमान माजले आहे. हे चित्र एका फार मोठया सामाजिक प्रलयाचे

निदर्शक आहे. 

=-=-=-=-=-=-=-=-=-=


झुठा सब संसार है, कोऊ न अपना मीत I

राम नाम को जानि ले, चलै सो भौजल जीत I

भावार्थ :- 


संत कबीर महाराज हया दोहयात म्हणतात की, हे मानवा हे दृश्य् जगत खोटे आहे. जे दिसत आहे ते तसं मूळात नाहीये. जे वास्तवात आहे ते दिसत नाही. हया दृश्यादृश्यतेच्या मायेच्या  खेळात काय खरे आणि काय खोटे आहे हे कळत नाही. हया जगात कुणीही आपले सगेसोयरे आणि मित्र नाही. कुणीही शाश्वत् साथीदार नाही. आपण सगळे काही इथेच सोडून जाणार आहोत. तु एकटा आहेस.एकटाच आलास  आणि एकटाच रहाणार आहे. आणि एकटाच निघुन जाणार आहेस.  पण तरीही हा माझा तो माझा हया गैरसमजुतीच्या भ्रमामध्ये तु इतका गुरफटून गेला आहेस की, सत्य् काय आहे ॽ हे ओळखण्याचेही तुला भान उरलेले नाही. कबीरांच्या हया दोहयामधील पहिल्या वाक्यासरशी मानवी मती ध्यानावर येते. आणि हया ध्यानावर आलेल्या मानवी मतीला कबीर महाराज सांगतात की, हया मायारुपी जगात सारं काही खोटं असलं तरी केवळ रामनाम सत्य् आहे. जो कुणी हया राम नामाला ज्ञात करुन घेईल. तोच हया खोटेपणाने भरलेल्या भवसागरातुन तरुन जाईल. इतर कोणतेही साधन भवसागर तरण्यास सक्षम नाही. मनुष्य् कितीही बुध्दीमान असला तरी त्याची बुध्दी हा भवसागर पार करण्यास आणि मायेची कक्षा ओलांडण्यास

सक्षम ठरु शकत नाही. 

********************


नींद निशानी मौत की, उठो कबीरा जाग I

और रसायन छोड के, नाम रसायन लाग I

भावार्थ :- 


निद्रा ही मृत्यूची निशाणी आहे. जो झोपलेलाच रहातो तो मनुष्य मृतवतच समजावा. कारण क्रियाशिलता त्याचे ठायी लोप पावलेली असते. असा मनुष्य् काही करु शकण्याच्या स्थितीत नसतो. म्हणुन एक न एक दिवस मृत्यू येणार आहे हे मानवाला माहित असुनही, हया जन्ममरणाचे बंधनातुन सुटण्यासाठी काहीच खटपट न करणा-या, हया सृष्टीतील मायेने निर्माण केलेल्या शरीर भोगाच्या, बौध्दीक सुखाच्या कल्पनेत रमून भ्रामक खेळण्यात गुंतून पडलेल्या  मनुष्याला संत कबीरांनी मृत मनुष्याचे संबोधन देवून, अशा मानवांना ते म्हणतात की, हे मनुष्या आतातरी हया काळझोपेतुन जाग. आणि नामामृताचे प्राशन कर. तु त्यायोगेच जन्ममृत्यूचे बंधन, सुख- दु:खाचे पाश तोडून भवसागर तरुन जाशील कारण तु इथे झोपण्यासाठी आलेला नाहीस.


हया दोहयातुन संत कबीर साहेबांनी हया जगात मनुष्य कां जन्माला येतो ॽ मानवी जन्माचे प्रयोजन काय ॽ आणि ते कसे साध्य करता येईल ॽ याबाबत बोध केलेला आहे. सदरचा दोहा खा प्या मजा करा आणि एकदिवस मृत्यू आल्यावर मरा अशी मनोवृत्ती बाळगण्या-या व्यक्तिंना एकप्रकारे चपराकच आहे असे म्हणता येईल.


=*=*=*=*=*=*=*=


न्हाये धोये क्या हुआ, जो मन का मैल न जाय I

मीन सदा जल मे रहे, धोये बास न जाय I

भावार्थ :- 


ज्याप्रमाणे मासा हा पाण्यामध्ये रहातो, त्याचे स्थुल शरीर वारंवार धुतल्या जाते, पण असे असुनही त्याचे देहाची दुर्गंधी मात्र जाता जात नाही. मानवी मनाची तुलना जलातील माशाशी करुन कबीर महाराज म्हणतात की,जर मनाची दुर्गंधी जाणार नसेल तर मनुष्याने कितीही स्नान केले तरी त्या स्नानाला काहीएक अर्थ रहात नाही.आत्म्याला मोक्ष मिळावा हयासाठी मनुष्य् मोठमोठया तिर्थक्षेत्री स्नानादी कर्मे करतो. पण जे काही स्नान घडते ते केवळ स्थुलदेहाला घडते. मृत्यूनंतर हा देह इथेच मनुष्य् सोडून जाणार आहे. मग देहाला स्नान घडविल्याने आत्म्याला मोक्ष कसा मिळेलॽ हा फार मोठा गहन प्रश्न् हया दोहयाचे वाचनातुन आपल्यासमोर उभा ठाकतो. त्याचे उत्तर देताना कबीर साहेब म्हणतात की, ज्यावेळी मनाची वैचारिक शुध्दता आणि त्यानुसार आचरण मनुष्याकडून घडेल त्यावेळी खरे स्नान होईल. मनामध्ये वैचारिक दुर्गंधीच उरणार नाही. आणि अशा स्वच्छ मनाला आत्म्याचे ज्ञान होईल. ज्यावेळी मनुष्याला आत्म्याचे ज्ञान होते त्यावेळी तो मोक्षाला प्राप्त होतो हे वेगळे सांगायला नको.


--्---्---्---्---्---्---्---्--माला तो कर में फिरै, जीभ फिरै मुख माहिंI

मनवा तो चहु दिश फिरै, यह तो सुमिरन नाहिंI

भावार्थ :- 


नामस्मरण करताना आपली जीभ मुखामध्ये फिरत असते. झालेले नामस्मरणाची मोजणी आपण हातात फिरत असलेल्या जपमाळेने करतो. त्याचवेळी आपले मन मात्र दहादिशांना चौफेर भटकत असते हे नामस्मरण नाही असे संत श्री कबीर साहेब म्हणतात. त्यामुळे नामस्मरण कशाला म्हणावे ॽ हा प्रश्न आपसुकच आपल्याला पडतो. याचे उत्तर देखील कबीर साहेबजींच्या हया दोहयातुन ध्वनीत अर्थाने आपल्याला मिळते. ज्यावेळी जपमाळेचीही गरज रहात नाही. नामस्मरण करताना मुखामध्ये जिव्हादेखील फिरत नाही.  आणि मन एकाच ठिकाणी स्थिर राहून मनाव्दारे नामस्मरण होते तेच खरे नामस्मरण आहे. इतर सर्व गोष्टी निरर्थक आहेत. मनाव्दारे घडलेल्या नामस्मरणानेच मनुष्य उध्दरल्या जातो.


::::::::::::::::::::::::::::::::


माया तो ठगनी भई, ठगत फिरै सब देस I
जा ठग ने ठगनी ठगी, ता ठग को आदेस I

भावार्थ :- 


संत कबीर म्हणतात की, माया ही त्रिगुणी आहे. ती सर्व प्राणीमात्रांची फसवणुक करते.मायेचं वर्णन मोठमोठया पंडीतांनी केलेलं आहे. पण त्यापैकी बरेच जण तिच्याच प्रभावाखाली गारदही झाले आहेत. सर्व वस्तुमात्रांपेक्षा ती श्रेष्ठ आहे. ती हे समग्र विश्व निर्माण करते. पण तीला अस्तित्व नाही आणि अस्तित्वाचा अभावही नाही. ती साकार नाही. की निराकारही नाही. ती जे काही आहे ते वर्णनापलीकडील आहे.  तीच्या फसवणुकीमुळे मनु्ष्य प्राणी संसाराच्या शारिरीक,बौध्दीक आणि वस्तुविषयक सुखांच्या भलामणीत फसून रहातो. त्यामुळे  ही सुखे मानवी जीवनाचे ध्येय नसुन, मायेची बंधने आहेत. त्या सुखांनी तो कधीच तृप्त होत नाही.  हया जगात कुणीही आपले सगेसोयरे आणि मित्र नाही. कुणीही शाश्वत साथीदार नाही. सगळे काही इथेच सोडून जाणार आहेत. एकटा आहेस.एकटाच आलास  आणि एकटाच रहाणार आहे. आणि एकटाच निघुन जाणार आहेस.  पण तरीही हा माझा तो माझा हया गैरसमजुतीच्या भ्रमामध्ये जीव इतका गुरफटून गेला आहेस की, सत्य  काय आहे ॽ हे ओळखण्याचेही भान उरलेले नाही. पण हे त्या जीवाला कधीही कळत नाही. तो सगळं जग आपलंच आहे हया तो-यात असतो. जो तोरा एक दिवस मोडणारा असतो. अशाप्रकारे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मायेच्या अंमलाखाली आल्यामुळे, तो त्याच्या नियत कर्तव्यापासुन विन्मुख होवून मायेच्या कोळीष्टकात फसुन एकतर पतन तरी पावला किंवा धक्क्याने मृत्यूपंथाला तरी गेला. मायेच्या प्रभावामुळे जे जसं आहे तसं दिसत नाही. म्हणुनच जग फसत रहातं. हया मायेने आजपर्यंत फसविलेल्या लोकांची संख्या कागदावरही लिहीता येणार नाही इतकी अफाट आहे. मायेच्या हया कक्षेबाहेर जावून, ज्या कुणी मनुष्याने मायाविरहीत परमपुरुषाला आत्ममार्गाने सदगुरुयोगे जावून, शोधण्याचा यशस्वी प्रयत्न् केला, तोच मायेला ओळखु शकला. पण हा प्रवास मायेच्या बाजुने जावून होत नाही. त्यासाठी मायेच्या विरुध्द अंगाने जावे लागेल. हा प्रवास हा मूळ आत्माच आहे याची शिकवण देणा-या मार्गाचा म्हणजेच अध्यात्माचा आहे. जो नदीचा उलटा प्रवाह म्हणुन देखील ओळखला जातो.  मायेचा कधीही विनाश होवू शकत नाही. मायेची ओळख आत्मरुपाला पटणे हाच मायेचा त्या आत्मरुपाच्या हददीपावेतोचा  शेवट आहे. पुन्हा ही कपटी माया पुन्हा अशा मनुष्यासमोर येवू शकत नाही. कारण त्याने जाणलं असतं की, ब्रम्ह  सत्य आहे आणि मायेपासुन निर्माण झालेलं जगत मिथ्थ्या आहे. आत्मज्ञान हे एक धारदार तलवारीसारखे आहे. या तलवारीनेच मायेचे आणि तिच्या योगे निर्माण झालेले जन्म्, मृत्यू, दु:खाचे, ज्ञानेंद्रियांपासुन मिळणा-या विखारी सुखांचे बंध कापून टाकता येतात. दुस-या कोणत्याही हत्याराने, उपकरणाने हे बंध कापता येत नाही. वारा हे करु शकत नाही. किंवा अग्नीपाशी यासाठी शक्ति नाही. अनेक कार्य करुनही हे साध्य होत नाही.


म्हणुनच संत कबीर म्हणतात की, ज्या मायेने हया जगाच्या परमतत्वाला आपल्या प्रभावाने झाकाळून टाकले, आजवर जी माया सर्व जीवांना फसवित आली. त्या मायेला आत्म् निग्रहाने फसविणारा व्यक्ती हा त्यांच्या दृष्टीने महाठक असुन, तो असा महाठक आहे की, ज्याची तुलना कोणत्याही सत्पुरुषापेक्षा कमी नाही.कारण मायेची महतीच इतकी मोठी आहे की,ती ऐश्वर्याची,सौंदर्याची, सत्ता आणि शक्तिची इतकेच काय सदगुणांची देखील चिता पेटवून टाकण्यास समर्थ आहे. साधु-संत, राजा-रंक सगळेच तिच्यापायी लयाला गेलेत.तरीही जीवनाबददलची जीवाची आसक्ती टिकून आहे. जिव हा जीवनाला गोचिडाप्रमाणे घटट चिकटून आहे. त्या मागचे कारण मायाच आहे. हया मायेच्या हया प्रकृतीच्या  कक्षेबाहेर एखादया जीवाने जाणे हा मायेचा पराभव आहे. त्यामुळे मायेवर विजय मिळविणारा मनुष्य् हा कोणत्याही सत्पुरुषापेक्षा कमी असुच शकत नाही.


-=-=-=-=-=-=-=-=-=- 


छीर रुप सतनाम है, नीर रुप व्यवहार I

हंस रुप कोई साधु है, तत का छाननहार I

भावार्थ :- 


संत कबीर साहेब म्हणतात की, परमात्म्याचे सत्यनाम हे दुधासारखे शुध्द आहे. तर जगरहाटी अर्थात माया ही पाण्यासारखी ज्यात मिळवाल त्याचे स्वरुप धारण करणारी बनावटी आहे. ते एकमेकांत मिसळल्या गेले की, परमात्मा कोणता आणि माया कोणती हा भ्रम सामान्य माणसाला साहाजिकच निर्माण होतो. हया भ्रमाचे निरसन करण्याची ताकत फक्त साधुमध्ये असते. कारण साधु हे आत्मतत्वाचे जाणकार असतात. त्यांचे स्वरुप हे हंसासारखे असते. 


जगात केवळ हंस हा एकच असा पक्षी आहे की, जो पाणी मिसळल्या गेलेल्या दुधातुन केवळ दुधच प्राशन करतो. हया हंस पक्ष्याप्रमाणेच साधुंचे असते. साधु हे परमतत्व परमात्म्याभोवती असलेला मायेचा भ्रम वेगळा करतात व शिष्यांना किंवा मुमुक्षुंना तत्व जागृती आधारे परमा्त्म्याचा साक्षात्कार घडवून आणु शकतात. म्हणुन परमात्म्यापेक्षाही परमात्मस्वरुपाचे आत्ममार्गाने दर्शन घडविणा-या  सदगुरु महाराजांचे प्रताप खरोखरीच अवर्णनीय आहे. त्या सदगुरु महाराजांचीच महती संत कबीरांनी हया दोहयातुन वर्णन केली आहे. 


००००००००००००००


कबीर सोई पीर है, जो जानै पर पीर I

जो पर पीर न जानई, सो काफिर बेपीर I

भावार्थ :- 


कबीर साहेब म्हणतात की, तोच मनुष्य हा खरा साधु-सज्ज्न आहे, जो दुस-यांचे दु:ख आपले म्हणुन जाणू शकतो. जो इतरांची पिडा जाणू शकत नाही तो निर्दयी व संवेदनाविहीन आहे असे समजावा. हया दोहयातुन खरा साधु सज्ज्न पुरुष कसा असतो हयाची ओळख् संत कबीरांनी आपल्याला करवून दिली आहे. त्याचप्रमाणे निर्दयी व संवेदनाविहीन मनुष्य कुणाला म्हणावे याबाबतही विवेचन केलेले आहे. अशाच अर्थाने बरेच अभंग मराठी संतवाड:मयातही आढळून येतात. सर्वच संताचे या मुददयावर एकमत झाल्याचे दिसुन येते .  आणि संतांचे म्हणणे आपण शिरोधार्य मानायलाच हवे. कारण त्यांनी आत्ममार्गाने जावून, परमात्म्‍ा स्वरुप जाणले आणि त्यानंतर त्यांनी सामान्य् माणसाचा उध्दार होईल हया हेतुने विविध संत साहित्याची निर्मिती केली. समग्र संत साहित्य हे समाजप्रबोधनासाठीच अस्तित्वात आलेले असल्यामुळे ते वास्तवाच्या अधिक निकट आहे. कारण तो त्यांचा आत्मअनुभव आहे. सर्व संतांना सादर प्रणाम.


**************


कबीर लोहा एक है, गढने में है फेर I

ताही का बखतर बने, ताही की समशीर I

भावार्थ :- 


संत कबीर साहेबांनी हया दोहयात सांगितले की, लोखंड हा धातू जरी असला, तरी हया एका धातुपासुन केवळ घडविण्याच्या पध्दतीनुसार वेगवेगळया वस्तु बनविता येतात. त्याच्यापासुन शत्रुचे मुंडके क्षणात धडावेगळे करणेसाठी समशेर बनवितात. तशीच घडविण्याची पध्दती बदलली की, समशेरीपासुन स्वत्:चा जीव वाचविता येणारे चिलखतही बनविल्या जाते. तदवतच परमात्म्याचे आहे. परमात्मा एकच जरी असला तरी तो चराचराला व्यापुन राहीलेला आहे. तो सगळीकडे आहे. सजीवात आहे. निर्जिवातही आहे. सगुणात आहे. तसाच निर्गुणातही आहे. आणि त्याचवेळी तो सगळयांच्याही पलीकडे देखील आहे. पण परमात्म्याला आत्मस्वरुपात धारण केलेल्या मानवाने त्या परमात्म्याचे विविध रुपातील एकतत्व स्वरुप जर जाणुन घेतले तर तो जीवन्मुक्त होवु शकतो. नसता बुध्दीभेद झाल्यास जीवनचक्रात फसुन वारंवार जनन मरणाच्या फे-यातही सापडू शकतो.


===================


जहां आपा तहां आपदा, जहा संसै तहां सोग I

कहै कबीर कैसे मिटै, चारो दीरघ रोग I

भावार्थ :- 


ज्या मनुष्याचे ठायी अहंकार वसलेला आहे, तो मनुष्य कायम संकटांनी वेढलेला असतो. ज्याचे मनात संशयाचे भुत विराजमान आहे तिथे तो मनुष्य शोकाशिवाय राहू शकत नाही. म्हणुन कबीरजी म्हणतात की, अहंकार संकटे,संशय आणि शोक हे चार प्रदीर्घ रोग कसे दुर होतील याचीच चिंता आहे.


याबाबत गांभीर्याने चिंतन केले असता दिसुन येते की, अहंकार हा बुध्दीच्या व पाच ज्ञानेंद्रियांच्या  संकल्पाने निर्माण झालेला असतो.संशय हा मनाचा खेळ आहे. अधिकच खोलात जावून विचार केला असता या सा-यांस कारण माया व अज्ञान आहे. त्यामुळे सदगुरु महाराजांचे शरण जावून,नामस्मरण, ध्यानादी कार्ये केली तर त्यांचे कृपे यावर विजय मिळविता येतो.कारण वरील सर्व बाबी वश झाल्या तरच अध्यात्मिक मार्गावर प्रगतीपथावर जाता येते. नसता काहीएक साध्य् होवू शकत नाही.


०=०=०=०=०=०=० 


मुंड मुडाये हरि मिले, सब कोय लेय मुडाय I

बार बार के मुडते, भेड न बैकुन्ठ जाय I

भावार्थ :- 


हया दोहयामधुन संत कबीर साहेबांनी एक अध्यात्मिक सत्य समस्त मानवजातीसमोर मांडले आहे. ते असे की, डोक्याचे मुंडन करुन जर हरि भेटत असेल तर सर्वांनीच मुंडन केले असते. आणि श्रीहरिचा साक्षात्कार करुन घेतला असता. मेंढपाळ हा लोकरीच्या मिषाने वारंवार मेंढयांचे मुंडन करीत असतो मग काय सर्व मेंढया वैकुंठात गेल्या नसत्या काय ॽ


कबीरांनी आपल्या दोहयातुन अध्यात्माचा आत्ममार्ग कसा आहे हे वेळोवेळी विशद तर केले आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी समाजातील दोषपुर्ण प्रथा देखील अधोरेखित केल्या आहे. कबीरांचे दोहे बारकाईने अभ्यासले तर त्याचा अध्यात्ममार्गक्रमण करणा-या व्यक्तिस निश्चितच मोठा लाभ होईल.


**********************


राम बुलावा भेजिया, दिया कबीरा रोय I

जो सुख साधु संग मे, सो बैकुन्ठ न होय I

भावार्थ: कबीर म्हणतात जेव्हा त्या परम अविनाशी मायातीत परमात्म्याचे बोलावणे आले त्यावेळी तर मला रडू कोसळले. कारण ज्या साधु सज्जनांच्या संगतीमुळे माझ्यात अंतर्बाहय कायापालट होवून, मी परमात्म्याच्या गौरवास्पद निमंत्रणास पात्र ठरलो, त्या साधु सज्जनांच्या संगतीत आता मला अधिकच गोडी वाटत आहे. हे सुख ही अवीट गोडी मला परमात्म्याच्या सान्निध्यात राहूनही मिळणार नाही याची खंत आहे.


-०-०-०-०-०-०-०- 


कबीर हम गुरु रस पिया, बाकी रही न छाक I

पाका कलश कुम्हार का, बहुरि न चढसी चाक I

भावार्थ : 


कबीर साहेबजी हया दोहयात म्हणतात की, मनाचा अंधार दुर करुन आत्म्यासंबंधी ज्ञान प्रकाश देणारे आत्मज्ञानरसाचे सदगुरु महाराजांच्या कृपायोगे आम्ही मनसोक्त प्राशन केले आहे. ज्याप्रमाणे कुंभाराच्या आव्यामध्ये भाजून तयार झालेल्या माठ जसा कुंभार पुन्हा त्यास घडविण्यासाठी चाकावर चढवित नाही. तसेच आमचेही झाले आहे. आम्ही आत्मज्ञानरुपी रसाचे सदगुरु महाराजांकडून मनसोक्त प्राशन केलेले असल्यामुळे आता जगात ज्ञान घ्यावे असे कोणतेही ज्ञान उरलेच नाही. आमची ज्ञानाची तहान संपून गेली. शाश्वत तृप्ती लाभली आहे.  त्यामुळे आम्ही आमचा आत्मा पाहू शकलो. त्याचे स्वरुप जाणू शकलो. तसेच देहातील आत्मा आणि तो परमअविनाशी परमात्मा एकच आहे हे ओळखू शकलो. म्हणुन आम्ही मोक्षाचे अधिकारी झालो आहोत.म्हणुनच मोक्षाचा अधिकारी असलेला आत्म्याला जन्ममरणाच्या चक्रात फिरण्याची आता कुठलीही आवश्यकता उरली नाही.


०००००००००००००००


भय से भक्ति सब करै, भय से पूजा होय I

भय पारस है जीव को, निरभय होय न कोय I

भावार्थ : 


कबीरजी म्हणतात सर्व मनुष्य प्राण्यांच्या मनातील दु:ख आणि मृत्यू यापासुन वाटणारे भय हेच त्यांचेबाबतीत परिसाचे काम करते. कारण या जगात निर्भय कुणीच नाही. सर्वांच्याच  मनात भय हे वास करुन आहे. हया भयापासुन कायमस्वरुपी मुक्तता मिळावी हया हेतुने मनुष्य भयाच्याही पलीकडे वास करुन असलेल्या परमात्म्याची भक्ती करतो. त्याची मनोभावे पूजा करतो. हयामुळे त्या मनुष्यामध्ये अंतर्बाहय कायापालट होवून सरतेशेवटी तो उध्दारास पात्र होतो. जर मनुष्याचे मनात दु:ख आणि मृत्यूपासुनचे भय हे नसते, पर्यायाने मायेचे अस्तित्व नसते तर मनुष्याने उध्दारासाठी कोणताही यत्न् केला नसता.


:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:- 


जुआ चोरी मुखबिरी, ब्याज बिरानी नारी I

जो चाहे दीदार को, इतनी वस्तु निवारि I

भावार्थ : 


जुगार खेळणे, चोरी करणे, हेरगिरी करणे, व्याजबटटयाचा धंदा अर्थात सावकारी करणे आणि परस्त्रीचा मोह धरणे संग करणे हे जगात निंदनीय कर्म मानले जातात. जर तुम्हाला ईश्वरीय साक्षात्काराचा अनुभव घ्यावयाचा असेल तर हया बाबींचा त्याग करावाच लागेल. कारण हया गोष्टी ज्या मनुष्याचे ठायी वास करुन असतात त्याला ईश्वराची प्राप्ती होवू शकत नाही असे कबीर साहेब म्हणतात. याकरीता अध्यात्मामध्ये मार्गक्रमण करताना विचारांची आणि आचरणाची शुध्दता अंगी येणे अत्यावश्यक आहे.


*- *-*-*-*-*-*-*-*-*-*-*


साधु कहावन कठिन है, लम्बा पेड खजूर I

चढै तो चाखे प्रेम रस, गिरै तो चकनाचूर I

भावार्थ :- 


या जगात सज्जन् अथवा साधु म्हणवून घेणे सोपे नाही. कारण सन्मार्गावर मार्गक्रमण करीत राहणे हे दुधारी तलवारीवर चालण्यासारखे महाकठीण काम आहे. जसे खजुराचे झाड हे अत्यंत उंच असते. त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचलात तर खजुराची गोड फळे चाखायला मिळतील. पण पडल्यावर देहाचा चकनाचूर निश्चित आहे. त्याचप्रमाणे सन्मार्गावर चालताना मोहमायेच्या चक्रात फसुन, मनुष्याचे पतन झाले तर जगनिंदा तर होईलच. देहदेखील नष्ट होणारच आणि  तो होईलही. पण खोटेपणा केलात म्हणुन परमात्म्याकडून जबर शिक्षाही मिळेल.कदाचित सुर्य चंद्र असेपावेतो आत्म्याला गती देखील मिळणार नाही.  म्हणुन कबीर महाराज म्हणतात की,


सन्मार्गावर चालायचे तर सरळ चालावे. वृथा ढोंग केले तर नाश पावशील हा परमात्म्याचा नियमच आहे. त्यातुन कुणीही सुटलेले नाही. आज समाजात आपल्या आजूबाजुला बघितले तर कित्येक पाखंडी अध्यात्मिकतेचा देखावा निर्माण करुन, स्वत्: चा गोचिडाप्रमाणे मतलब साध्य करीत बसलेले दिसुन येतात. त्यापैकी काहींचा शेवट कबीर महाराजांचे दोहयात वर नमूद केल्याप्रमाणे झालेला आहे. तर काहीजण त्या मार्गावर आहेत. 


=०=०=०=०=०=०=०=०=० 


काल करै सो आज कर, सब है साज तुव साथI

काल काल तु क्या करै, काल काल के हाथ I

भावार्थ : 


कोणतेही कार्य करताना कल करेंगे असे म्हणण्याची प्रवृत्ती असणा-या मनुष्यांना कबीर महाराज हया दोहयातुन म्हणतात की, कोणतेही कार्य उदयावर ढकलण्यापेक्षा आजच कर. कारण येणा-या भविष्यकाळावर तुझी हुकूमत नाहीये. आजचा दिवस तुझ्या हातात आहे. हेच फक्त् सत्य आहे. आज तुझ्यासोबत तुझे शरीर आहे. तेव्हा तु तुझ्या शरीराचा, मिळालेल्या जीवनाचा सदुपयोग कर. आणि जे मिळविण्यासाठी तु हया जगात आलेला आहेस. ते प्राप्त कर. व मोकळा हो. कारण कल करेंगे असे म्हणशील तर तो भविष्यकाळ ठरेल. आणि

भविष्यकाळ हा केवळ काळाच्याच हातात आहे. त्यावर तुझा जोरा नाही. 

*************


एक घडी आधी घडी, आधी मे पुनि आध I

कबीर संगत साधु की, कटै कोटि अपराध I

भावार्थ :- 


दिवसातुन शक्य असेल तर एक घटीका, शक्य नसल्यास अर्धी घटिका किंवा तेही शक्य नसेल तर अर्ध्यामधली पण अर्धी घटिका वेळ मानवाने संतसज्जनांचे संगतीत रहावयास हवे. कारण संत सज्जनांच्या संगतीत राहील्याने त्यांचे सदविचारांनी, त्यांचे कृपाशिर्वादामुळे मानवाचे करोडो अपराध देखील सहजपणे नष्ट होतात. यात शंकाच नाही. ज्याप्रमाणे नारदांच्या एका उपदेशामुळे वाल्या नावाच्या दरोडेखोराच्या पाषाण हृदयी मनात देखील परिवर्तन होवून, त्याने केलेल्या सहस्त्रावधी मनुष्य वधाच्या पातकातुन त्याची सहजरित्या सुटका होवून, तो महर्षी वाल्मिकी म्हणुन उदयास आला. आणि त्यांच्या प्रतिभेतुन रामायण हे महाकाव्य साकारल्या गेले हे उदाहरण याबाबत पुरेसे ठरणार नाही काय ॽ


------------------------------------

0