दासबोध निरुपण Dasbodh nirupan...समास दुसरा - गणेशस्तवन


श्रीमत् दासबोध हा सज्जनगडचे सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामीं महाराजांनी प्रभु भगवान श्रीरामाच्या आज्ञेने चारित्र्य व मांगल्यरुपी काव्यग्रंथ रचला. समर्थ हे मुळात स्वभावाने कडक व शिस्तप्रिय असत. आजही कित्येक साधकांना त्यांच्या अनुशासनाचा गंभीर अनुभव आहे.

सद्गुरु समर्थांचा दास होणे ही वरवरची अभिव्यक्ती नाही. त्यासाठी समर्थ म्हणतात, " अधी श्रीमत् समजुन घे आणि ह्दयातील मधुस्पर्श जाणुन घे"


श्रीमत् दासबोध ग्रंथराज समाधी ग्रंथ असुन दासाला समर्थांची पुर्ण कृपा करवुन देण्यात तत्पर आहे. याअन्वये अधी "श्रीमत् दासबोध " सा ग्रंथबीजाचा मतितार्थ समजावून घेणे अतिशय महत्वाचे ठरते.

श्रीमत् दासबोध - श्रीमत् म्हणजे परब्रम्ह अर्थात सद्गुरु महाराज याचा मतितार्थ असा की, ॐ प्रणव बीजात एकुण साडेतीन मात्रा आहेत. त्यापैकी अर्धीमात्रा जी निरंतर आकाशात स्थित असते ती मात्रा म्हणजे श्रीमत् असे आहे. सर्वांनी याच मात्रेचे ध्यान केले पाहीजे कारण येथुनच सर्व देव, ऋषीमुनी व सिद्धपुरुषांचे वलयमान असते.

श्रीमताचा दास कसा असावा याचा आत्मबोध म्हणजेच...

समास दुसरा गणेशस्तवन श्रीराम ॥

ॐ नमो जि गणनायेका । 

सर्वसिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका ।
बोधरुपा ॥ १ ॥

भावार्थ :- 


सर्व सिद्धींची फळें देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहींसा करणारा, आणि ज्ञानस्वरुप, ओंकाररुप जो गणपति त्याला मी नमस्कार करतो. तूझ्या उपासनेने सर्व प्रकारच्या सिद्धिंचे फळ मिळते . मुख्यत्वाने जीव व शिव ह्यांचे ऐक्य सिद्ध होते. अज्ञान व भ्रम नाहीसे होतात. बोध म्हणजे ज्ञान हेच तुझे खरे स्वरूप आहे .


----------------------------


माझिये अंतरीं भरावें । 

सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाग्सुंन्यास वदवावें । 
कृपाकटाक्षेंकरुनी ॥ २ ॥

भावार्थ :- 


गणपतीनें माझें अंतःकरणी वास्वव करुन आपल्या कृपाकटाक्षाने ग्रंथ वदविण्यास मला मुक्याला बळ द्यावे. माझ्या अंत:करणात सतत व्यापून राहून तू माझ्याकडे क्रुपाद्रुष्टीने पहात रहावे. आत्मरूपाने तू माझ्या ' वाणीची वाणी असल्याने माझी वाणी स्वतंत्रपणे काहीच बोलू शकत नाही. तूझ्या सत्तेवर तिला बोलण्याचे सामर्थ्य दे . अशी विनंती येथे केलेली आहे .


-----------------------------


तुझिये कृपेचेनि बळें । 

वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणी विश्र्वभक्षक काळें । 
दास्यत्व कीजे ॥ ३ ॥

भावार्थ :- 


गणेशाच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचें आवरण विरुन जातें आणि सारें विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. तुझी क्रुपा झाल्यानंतर माझ्या अंत:करणातील भ्रमाचे पापुद्रे निघून जातील. सर्व विश्वाला ग्रासनारा प्रत्यक्ष काळ सुद्धा माझी सेवा करील. ईश्वर काळाचा काळ आहे. गणपती रूप ईशाची क्रुपा झाली की इतर सर्वांचे सामर्थ्य तुच्छ आहे. ग्रंथ पूर्ण होईपर्यंत काळाची ही माझ्यावर सत्ता चालणार नाही.


----------------------------


येतां कृपेची निज उडी । 

विघ्नें कांपती बापुडीं ।
होऊन जाती देशधडी । 
नाममात्रें ॥ ४ ॥ 

भावार्थ :- 

अशी त्याची कृपा झाली की संकटें भयाने थरथर कापूं लागतात. तसेच त्याच्या नामस्मरणाने ती नाहींशी होऊन जातात. तूझ्या क्रुपेने उडी घातली की बिचारी वीघ्ने थरथर कापू लागतात. माझ्या ग्रंथ रचनेच्या कार्यात ती आडवी येणार नाहीत. याची शाश्वती मला आहे. केवळ तुझे नाव घेतले तरी ती दूरवर पळून जातात.


-----------------------------


म्हणौन नामें विघ्नहर । 

आम्हां अनाथांचें माहेर । 
आदिकरुनि हरीहर । 
अमर वंदिती ॥ ५ ॥

भावार्थ :- 


म्हणून त्याला विघ्नहर म्हणतात. आम्हां अनाथांचे ते माहेर आहे. आम्ही तुझ्या वाचून अनाथ असून तूच आमचा आधार आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने श्री विष्णू , श्री शंकर व अन्य देव हे तुलाच नमस्कार करतात. हिंदू धर्मात पूजनीय असणाऱ्या उग्र देवतापैकी एक आक्रमक व न्याय गम्भीर दैवत म्हणजे भगवान श्री गणपती आहेत. श्री गणपती स्वयंभू तत्वाने मुर्त्युलोकी अवतरनारे प्रमुख दैवत आहे .


-----------------------------


वंदूनियां मंगळनिधी । 

कार्य करितां सर्वसिद्धी ।
आघात अडथळें उपाधी । 
बाधूं सकेना ॥ ६ ॥

भावार्थ :- 


जगांत जें मंगळ आहे ते तू आहेस . तूला नमस्कार करुन कार्य केल्यास ते सिद्ध होते. अडथळें, अडचणी किंवा संकटे यांचा त्रास होत नाही. सर्व मांगल्याचा तू संचयच आहेस. तुला वंदन करून कोणत्याही कार्याला आरम्भ केला असता ते सिद्धिला जाते. त्या कार्यात घातपात , अडचणी व नसत्या कटकटी निर्माण होत नाहीत .

तुझ्या स्मरणात आरम्भलेले कर्म जसे होते तसे ते पूर्णच असते कारण तू पूर्ण आहेस. 

--------------------


जयाचें आठवितां ध्यान । 

वाटे परम समाधान । 
नेत्रीं रिघोनियां मन । 
पांगुळें सर्वांगी ॥ ७ ॥

भावार्थ :- 


त्याचे रुप, ध्यान आठविल्यावर समाधान वाटते. मन डोळ्यांमध्ये अवतरुन बाकी सर्व क्रिया बंद करुन ते रुप पाहू लागते.  सगुण मूर्तीचे ध्यान केले तरी अंत:करण व्रुतीचे समाधान होते. ती त्या ध्यानाने शांत होते. अंतकरण व्रुती डोळ्यातून बाहेर पडून त्याच्या रूपाला खिळून राहते. तिचे मनोवृत्ती , बुद्धीव्रुती  व अहंव्रुतीचे व्यापार  थाम्बतात. एक चित्तव्रुतीच ध्यानाला धरून बसते. ध्यानाकार होवून राहते. 


-----------------------------


सगुण रुपाची टेव । 

माहा लावण्य लाघव । 
नृत्य करितां सकळ देव । 
तटस्त होती ॥ ८॥

भावार्थ :-  


ते गणेशाचे सगुण रुप विलक्षण आहे. तो नाचू लागला कीं सगळे देव नुसते पाहातच बसतात. श्री गणेशाचे रूप अत्यंत देखणे असून त्याच्या हालचाली सहज व चपळतेने होतात. विशिष्ट शैलीने ते न्रूत्य करू लागतात तेव्हा सर्व देव त्या आविष्काराने स्तब्ध होतात. भगवान शंकराने जसा अतिउग्र पाचवा अवतार काळभैरव नावाने घेतला त्याच प्रमाणे श्री गणेशाचा अतिउग्र अवतार काळभ्रूशुंडी आहे. हा अवतार मल्ल युद्धात आणि महायुद्धात विजय मिळवून देतो.


==============================

सर्वकाळ मदोन्मत्त । 
सदा आनंदे डुल्लत ।
हरुषें निर्भर उद्दित । 
सुप्रसन्नवदनु ॥ ९ ॥

भावार्थ :-


त्याच्या गंडस्थळांतून सारखा मद गळत असतो. म्हणून जेव्हां पहावे तेव्हां तो मस्त दिसतो, परमानंदाने नेहमी डोलत असतो. आंतून येणार्‍या आनंदाच्या उर्मींनी त्याचे मुख प्रसन्न असते. तो आपल्याच स्वरूप स्थितीत सदा धुंद असून स्वानंदाने डोलत असतो. आनंदघन असलेला तो सतत उत्साही व प्रसन्न वदनाचा असतो. सतत प्रसन्न राहतो.


-----------------------------


भव्यरुप वितंड । 

भीममूर्ति महा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । 
सिंधूर चर्चिला ॥ १० ॥

भावार्थ :- 


तो रुपाने भव्य आणि धिप्पाड आहे. देहाने प्रचंड शक्तिमान आहे. त्याच्या विस्तीर्ण कपाळी शेंदूर विलसत आहे. श्री गजाननाचे एकूण दर्शन  भव्य आहे. त्याचे हत्तीचे मुख वेगळेच दिसते . मूर्ती फार प्रचंड आणि बलदंड दिसते. हत्ती सारख्या मोठ्या मस्तकावर सतत शेंदूराचा लेप लावलेला असतो.  तसेच श्री गणेशाचे योग साधनेतील स्थान हे सुमेरु स्थान आहे . त्याची प्रचिती सर्व योगी पुरुषांना अनायासे येते. देहातील मुलाधार चक्र व अंतिम सहस्त्र।र चक्राची देवता श्री गणेश आहे .


नाना सुगंध परिमळें ।

थवथवां गळती गंडस्थळें । 
तेथें आली षट्पदकुळें ।
झुंकारशब्दें ॥ ११ ॥

भावार्थ :- 


त्याच्या गंडस्थळातून अनेक येणारा मदस्त्त्राव सारखा पाझरतो, त्याच्या गंडस्थळांतून थबथबा गळणार्‍या मदाने व त्या मदाच्या सुगंधी वासाने घूं घूं आवाज तो सुगंध फुलांचाच आहे असे वाटून अनेक भ्रमर त्याभोवती गूंजारव करीत फिरतात.


-----------------------------


मुर्डीव शुंडादंड सरळे ।

शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । 
क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२ ॥

भावार्थ :- 


एखाद्या सोटासारखी त्याची सोंड सरळ, मुरडलेली किंवा कधी गुंडाळलेली असते. तर दात सरळ आहेत , मस्तकावर गंडस्थळांचा उंचवटा  शोभुन दिसत आहे. खालचा ओठ लोंबलेला असून त्याच्या अणकुचीदार टोकातून हळूहळू  उग्र गंधाचा मद क्षणक्षणाला गळत आहे.


-----------------------------


चौदा विद्यांचा गोसांवी । 

हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । 
फडै फडै कर्णथापा ॥ १३ ॥

भावार्थ :- 


हा चौदा विद्यांचा स्वामी आहे म्हणून त्याचे चौदा विध्यांवर स्वामित्व आहे. त्यात तो अत्यंत कुशल आहे. डोळे लहान डोळे चौफेर पाहतात , लहान डोळे हे बुद्धीमतेचे प्रतीक समजले जाते. त्यांची सारखी उघडझाप चाललेली असते. लांबरुंद असलेले लवचिक कान सारखे फडफड आवाज करीत फडकवीत असतो.


 येथे चौदा विद्या पुढीलप्रमाणे.  • 1) चार वेदांच्या चार विद्या, 
  • 2) सहा वेदांगांच्या विद्या 
  • 3) न्याय, मीमांसा,  पुराणे,  धर्मशास्त्र हे चार 


हया सर्व ऐकून चौदा विद्या आहे .

-----------------------------

   
रत्नखचित मुगुटीं झळाळ । 
नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । 
वरी जडिले झमकती ॥ १४ ॥

भावार्थ :


त्याच्या मुगुटांत सुंदर रंगांची रत्नें आहेत. त्याचा मुगुट रत्नानांनी मढवलेला असून अत्यंत तेजस्वी आहे. त्या रत्नानचे अनेक रंगाचे तेज फाकलेले असून त्यांचे सुंदर रंग आजुबाजुला प्रकाशतात. गणपतीच्या कानांतील कुंडलें चमकतातच पण त्यांत बसविलेले नीळमणी जास्त प्रकाश सोडतात.


-----------------------------


दंत शुभ्र सइट । 

रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । 
तळपती लघु लघु ॥ १५ ॥

भावार्थ :- 


त्याचे दांत पांढरे स्वच्छ  व घट्ट मजबूत आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचें कडें आहे. त्याखाली सोन्याची लहान पानें चमकत आहेत. कपाळावरील दोन्ही उंचवट्यावर सोन्याचे अलंकार असून त्यांच्या बारीक घंटीका बसविल्या आहेत. त्याचा किणकिण असा आवाज होत आहे.  .


-----------------------------


लवथवित मलये दोंद । 

वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । 
वाजती झणत्कारें ॥ १६ ॥   

भावार्थ :- 


त्याचे मोठे पोट थुलथुलीत असून शरीराच्या हालचाली बरोबर ते सारखे  हलत असते. त्याच्या कमरेला नागबंध नावाचा अलंकार  कमरपट्यासारखा बांधलेला आहे. कमरेच्या साखळीला असलेली छोटी छोटी घुंगुरे मंद मंद अशा मंजुळ आवाजांत झणत्कारत आहेत.  


-----------------------------


चतुर्भुज लंबोदर । 

कासे कासिला पीतांबर । 
फडके दोंदिचा फणीवर । 
धुधूकार टाकी ॥ १७ ॥

भावार्थ :- 


त्याला चार हात आहेत. त्याचे पोट फार  मोठे व लम्बवर्तुळाकार असे सुटलेले आहे. कमरेला पिवळ्या रंगाचे रेशमी पीतांबर आहे. त्याच्या पोटावरचा नाग फणा काढून फुत्कारत आहे. 


-----------------------------


डोलवी मस्तक जिव्हा लाळी । 

घालून बैसला वेटाळी ।
उभारोनी नाभिकमळीं । 
टकमकां पाहे ॥ १८ ॥

भावार्थ :-


तो नाग आपली फणा डोलवीत असून जीभ मूखाबाहेर नाचवीत आहे. तो त्याच्या नाभि भोवती वेटोले घालून फणा वर काढून टकमक बघत आहे. सर्प हा पंचविषयाचा प्रतिनिधी मानण्याचा संकेत आहे. श्री शंकर  किंवा  गजानन अंगाखांद्यावर सर्प खेळवतात असे चित्र नेहमी दिसते. म्हणजे विषयरूप सर्प त्यांना दंश न करता खेळत राहतो. कारण त्यांच्या ठिकाणी पुढील भ्रम नसतात.


१) मी सुखरूप नाही २) विषयात सुख आहे ३) मी विषयांचा सम्पादक व भोक्ता आहे . जीवाला हे भ्रम असतात .त्यामूळे त्यांना पंचविषय बाधतात .


=======================


समास दुसरा गणेशस्तवन


नाना याति कुशममाळा । 

व्याळपरियंत रुळती गळा ।
रत्नजडित हृदयकमळा । 
वरी पदक शोभे ॥ १९ ॥

भावार्थ :- 


नाना प्रकारच्या फुलांच्या माळा गणपतीच्या गळ्यांत असून त्या कमरेपर्यंत लोंबत आहेत. बेंबीवर सर्पाचे वेटोले असल्याने त्या माळा त्याला स्पर्श करीत आहेत. ह्रदयकमळावर  रत्नजडित सुवर्ण पदक शोभत आहे.


----------------------------


शोभे फरश आणि कमळ । 

अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ। 
तयावरी अति प्रीति ॥ २० ॥

भावार्थ :-


चार हातांपैकी एका हातांत परशु, दुसर्‍यांत कमळ तर तिसर्‍या हातांत तेजस्वी आणि टोकदार अंकुश व चवथ्या हातांत त्याला अतिशय आवडणारा गोल मोदक आहे. ज्ञानदेवांनी मोदकावर वेदांतविधेचे रूपक केले आहे.


----------------------------


नट नाट्य कळा कुंसरी । 

नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । 
उपांग हुंकारे ॥ २१ ।l

भावार्थ :- 


नटांजवळ जी नाट्यविद्या असते ते कौशल्य तूझ्या पाशी आहे.  तू अभिनयात कुशल आहे. हया अभिनयासह तू नाना प्रकारच्या  हावभावयुक्त कलाकौशल्याने तू टाळ व मृदंग यांच्या तालावर तू नृत्य करतोस . तुही त्यात तुझा हुंकार भरतोस .स्थिरता नाहीं येक क्षण । 

चपळविशंई अग्रगण ।
साजिरी मूर्ति सुलक्षण । 
लावण्यखाणी ॥ २२ ॥

भावार्थ :- 


गणपति क्षणभरसुद्धा स्थिर नसतो,  त्याला स्वस्थता ती कशी हे ही ठावूक नाही. चपळपणांत तो अग्री आहे. लावण्याची खाण  असलेली त्याची सौंदर्यवान मूर्ति मोठी सुंदर व देखणी दिसते आहे. ती खूपच लोभसवाणी दिसते.


-----------------------------


समास दुसरा गणेशस्तवन


रुणझुणा वाजती नेपुरें । 

वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । 
पाउलें दोनी ॥ २३ ॥

भावार्थः - 


त्या गणेशाच्या पायांतील पैंजणें रुणुझुणु असा गोड आवाज करत आहेत. वाकींचाही मोठा मधुर आवाज होतो. घुंघरु घालुन न्रुत्य करताना त्याची पाऊले खुपच मनोहर दिसतात.


-----------------------------


ईश्र्वरसभेसी आली शोभा । 

दिव्यांबरांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लभा । 
अष्ट नायका होती ॥ २४ ॥

भावार्थः - 


ईश्र्वराच्या सभेंत गणपति शोभा निर्माण करतो. त्याच्या दिव्य  पितम्बराचे तेज सर्व सभेत पसरते. घ्रूताची, तिलोत्तमा, उर्वशी, रम्भा, मेनका, सुकेशी, मंजूघोषा व पूर्वचिती ह्या  अष्टनायिका त्याच्या सान्निध्यांत साहित्य निर्माण करणारास साह्यभूत होतात. 


-----------------------------


ऐसा सर्वांगें सुंदरु । 

सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु । 
साष्टांग भावें ॥ २५ ॥

भावार्थः - 


असा हा गणपति सर्वांगाने सुंदर आहे. तो सर्व विद्यांचे माहेरघर असून त्याला मी शरीराच्या आठही अंगानी भावपूर्ण नमस्कार करतो. अष्ट अंगे - गुडघे , पाऊले , हात , छाती , बुद्धी, मस्तक, वाणी, डोळे., किंवा दोन गुडघे , दोन पाय,  दोन हात, वाचा व मन.


----------------------------


ध्यान गणेशाचें वर्णितां । 

मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । 
वोळे सरस्वती ॥ २६ ॥

भावार्थः -


गणेशाच्या रुपाचे चिंतन अज्ञानी माणसाच्या बुद्धिंत ज्ञानाचा उगम करते. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले की ते ऐकणारास सरस्वती प्रसन्न होते.


==============================

0