ॐ कार त्राटक ( Om Tratak ) - आत्म्याचे मुळ निवासस्थान ॐ अनाहत नाद...!


सर्व मंत्रांमधे ओंकार उत्तम रीतीने ख्याति पावलेला आहे. ॐ काररुपी होडीनेच संसार सागर सहज तरु शकू. योगसुत्रात म्हटले आहे - ईश्वराचा वाचक प्रणव म्हणजे ॐ कार आहे. ईश्वर प्रकर्षत्वाने त्याच्या योगाने स्तविला जातो. त्यायोगे ॐ काराला प्रणव अशी संज्ञा आहे.


जगामध्ये जन्म घेणारा प्राणीमात्र मर्त्य आहे. मृत्यूच्या पाशातुन सुटण्यासाठी देवांनी वेद-त्रयीचा आश्रय घेतला. ' छद् ' - धातु आच्छादनार्थक आहे. देव वेदांच्या गुहेत लपले म्हणुन वेदांना ' छन्दस् ' अशी संज्ञा प्राप्त झाली. परंतु तेथेही मृत्युने देवांचा पाठलाग केला तेव्हा देवांनी ओंकाराचा आश्रय घेतला. हा ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले दुर्गम व अभेद्य स्थान आहे. तेथे मृत्युला प्रवेश मिळला नाही. देव अमर झाले. ओंकाराचे हे सामर्थ्य ध्यानात घेऊन उपनिषदांच्या ऋषींनी माणसाला सल्ला दिला की, ' ज्याला मृत्युच्या भयापासुन सुटायचे आहे त्याने ॐ काराची साधना करावी '. ओंकाराचा महिमा उद्घोषित करणारी ही आख्यायिका छांदोग्य उपनिषदात सांगण्यात आली आहे.

प्रणवोपासना करण्यापूर्वी खालीलप्रमाणे ओंकारस्तोत्राचा तत्पुर्वी पाठ करावा. 

आवाह्याम्यहं देवमोंकारं परमेश्वरम् l
त्रिमात्रं त्र्यक्षरं दिव्यं त्रिपदं च त्रिदैवतम् ll१ll
अक्षरं त्रिगुणाकारं सर्वाक्षरमयं शुभम् l
त्र्यर्णव प्रणवं हंसं स्त्रष्टारं परमेश्वरम् ll२ll
अनादिनिधनं देवमप्रमेयं सनातनम् l
परं परतरं बीजं निर्मलं निष्कलं शुभम् ll३ll
ओकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः l
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ll४ll

ॐ कार म्हणजे वेदत्रयीचे सार. ॐ काराची विद्या ही अक्षर विद्या आहे. अक्षर म्हणजे अक्षयी अविनाशी व अविनाशी म्हणजे परमब्रम्ह. ' ओमित्येकाक्षरं ब्रम्ह ' ह्या शब्दांनी भगवंताने त्याचा माहिमा वर्णन केला. वेदांच्या उपासनेतुन फार फार तर स्वर्ग मिळेल. पण ॐ काराच्या उपासनेतुन अमृतत्वाची प्राप्ती होते. ॐ कार त्राटक साधना अतीउच्च कोटीची साधना बाह्य व अंतः स्वरुपात साधक यथाशक्ति आचरणात आणु शकतात. ही साधना करण्याहेतु सद्गुरु महाराजांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते. संंबंधित ॐ कार साधनेबद्दल साक्षात दाणोलीचे सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांनी त्यांचे शिष्य संचारमुर्ती योगीराज सद्गुरु वायंगणकर महाराजांना माहीती दिली.


ॐ काराची ' प्रणव ' व ' उद्गीथ ' ही ईतर दोन नावेँ आहेत. ' ण ' धातुचा अर्थ आहे, स्तुती करणें. ह्या धातुला ' प्र ' उपसर्ग लावुन ' प्रणव ' हा शब्द बनला आहे., त्याचा अर्थ प्रकर्षाने केलीली स्तुती, उत्तम आत्मस्तोत्र असा होतो. ॐ काराचे दुसरे नाव ' उद्गीथ ' आहे. ' गै ' धातुचा अर्थ आहे ' गाणे ', त्याला ' उत् ' उपसर्ग लावून हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ उत्तम  नादगीत असा आहे. परब्रम्हाचे उत्तम स्तवन करण्याच्या हेतुने ज्याच्या साडेतीन मात्रांमधे सर्व आत्ससंकेत सामावलेले आहे तो परम तत्वाचा वाचक बनला.



ॐ साडेतीन अक्षरांचा बनलेला आहे. त्यातील पहिली मात्रा ' अ कार ' आहे. दुसरी मात्रा ' उ कार ' आहे. तिसरी मात्रा ' म कार ' आहे. आणखी अर्धमात्रा मिळुन ओंकार व्यापक आहे. प्रत्येक मातूरा भिन्न ब्रम्हाण्डीय कार्यक्षेत्र व्यक्त करते. सृष्टिच्याया व्यापकतेच्या दृष्टिकोनातून ' अ ' कार ह्या पहील्या मात्रेत पृथ्वी व्यापक आहे. ' उ ' कारात अंतरिक्ष व ' म ' कारात सुक्ष्म लोक व्याप्त आहे. सृष्टीच्या उत्पत्ति, स्थिती व संहाराच्या दृष्टिकोनातून ' अ ' कार सृजनात्मक, ' उ ' पालनत्मक व ' म ' संहारात्मक शक्तिंचा मालक आहे. जीवात्म्याच्या तीन स्थिती विश्व, तेजस व प्राज्ञ ही तत्वे ' अ ' कार, ' उ ' कार व ' म ' काराने व्याप्त होतात.


ॐ कार त्राटक करतेवेळी ध्यान माध्यमातून ॐ कारात ' अ ' कारावर भर दिला तर आधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते. ' उ ' कारावर भर दिला तर आधिदैविक सामर्थ्याचे सुचक आहे व ' म ' कारावर भार दिला तर ब्रम्ह साक्षात्काराला सहाय्यभुत होते.त्यायोगे जीवनाची सार्थकता साधता येते. जीवृन अमृतमय बनते. ह्या तिन्ही मात्रा मानवी शक्तिचे प्रातिक आहे. इंन्द्रिंयांकडुन होणारी कर्मे, मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्में ह्या तिन्ही कर्मांना ॐ कार त्राटक तेजस्वी बनवते. त्यायोगे मानवाने अंतरबाह्य योग्यरितीने आत्म विनियोग करणें आवश्यक आहे. शेवटी राहीलेली अर्धमात्रा ही मागील तिन्ही मात्रांची सहयोगी सुचक आहे.

वेदमंत्र ॐ कार पुर्वकच उच्चारले जातात. ॐ काराशिवाय वैदिक मंत्र लंगडे गणले जातात. ॐ   कार संयोगातुन केलेली कर्मे सात्विक बनतात. त्या अर्थी आध्यात्मिक ऊबंटूत आपण श्री काळभैरव मंत्रात सामुहीक मंत्र उच्चार करण्यापुर्वी ॐ जपले जाते. समग्र आकाशगंगा व अनंत कोटी ब्रम्हांड ॐ कारात सामावलेले आहे. ॐ काराची उपासना करण्यासाठी योग्य अधिकार असला पाहीजे. दृश्य किंवा श्राव्य जगतातुन विरक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत ॐ काराची उपासना करणे हा अनधिकारी प्रयत्न आहे. ज्याने जीवनातील द्वद्वांमये संतुलन ठेवण्याचा शिक्षण घेतले आहे, ज्याची वृत्ती अनासक्त बनली आहे, वैराग्याची प्राप्ती झाली आहे तोच ॐ कार त्राटक उपासनेचा अधिकारी गणला जातो.


ॐ कार परमतत्वाचे परमात्म्याचे प्रतिक आहे. सर्व १६ विद्यांमधे समग्र मतीतार्थ ॐ कारच आहे. प्राण, वेद व तेजःपुंजाचे प्रतिक आहे. ॐ कार तत्व जर खर्या अर्थाने आत्मसात केले तर विवंभर स्वतः आपल्या ह्दयांगणात येऊन खेळू लागेल. त्या अर्थी सद्गुरु महाराजांच्या चरण कमळांचा निःस्वार्थी, प्रामाणिक व पारदर्शक नितीमत्तेने आश्रय घेतला पाहीजे. ह्या आश्रयस्थानी आपण आणि आपले महाराज यांच्यातील अनपेक्षित व बाह्य दृष्टीला न दिसणारे अंतर कसे कमी होऊन दत्त तत्वाची प्राप्ती होईल यावर गांभीर्यपुर्ण विचार करता आला पाहीजे.


ॐ कार त्राटकाची अभिव्यक्ती समजुन घेणे व संबंधित साधनेची आत्मचिकित्सेने पुर्वतयारी कशी करावी यासंबंधी अधीक माहीतीसाठी ट्रस्टला संपर्क करणे.


महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.


0