नवरात्र उत्सव अपेक्षित मानसिकता, साधनापुर्व तयारी व मतितार्थ - श्री स्वामी समर्थ


नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस.  जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत;  तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते.  जगात तपश्चर्येला यश मिळते, ही गोष्ट सत्याच्या उपासकानी विसरता कामा नये.  तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत मूल्ये देखील विजयी झाली आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची अंधुक कल्पना देते.  


दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार किंवा संस्कृती ह्यांची कोणी पूजा करीत नाही.  आश्विन महिन्यात येणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे.  महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता.  त्याने स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच देवाना व मनुष्याना ' त्राहि माम ' करून सोडले होते.  दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व दैवी लोक भयग्रस्त झाले होते.  धैर्य घालवून बसलेल्या देवानी ब्रम्हा, विष्णू व महेश ह्यांची आराधना केली.  देवांच्या  प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवाना महिषासुराचा राग आला.  त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवीशक्ती निर्माण झाली.  सर्व देवानी जयजयकार करून ती सांभाळली, तिचे पूजन केले.  तिला स्वतःच्या दिव्य आयुधानी मंडित केली.  ह्या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून माहिषासुराला मारले.  

आसुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवाना अभय दिले.  ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा.  ह्या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा.  आजही महिषासुर प्रत्येकाच्या हृदयात स्वतःचे स्थान जमवून बसला आहे आणि आत असलेल्या दैवी वृत्तीना गुदमरवून सोडले आहे.  ह्या महिषासुराच्या मायेला ओळखले पाहिजे.  तिच्या आसुरी जुलमापासून मुक्त होण्यासाठी आवश्यकता आहे, दैवी शक्तीच्या आराधनेची !  नऊच्या नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेऊन आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस तेच नवरात्राचे दिवस !


आपली भ्रान्त समजूत आहे की, असुर म्हणजे मोठ्या दाताचे, मोठ्या नखांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस!  खरे पाहता असुर म्हणजे ' असुषु रमन्ते इति असुर: '  प्राणातच रममाण होणारे, भोगातच रममाण होणारे.  तसेच महिष म्हणजे रेडा. त्या दृष्टीने पाहता रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर.  रेडा नेहमी स्वतःचेच सुख पाहतो.  समाजात ही रेड्याची वृत्ती पसरत चालली आहे.  परिणामतः संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहीत व भावशून्य बनला आहे.  समाजात आज व्यक्तिवाद व स्वार्थिकपरायणता अमर्याद बनून महिषासुर रूपात नाचत आहे.  ह्या महिषासुराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आईजवळ सामर्थ्य मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्राचे दिवस !


आपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्व दिलेले आहे.  महाभारताचे पानन पान बलोपासना व शौर्यपूजा ह्यानी भरलेले आहे.  व्यास भीष्म व कृष्ण ह्यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, पौरुष व पराक्रम ह्यानी भरलेली आहेत.  महर्षी व्यासानी पांडवाना शक्ती उपासनेचे महत्त्व समजावले आहे.  त्यानी पांडवाना उपदेश केला आहे की, तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर हात जोडून, बसून राहून चालणार नाही.  शक्तीची उपासना करावी लागेल.  अर्जुनाला दिव्य अन्न प्राप्त करण्यासाठी व्यासानीच स्वर्गात जाण्याची सूचना केली होती.
अनादि कालापासून आसुरीवृत्ती सद्विचारावर,  दैवी विचारावर मात करीत आलेली आहे,  आणि दैवी विचार अडचणीत येताच देवानी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे.  सामर्थ्य मागितले आहे आणि आसुरीवृत्तीचा पराभव केला आहे.  केवळ सद्विचार आहेत तेवढे पुरत नाहीत. त्यांचे रक्षण होणे देखील आवश्यक आहे.  आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे.


आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे.  ' संघे शक्ति: कलौ युगे। '  ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांची संघटना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  ह्या संघटनेत प्रमुखस्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच आपल्यात शक्ती प्रगट होईल हे सुचविण्यासाठीच नवरात्राच्या दिवसात गरबा किंवा रास ह्यांच्या रूपात देवीच्या भोवती फिरायचे असते.  देवीच्या सभोवती फिरता फिरता तिला सांगितले पाहिजे की, ' माते ! तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे.  आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार येतो, आमची महिषवृत्ती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात त्याना तू खाऊन टाक. '


आई जगदंबेची आपली ही उपासना नवरात्रात सुरू होते.  पण ती केवळ नऊ दिवसापुरती सीमित राहू नये हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे.  क्षणाक्षणाची शक्ति-उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायला शक्ती प्रदान करील.


नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस.  आईच्या पूजेचे दिवस.  ' खा, प्या व मजा करा '  अशा आसुरी विचारश्रेणीवर विजय मिळविण्याचे दिवस.  संघशक्तीचे महत्त्व व भक्तीची महत्ता समजावण्याचे दिवस। तसेच तपश्चर्येचा महिमा व एकता ह्यांचे महत्त्व समजावणारे दिवस!  ह्या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भरून टाका.


संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below