भाऊबीज : भाऊ बहिणीच्या नात्यातील नैतिक मुल्ये.- Rakshabandhan


नव्या वर्षापासून जुने रागद्वेष विसरायचे.  समग्र विश्वावर प्रेम करण्याचे संकल्प करायचे.  त्याची सुरुवात भाऊ-बहिणीच्या निर्व्याज प्रेमाने व्हावी हे अगदी योग्यच आहे.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या या द्वितीयेला यमद्वितीया म्हणतात.  तीच आपली भाऊबीज.  त्या दिवशी यमुनेने आपल्या घरी यमाची पूजा केली व त्याला जेऊं घातले.  प्रसन्न झालेल्या यमराजाने बहिणीला वरदान मागायला सांगितले.  यमुनेने मागितले : ' हे भाऊराया, दर वर्षी ह्याच दिवशी तू माझ्या घरी जेवायला यावे.  तसेच,  या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचे.'
बंधूचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा करायची असते.
आपला भाऊ भोगवादी बनून जीवन घालवतो किंवा अगदी सामान्य मानव बनून जीवनाचा अमूल्यकाळ केवळ रोजच्या सामान्य घटनात व्यतीत करतो, ही गोष्ट कोणत्याही स्नेहपूर्ण व संवेदनाशील बहिणीला असह्य होते.  सांस्कृतिक दृष्टीने जागृत असलेली बहीण आपला भाऊ समान्यापेक्षा वरचे असामान्य जीवन जगावा अशी तीव्र कामना बाळगून असते.  आपला भाऊ महानतेच्या मोठ्यात मोठ्या शिखरावर चढावा अशी मंगल कामना करणाऱ्या बहिणीच्या हृदयातून स्वतःच्या बंधूच्या जीवनावर तशाच प्रकारच्या आशीर्वादाची बरसात होत असते.
असा कर्तुत्वशील भाऊ व्हावा अशी कामना करणारी बहीण बीजेच्या दिवशी भावाचे पूजन करते; हे किती सूचक आहे!  बीजेचा चंद्र कर्तृत्वाचे प्रतीक आहे.  स्वतःचा भाऊ बीजेच्या चंद्रासारखा कर्मयोगी व्हावा,  अशा बहिणीच्या अभिलाषेचे द्योतक हा उत्सव आहे.  बीजेचा चंद्र विकसनशील आहे.  रामायणात एक प्रसंग आहे.  त्यात रावण त्याच्यातील व रामातील फरक सीतेला विचारतो.  सीता सांगते : ' तू पूर्णिमेचा चन्द्र आहेस तर राम बीजेचा चन्द्र आहे.  अर्थात उद्यापासून तुझे क्षयाचे दिवस सुरू होणार आहेत,  तर रामाची जीवनकला उत्तरोत्तर  विकास पावणार आहे. '

भारतीय संस्कृती औदार्य व कर्तृत्व ह्यांची पूजक आहे.  ती अशा कर्मयोग्यांचाच सन्मान करते.  म्हणूनच कदाचित भगवान शंकराने बीजेचा चन्द्र माथ्यावर धारण केला असावा !

बीजेच्या चन्द्रआचे  दर्शन घेऊन लोक कृतार्थता अनुभवतात.  त्याचे दर्शन पवित्र, मंगलदायक व पावन आहे.  कदाचित वद्य पक्षात पाहायला मिळत नाही म्हणूनही बीजेच्या चंद्राचे दर्शन मधुर व आल्हाददायक वाटत असेल.

बहीण विवाह होऊन सासरी गेल्यानंतर भावाचे मिलन रोज शक्य नसते.  बीजेच्या चांद्रप्रमाणे भाऊ बहिणीला केव्हा केव्हा भेटत असतो.  भावाच्या मिलनात व बीजेच्या चंद्रदर्शनात असलेली दुर्लभता ध्यानात घेऊन आपल्या शास्त्रकारांनी भाऊ व बीज यांना जोडून टाकले व भाऊबीजेचा एक आगळा उत्सव निर्माण केला.  काही वेळा खूप दूर असल्यामुळे भाऊबीजेच्या दिवशीही जर भाऊ बहिणीला भेटू शकला नाही तर भावाद्र बहीण आकाशातील चंद्राला स्वतःचा भाऊ समजून त्या दिवशी त्याची पूजा करते. भाऊदेखील त्याच वेळी चंद्राला पाहात बसतो. चंद्राच्या माध्यमाने भाऊ व बहीण परोक्ष मिलनाचा अनुभव घेतात.  वैज्ञानिक चंद्रावर पोचले त्याहून हजारो वर्षांपूर्वी भारतीय नारीने  चंद्रबरोबरचा  आपला संबंध प्रस्थापित केलेला आहे.  भारतीय स्त्रीला चंद्र घरचा वाटतो, जवळचा वाटतो, स्वतःचा वाटतो, भाऊ वाटतो आणि म्हणून तिची बाळेही चंद्राला ' चांदोमामा ' संबोधून प्रेमाने हाक मारतात.


केवळ हिंदूधर्मच बीजेच्या चंद्राची पूजा करतो असे नाही.  इस्लाम धर्मही बीजेच्या चंद्राचा उपासक आहे.  बीजेचा चांद तर त्यांच्या धर्म-ध्वजाचे प्रतीक आहे.  बीजेच्या चंद्राचे दर्शन करून ते ' रोजा ' चे पारणे करतात.  व्यापारीदेखील बीजेच्या चंद्राच्या दर्शनावरून बाजाराच्या तेजी-मंदीचे अनुमान करतात.

बीजेचा चंद्र बालकांना आनंद देतो,  तरुणांना कर्मयोगाची प्रेरणा देतो,  वृद्धांना नवजीवनाचा संदेश ऐकवतो,  व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करतो,  श्रीमंतांना औदार्याचा महिमा समजावतो तसाच भाऊबहिणीच्या भावजीवनाला पुष्ट करतो.

बीजेचा चन्द्र म्हणजे त्यागाचा महिमा, बीजेचा चन्द्र म्हणजे कर्तृत्व व पुरुषार्थ ह्यांची मूर्तिमंत प्रेरणा.  बीजेचा चन्द्र म्हणजे जीवनाची शोभा, जीवनाचे सौंदर्य,  जीवनाचे काव्य !

भाऊबीजेच्या दिवशी स्वतःचा भाऊ उपरोक्त सर्व गुणांनी अलंकृत बनावा अशी मंगल कामना धरून प्रत्येक बहीण जर स्वतःच्या भावाचे भाव-पूजन करील व भाऊदेखील स्वतःच्या बहिणीने केलेली अपेक्षा परिपूर्ण रूपात साकार करण्यासाठी कटिबद्ध बनेल तर भाऊबीजेचा उत्सव श्रेष्ठ संस्कृती व संस्कार ह्यांचा निर्माता बनेल.