श्राद्ध - पितृ पूजन अतिमहत्वपुर्ण पितृशक्ती समज आणि गैरसमज. Shraddha Pitru Pujan


भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्षाचा पंधरवडा श्राध्दपक्ष  अथवा पितृपक्ष किंवा महालयपक्ष म्हणून संबोधण्यात येतो.  हे दिवस म्हणजे  पूर्वजांच्याआणि ऋषीमुनींच्या स्मरण-तर्पणाचे दिवस.  श्राद्ध म्हणजे श्रद्धया यत क्रियते तत् l। श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते त्याला श्राद्ध म्हणण्यात येते.  ज्या पूर्वजांनी व पितरानी आपल्या कल्याणासाठी चामडी झिजवली, रक्ताचे पाणी केले, त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करून ते ज्या योनीत असतील त्या योनीत त्याना दुःख होऊ नये, सुख व शांती मिळावी, ह्यासाठी पिंडदान व तर्पण करायचे म्हणजे श्राद्ध.



तर्पण करायचे म्हणजे तृप्त करायचे, संतुष्ट करायचे. ज्या विचारासाठी ज्या धर्म व संस्कृतीसाठी त्यानी स्वतःचे जीवन खर्च केलेले असेल ते विचार धर्म व संस्कृती टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न केला, त्यांची अब्रू, प्रतिष्ठा वाढावी असे वर्तन व जीवन ठेवले तर ते अवश्य तृप्त होतील.  रोज देव, पितर व ऋषी तृप्त राहावेत असे जीवन जगले पाहिजे आणि वर्षभरात एक दिवस ज्या पितरांना, ऋषींना आपण मानलेले असेल त्यांच्या श्राद्धनिमित्त आपण आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि किती पुढे गेलो व कोणत्या चुका केल्या ह्याचा तटस्थ राहून विचार केला पाहिजे.


श्राद्धपरंपरा टिकविली पाहिजे,  सांस्कृतिक वारसा जीवंत ठेवला पाहिजे.  निसर्ग ज्याला शरीराने घेऊन जातो त्याचे श्रद्धामय जीवन अमर बनवले पाहिजे.  काळाने ज्याचा नाश केला आहे पण कर्मे व विचार ह्यानी ज्याना चिरंजीव बनवले आहे अशा धर्मवीरांचे व कर्मवीरांचे, कृतज्ञ भावाने पूजन करून ह्या दिवसात कृतकृत्य व्हायचे असते.

मानवी जीवन विविध ऋण मुक्तीसाठी आहे.  आपल्यावर देवाचे ऋण आहे.  आणि ऋषींचे ऋण आहे. ह्या निःस्वार्थ कर्मयोग्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे त्याचा ह्या पंधरा दिवसात विचार करायचा असतो.


श्राद्धाचा दिवस म्हणजे ऋषितर्पणाचा दिवस.  भारतीय संस्कृतीची महानता, भव्यता, दिव्यता ही ऋषींची कर्तबगारी आहे.  भारताला आजही विश्वात किंमत मिळत आहे.  त्याचे कारण आपले ऋषी आहेत.  भावी पिढीने आनंदमय जीवन जगावे ह्यासाठी निरपेक्ष भावाने रक्ताचे पाणी करून त्यानी दिव्य विचारसरणी दिली आहे.  स्वतः जळून लोकांची जीवने प्रकाशीत केली आहेत;  म्हणून समाज त्यांचा ऋणी आहे.  ऋषींचे ऋण चुकते करण्यासाठी ऋषींच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे.  ऋषींची संस्कृती टिकविण्यासाठी व तिचा फैलाव, प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.



ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कृपेने आपण लहानाचे मोठे झालो, आपल्या कल्याणासाठी ज्यानी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग केला त्या पितरांचे आपल्यावर ऋण आहे.  कोणाही मानवाने निःस्वार्थ भावाने आपले काही काम केले, आपल्यावर काही उपकार केले तर आपण त्याचे ऋणी झालो असे म्हणतात.  आपल्या पितरानी आपल्यावर असंख्य उपकार केले आहेत.  त्यांची तृप्ती होईल असे काही करणे हाच पितृरुणातून मुक्त होण्याचा उपाय आहे.  एखाद्या कारणास्तव पिता स्वतःच्या जीवनाचे निश्चित ध्येय साध्य करू नाही शकला तर ते साध्य करण्याची जबाबदारी पुत्राची असते.  पुत्र ही अभिलाषा पूर्ण करील तर पिता संतुष्ट होईल, हे स्वाभाविक आहे.  ' सम्यक तनोति-तनु विस्तारे ' पित्याने दिलेल्या ध्येयाला पुढे घेऊन जातो त्याला संतान म्हणतात.  असा पुत्रच पित्याचें खरे तर्पण करू शकतो.


पितृतर्पण म्हणजे पितरांची आठवण करून त्यानी दिलेले ध्येय मी पुढे घेऊन गेलो ह्याचा आढावा घेणे.  जो जन्मतो तो मरतो; श्राद्धाचे दिवस म्हणजे ह्या अटळ मृत्यूचा विचार करण्याचे दिवस.  मृत्यूला पवित्र मानून, मृत पितर व ऋषी ह्यांची आठवण करण्याच्या दिवसांनाही आपण पवित्र मानतो मलाही माझ्या पितराप्रमाणे जायचे आहे ह्याचे स्मरण श्राद्ध पक्षात ठेवून सकृत्यांचे पाथेय बांधायला तयार झाले पाहिजे.


विविध ऋणातून मुक्त होण्याचा ह्या दिवसातच विचार करायचा आहे,  एवढेच नाही तर आपल्यामध्ये हे ज्ञान येताच ते दुसऱ्यालाही द्यायचे.  श्रद्धेने होते ते श्राध्द.  पण आज तर सर्व श्रद्धेचे श्राद्ध करून बसले आहेत.  परिणामतः मानव जीवनाचे संबंध भावनाशून्य, ममत्व रहित व यंत्रवत बनले आहेत. चार्वाकाच्या परंपरेतील लोक आजही श्राद्धाची मस्करी करतात.  ते मानव जीवनाचे खरे मर्म समजू शकले नाहीत.  पश्चिमेच्या चष्म्यातून पूर्वजांना पाहणारे पूर्वजांचे हृदय कसे समजू शकणार?  ' येथे ब्राम्हणांना खाऊ घातलेले पितरांना जर पोचत असेल तर मुंबईत खाल्लेले दिल्लीला राहणाराला का पोचत नाही? ' असे त्यांचे तर्कज्ञान (?) आहे.  भारताच्या बँकेत भरलेला पैसा अमेरिकेत तेथील चलनात प्राप्त होतो.  मुंबईच्या स्नेहाचा आवाज टेलिफोनवर तसाच्या तसा कलकत्ता ला ऐकू शकतो, तर मग भक्तिभावाने, शुद्ध अंतः करणाने आणि अनन्य श्रद्धेने केलेले श्राद्ध मंत्रशक्तीच्या बळावर पितरांना तृप्ती देते ही गोष्ट आधुनिक चार्वाकांच्या डोक्यात कां उतरत नाही हा एक प्रश्न आहे. त्यांच्या ह्या भ्रांत व चुकीच्या समजुतीला दूर करून कृतघ्न बनत चाललेल्या ह्या सर्वाना कृतज्ञ बनविण्याचे काम समजदार लोकांचे आहे.  ते करण्यासाठी प्रभूने आपल्याला शक्ती द्यावी हीच प्रार्थना !


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

शिव साधना ( Shiv and Evil ) व पिशाच्चशक्तीसंबंधी सुक्ष्मज्ञात वास्तविकता...!

पितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained

Easiest ways for Pitru Dosh mukti and (Ancestor) Shraddha ceremony.

बाधिक वास्तुसाठी ( Hunted Vastu } काय उपाययोजना कराल ? नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल ?- Read right Now