बलि-प्रतिपदा अर्थात व्यापारी नवीन वर्ष - श्री स्वामी समर्थ Balipratipada


कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम-संवत्सरातील नवे वर्ष सुरू होते;  म्हणून त्या दिवसाला संपुर्ण वर्षाची प्रभात मानतात.  ज्याचा वर्षाचा प्रथम-दिन मंगल त्याचे संपूर्ण वर्ष मांगलिक ! मानस-शास्त्रीय दृष्टीनेदेखील 

First impression is the last impression.  
नवीन माणूस, नवा दिवस किंवा नवीन वर्ष ह्यांची जी पहिली छाप आपल्यावर पडते, तिचे स्मरण कायम राहाते.


या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात.  तीन पाऊले भूमी मागून वामनाने बळीला पाताळात पाठविले ती कथा या नांवाच्या पाठीमागे आहे.  बलि हा विरोचनाचा पुत्र, प्रल्हादाचा पुत्र विरोचन नास्तिक निपजला, त्याचा परिणाम त्याच्या पुत्रावर-बलीवर झाला. बलीने उत्तमात उत्तम राज्य केले.  पण त्याने लोकांत असलेली ईश्वरनिष्ठा व वेदनिष्ठा शिथिल करून टाकली.  

विभिन्न वर्णातील लोकांना त्याने त्यांच्या कार्यावरील योग्य निष्ठांपासून विचलित केले.  ब्राह्मणांना सांस्कृतिक कार्यापासून दूर करून केवळ कर्मकांडीय यज्ञयागात अडकवून ठेवले.  असुरी-वृत्तीच्या जडवादी क्षत्रियाना राज्यामध्ये महत्वाचे अधिकार दिले. व्यापारही भोगवादी वैश्यांच्या हातात गेला. अशा प्रकारे बलीने त्रिवर्ण नष्ट केले. शिक्षण संस्था ब्राह्मणांच्या हातातून काढून घेऊन राजसत्तेच्या हाती सोपविल्या, त्यामुळे शिक्षण क्षुद्र, हलके व दुर्बळ बनले.  समाजातून भगवदनिष्ठा व प्रभुप्रेम निघून गेले ! पैसे प्रमुख बनला.


समाजात चाललेली ही भोगोपासना व जडत्वपूजा पाहून चिडलेल्या एका स्त्रीने भगवंताजवळ तेजस्वी पुत्राची मागणी केली.  अदितीच्या निष्ठेने व कश्यपाच्या तपश्चर्येमुळे भगवंताने अदितीच्या कुशीत जन्म घेतला.  तोच हा वामन !

वामनाने लोक-जागृती केली सांस्कृतिक विचार घेऊन तो घराघरात फिरला, विष्णु बनला, व्यापक झाला, म्हणजेच वामनाचा विराट बनला !  बलीला त्याच्याशी समझोता करावा लागला.  वामनाने तीन शर्ती पुढे केल्या. 


  • (१)  शिक्षणसंस्था ब्राह्मणांच्या हातात द्याव्या.  
  • (२)  राज्यकारभार ईश्वरवादी क्षत्रियांकडे सौंपवावा.  
  • (३)  धंदा रोजगार ईश्वराला मानणाऱ्या सात्विक वैश्यांच्या हाती द्यावा.  

हीच ती तीन पाऊले भूमी.  या मागणीने बली खलास झाला,  त्याने स्वतःच्या अस्तित्वाविषयी शंका प्रकट केली. तेव्हा भगवंताने त्याला पुष्कळ धन-संपत्ती दिली, दक्षिणेला-सुतलामध्ये पाठवून दिले व स्वतः त्याचा द्वारपाल-पहारेकरी बनला.  अर्थात बलीला राजकैदी (State Prisioner) बनवून नजर कैदेत (Protective Custody) ठेवले.

भोग व स्वार्थ सोडून दुसरा कोणताच विचार माणूस करीत नसेल तर त्याचे नवे वर्ष सुरु झाले असे कसे म्हणता येईल ?  जीवनात जर काही नविनता नसेल तर ' नवे वर्ष आणि जुने वर्ष '  हे शब्द निरर्थक आहेत.  स्वतःच्या सोयीसाठी मानवाने पाडलेले काळाचे हे शुष्क विभाग आहेत.


ह्या दिवशी भगवान श्रीविष्णूच्या प्रीतीसाठी गोवर्धनोत्सव व अन्नकूट करण्याचीही प्रथा आहे.  भागवतात सांगितले आहे, ' एकदा कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला भगवान श्रीकृष्ण गाई घेऊन गोपाळांसह वनात गेला होता.  त्या वनात गोपाळ आनंदो-ललासात नाचत होते.  ते पाहून त्यांना श्रीकृष्णाने विचारले : ' उत्सव: क्रियते कस्य देवता का च पूज्यते ?  हा कोणाचा उत्सव करीत आहात आणि त्यात कोणत्या देवतेचे पूजन आहे? '  गोपाळांनी उत्तर दिले : ' अनावृष्टी व दुष्काळ ह्यांच्या पासून वाचण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे वृत्रहन्ता इंद्राचा उत्सव साजरा करीत असतो.'  समाजात चालत आलेली ही सत्ताधीशांची पूजा कृष्णाला आवडली नाही.  त्याने लोकाना इंद्रपूजा सोडून गोवर्धन-पूजा करण्याचा आदेश दिला.



त्यादिवसापासून गोपाळांनी इंद्रपूजा सोडली.  कृष्णाच्या आदेशानुसार गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली.  आपणही नव्या वर्षांपासून जुन्या रूढ चाकोरीतून बाहेर आले पाहिजे.  भगवान म्हणजे भद्ररूप होऊन, महापुरुषांचा आदेश झेलून, जीवनामध्ये नवीन रस्ता स्वीकारला पाहिजे,  तर आपले नवे वर्ष सार्थकी लागेल.  नवे वर्ष म्हणजे नवे संकल्प करण्याचे दिवस.  नवीन निर्णय घेण्याच्या मार्गात पुन्हा कटिबद्ध होऊन पुढे जाण्याचे दिवस !
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन करायचे, नवे निर्णय घायचे, नवीन ध्येय स्वीकारून पुढे जायचे, ह्याचे नांव नवीन वर्ष.
जुने राग द्वेष विसरून जाऊन, नव्या वर्षापासून माणसाने नवा व्यवहार सुरू केला पाहिजे.  ' जागे झालो तेव्हापासून सकाळ ' आणि  ' विसरलो तेथून पुन्हा मोजणे ' ही नव्या वर्षाची सूत्रे असली पाहिजेत. नव्या वर्षी केलेले शुभ संकल्प, हे केवळ संकल्प न राहता जीवनात ते साकार बनले तर कितीही बिघडलेला डाव सुधरून जाईल व सामान्य मानव महानतेचे उत्तुंग शिखर गाठू शकेल. आपल्या संकल्पात प्राण भरण्याची जबाबदारी आपली आहे. हृदयाला खराखुरा छंद लावून जीवनाला योग्य दिशेने गती देण्याचा आपला प्रयत्नच नवीन वर्ष यशस्वी बनवू शकतो.

नवीन प्राण जीवनात भरायचा, जीवनाला नवा वेग द्यायचा, हृदयात नवा उत्साह आणायचा.  नवे वर्ष काही काळात नाही.  नवे-जुने आपल्या मनात असते.  सदोदित नव-तरुण होऊन राहीन, या इच्छेला नवे वर्ष म्हणतात.


नव्या वर्षाच्या उत्सवाच्या उल्हासाच्या वेळी देखील मानवाने जीवनाचे गांभीर्य समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  जीवनाकडे गंभीरतेने पाहाणे ही एक गोष्ट आहे आणि बालिश बनणे ही दुसरी गोष्ट आहे.  या दोहोत जमीन अस्मानाचे अंतर आहे.  जीवनात गांभीर्य राखणे ही एक गोष्ट आहे आणि निराशेच्या मेघांनो आवृत्त होऊन जीवन जगण्याची हिम्मत हरवून बसणे ही दुसरी गोष्ट आहे.  

निश्चिन्त (Carefree) बनणे ही एक गोष्ट आहे आणि निष्काळजी ( Careless) बनणे ही दुसरी गोष्ट आहे.

भोग व स्वार्थ ह्यांनी ग्रासलेल्या जीवनातून मानवाला वर काढणारे, जडवादाकडे अभिमुख असलेल्या मानवाला ईश्वराभिमुख बनवणारे, जुने रागद्वेष विसरायला लावून जीवनाची नवथर प्रेरणा देणारे, रक्ताच्या कणाकणात आशा व उत्साह भरून आपल्याला नित्य तरुण राहण्याचा संदेश देणारे नवे वर्ष नव-जीवनाची दीक्षा देणारे बनावे, हीच प्रभूपाशी प्रार्थना!

जीवनात नवा आवेश दिसला तर हे जग नवे वाटेल.  खरा भक्त तो की, नव्या वर्षात नवे जीवन  मागतो.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...







0