दासबोध निरुपण...समास पहिला - ग्रंथारंभलक्षण



श्रीमत् दासबोध हा सज्जनगडचे सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामीं महाराजांनी प्रभु भगवान श्रीरामाच्या आज्ञेने चारित्र्य व मांगल्यरुपी काव्यग्रंथ रचला. समर्थ हे मुळात स्वभावाने कडक व शिस्तप्रिय असत. आजही कित्येक साधकांना त्यांच्या अनुशासनाचा गंभीर अनुभव आहे.

सद्गुरु समर्थांचा दास होणे ही वरवरची अभिव्यक्ती नाही. त्यासाठी समर्थ म्हणतात, " अधी श्रीमत् समजुन घे आणि ह्दयातील मधुस्पर्श जाणुन घे"


श्रीमत् दासबोध ग्रंथराज समाधी ग्रंथ असुन दासाला समर्थांची पुर्ण कृपा करवुन देण्यात तत्पर आहे. याअन्वये अधी "श्रीमत् दासबोध " सा ग्रंथबीजाचा मतितार्थ समजावून घेणे अतिशय महत्वाचे ठरते.




श्रीमत् दासबोध - श्रीमत् म्हणजे परब्रम्ह अर्थात सद्गुरु महाराज याचा मतितार्थ असा की, ॐ प्रणव बीजात एकुण साडेतीन मात्रा आहेत. त्यापैकी अर्धीमात्रा जी निरंतर आकाशात स्थित असते ती मात्रा म्हणजे श्रीमत् असे आहे. सर्वांनी याच मात्रेचे ध्यान केले पाहीजे कारण येथुनच सर्व देव, ऋषीमुनी व सिद्धपुरुषांचे वलयमान असते.


श्रीमताचा दास कसा असावा याचा आत्मबोध म्हणजेच...

श्रीमत् दासबोध...!

दशक पहीला - स्तवन नाम


समास पहीला - ग्रंथारंभलक्षण


श्रोते पुसती कोण ग्रंथ l

कायबोलीलें जी येथ l
श्रवण केलियानें प्राप्त l
काय आहे ll १ ll

भावार्थ -


श्रोते पुसती कोण ग्रंथ.... श्रोते नक्की कोणते ? उदास... डास... कि दास...! त्यांची जाणुन घेण्याची ईच्छा काय...? असं काय आहे ह्या ग्रंथात जे ऐकलं पाहीजे...? श्रवण केल्याने काय फायदा होणार...? असे बरेच प्रश्न प्रथम दर्शनी पडतात.

------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रंथ नाम दासबोध l
गुरुशिष्यांचा संवाद l
येथ बोलीला विशद l
भक्तीमार्ग ll २ll

भावार्थ -


ग्रंथ नाम दासबोध ... ग्रंथ नाम " श्रीमत् दासबोध" हा सात अक्षरी ग्रंथराज समर्थांनी उद्घोषीत केला. ७ आकड्याला प संवादात महत्त्वाचे स्थान आहे. उदा. गुरुचरित्र ग्रंथाचा सप्ताह केला जातो. आपल्या देहात षट्चक्र + १ सहस्त्रार असे सात चक्र आहेत. ग्रंथ नाम दासबोध हे सद्गुरु महाराजांचे सत्व दासांना सबळ भक्तिमार्ग परीचालनासाठी आवाहन करता आहेत.


गुरुशिष्य संवादे....  श्री गुरुचरित्र, श्री शिवलिलामृत, श्री नवनाथ ग्रंथ व श्री मत् दासबोध हे ग्रंथ राज गुरुशिष्याच्या आत्मसंवादातुनच उगम पावलेले अमृतपान आहे. समर्थांनी सर्व सोपं करुन सांगितलं आहे.



येथ बोलीला विशद भक्तीमार्ग... सर्व श्रेष्ठ भगवत्प्राप्तीची साधना म्हणजे भक्तिमार्ग...! त्याचेही नऊ प्रकार काव्यरुपातुन समर्थांनी समजावुन दिले आहेत. जेणेकरुन जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आपली दास्यभक्ती कमी होणार नाही याची परीपुर्ण काळजी समर्थच घेत असतात.
---------------------------------------------------------------
नवविधा भक्ती आणि ज्ञान l
बोलिंले वैराग्याचे लक्षण l
बहुधा आध्यात्म निरोपण l
निरोपिलें ll३ll

भावार्थ -


नवविधा भक्ती म्हणजेच समर्थांनी भक्तीचे नऊ प्रकार सांगितले. त्यात श्रवणभक्ती, किर्तन भक्ती, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंद्य, दास्य, सख्य, आत्मनिवेदन आणि मुक्तीचतुष्टय असे नऊ प्रकार टप्याटप्याने आहेत. सद्गुरु महाराजांच्या मते भक्तीमार्ग हा आध्यात्मिक जीवनातील सर्वात सोपा आणि सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.


भक्ती कशी करावी ? याबद्दल समर्थ सांगतात की, भक्ती संयोगे आपल्या देहाला निवृत्तीची भावना यायला हवी. अर्थात कार्यकारण भाव जागृत झाला पाहीजे. अहं भाव नष्ट होऊनच ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते.


वैराग्याचे लक्षण देहातीत लक्षण असते. भक्तीमार्ग आणि वैराग्य ही आध्यात्मिक जीवनाच्या दोन नाण्याच्या बाजु आहेत. एक जरी सक्रीय नसेल तर जीवन लंगडे आहे समजा, मग आपण किती दुर धावु शकणार हे समर्थच ठरवतील...!



आध्यात्मिक बीजाचे विशालकाय वटवृक्षात रुपांतर होणे साठी भक्तीमार्ग परिपक्व हवा. ज्ञानाच्या तेजातुन वैराग्यप्राप्ती समर्थ करवुन देतात. ह्याच तत्वांचा परामर्श कसा घ्यायचा ह्यासाठी श्रीमत् दासबोध ग्रंथराज ह्दयात फुलायला हवा...!
--------------------------------------------------------------

भक्तिचेन योगें देव ।
निश्चयें पावती मानव । 
ऐसा आहे अभिप्राव । 
ईये ग्रंथी ॥ ४॥ 

भावार्थ :-


दासबोध ग्रंथामधे समर्थ सांगतात देवाची योग्य भक्ति जर केली तर देवाची निश्चितच प्राप्ति होते. या साठी देहा मधे अंतरीच्या आत्म्याचे अधिष्ठान हवे जे निर्गुण निराकार आहे .


जोपर्यंत पशुवृत्तीतुन आपण मानवतावादी होत नाही. जोपर्यतं मानवतावादी जीवातुन आपण आत्मसाधक होऊन तत्वमार्गक्रमण करत नाही आणि जोपर्यत आपण दत्तसाधक होऊन दत्ततत्वदास्यभक्ती करत नाही तोपर्यत आपला उद्धार या जगात अथवा या ब्रम्हांडात कोणीही करु शकणार नाही.आपल्या नितीमत्तेचे व चारित्र्याचे गँरेंटी कार्ड जोपर्यत सद्गुरु महाराज होत नाहीत तो पर्यत सात्विक शक्तीवलय आपलं काहीही ऐकणार नाही ही गाठ मनाला बांधुन घेता आली पाहीजे.

----------------------------------------------

मुख्य भक्तीचा निश्चयो । 
शुद्ध ज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो ।
बोलिला असे ॥ ५॥ 

भावार्थ :- 


मुख्य भक्ति ,  शुध्द ज्ञान आणि  आत्मस्थिती हे किती महत्वाच आहे हे या विषयी सविस्तर पणे या ग्रंथामध्ये समर्थानी सांगितल आहे .


साध्य म्हणजे ' जे आपल्याला साधायचे आहे ते '. आपल्याला काय साध्य करायचयं हे आपण ठरवलं पाहीजे. फेसबुक बाबा, व्हाट्स अप योगी व्हायचयं की अंतर्मुख दास्यभक्त होणार हे आपणच ठरवलं पाहीजे. आपल्या देहात आपला आवाज मोठा असावा याची जर आत्मईच्छा असेल तर प्रामाणिक दत्तभक्ती करावी. ढोंग अथवा कृत्रिम स्वभाव महाराजांना आवडत नाही. जे मुळ आहे तेच सत्य आहे . जे सत्य आहे तेच दत्त आहे. ही आत्मजाणीव यायला हवी. साध्य प्राप्ती मार्गातील ईतर प्रलोभने आपल्याला भ्रमित करतात याची तमा बाळगुन निष्ठुर नियतीला नामामृताद्वारे आपल्यात सामावता आलं पाहीजे.
-----------------------------------------------------------------------

शुद्ध उपदेशाचा निश्चयो । 

सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।  
मोक्षप्राप्तीचा निश्चयो ।
बोलिला असे ॥६॥

भावार्थ :- 


यामध्ये समर्थानी शुद्ध उपदेशाचे स्वरूप समजावून सांगताना सायुज्यमुक्ती आणि मोक्ष प्राप्ती कशी प्राप्त करता येईल याची शाश्वत माहिती दिली आहे.



' आधळं दळतयं व कुत्रं पीठ खातयं ' अशा भ्रमिक आध्यात्मिक संकल्पनेतुन बाहेर येणे प्राथमिक स्वरुपात महत्वाचे आहे. आपल्यातील व आपल्या उपास्य देवतीतल अंतर आपली मनोदशा, अंतरीक ज्ञान व जीवनात आलेली उपरती या तीन अवस्थांवरुन गणले जाते. उगीचच नसती उठाठेव करुन काहीही उपयोग होत नाही. सोबतच आध्यात्मिक दलालांचाही आश्रय घेणे पुर्णतः बंद करावेत. महाराज स्वयंभु तत्वावरच विराजमान असतात. त्यायोगे स्वतःला शोधुन आपलं आध्यात्मिक मार्ग योग्यरित्या आत्मपरिक्रमित करता आला पाहीजे. 

---------------------------------------------


शुद्ध स्वरूपाचा निश्चयो । 

विदेहस्थितीचा निश्चयो । 
अलिप्तपणाचा निश्चयो । 
बोलिला असे ॥७॥

भावार्थ :- 


इथे समर्थ शुद्ध स्वरूप ,  विदेही अवस्था आणि नि:संगपणा (विरक्ती ) याबद्दल सविस्तर पणे सांगतात


आपल्या शरीराला श्रीफळ अथवा ज्याला आपण नारळ असे म्हणतो त्या नारळाची धारणा करा. स्वदेह नारळ ( श्रीफळ ) आहे अशी प्रबळ कल्पना करा.


या नारळातील अंतर्भुत परीस्थितीची तुम्हाला ओळख होण्यास सुरवात होईल. ज्याप्रमाणे नारळात खोबर्याची जलाने भरलेली वाटी असते व ती आतुन नारळाला चिकटलेली असते त्याचप्रमाचे आपलं शरीरही आतुन विषयविकारांना चिकटले आहे अशी जाणीव होते. त्याअर्थी आपल्यातील चांगले व वाईट गुण आपल्या नजरेसमोर येतात.


नारळाआतुन चिकटलेल्या वाटीला अर्थात नश्वर शरीराला आतुन चिकटलेल्या वासनारुपी चित्ताला सर्व बाजुंनी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी दैनंदिन नामस्मरणाचा आधार घ्यावा लागतो. अशी प्रबळ धारणा करा की, सर्व चित्तवृत्ती एका जागी ( ह्दय ) एकवटलेली आहे.



ज्याप्रमाणे नारळाआतील वाटी सुकल्यानंतर ती परत कधी आतुन नारळाला चिटकत नाही. स्वतंत्र असते. मुक्त असते. त्याचप्रमाणे माझा नाशवंत देह संसारात असुनही मी संसारापासुन अलिप्त आहे. अंतर्मुखी ह्दयस्थित सद्गुरुला शरण आहे आणि महाराज कधी मला परत या वासनारुपी देहाला चिटकु देणार नाहीत.
---------------------------------------------

मुख्य देवाचा निश्चयो ।

मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो ।
बोलिला असे ॥८॥ 

भावार्थ :- 


यामध्ये समर्थानी सर्व देवांचा देव कोणता , तसेच उत्तम भक्त कोण आहे ? जीव आणि शिव यांचे स्वरूप काय आहे हे सांगितल आहे .


' मानवी देह ' भगवंताने अस्तित्वात आणलेले एक आत्मिक साधन आहे ....!  मानवी देहा जितके अनमोल आणि स्थूल बुद्धिच्याहि पलीकडील आत्म तत्व जाणून घेण्याचे साधन संग्रह या ब्रम्हांडात नाही . या अभी व्यक्तिची परीकल्पना जर मनुष्याला आली तर जीव आणि शिव यातील मतांतर आणि चरित्र खेद नक्कीच कमी होईल आणि याच जन्मात आपण आत्म साक्षात्काराच्या ऊबरठ्यावर जावून  पोहचू ..

-------------------------------------------


मुख्य ब्रह्माचा निश्चयो ।

नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । 
बोलिला असे ॥९॥

भावार्थ :- इथे समर्थ सर्वोतम ब्रम्ह कसे ? ? ?  तसेच अनेक प्रकारची मते आणि मतांतरे कोणती ? आणि खरा मी कोण या सर्व विषयांचे स्पष्ट ,  स्वच्छ , सरळ आणि नि:संशय स्वरूपात वर्णन करतात.


अध्यात्मिक प्रवास पाय-या पाय-यांचा अध्यात्माचे मार्गावर आत्म् क्रमण करावयाचे असेल तर समर्पण ही पहीली पायरी आहे. पुढील पाय-यांकडे आणि त्यांच्या संख्येकडे मान वर करुन पाहीलं तर आपण पहील्या पायरीवरुनच माघारी फिरु . म्हणुन पुढील पाय-यांची ओळख ही आताच नको. त्या मार्गावर चालता चालता चढता चढता हळूहळू होईल. कधी कधी तर असेही वाटेल की आताच मी पहील्या पायरीवर होतो आणि आताच ब-याच पाय-या चढून आलो. हे अकल्पित कसे काय ? याचं उत्त्र एकच सदगुरु मार्ग खरोखर कल्पनेपलीकडील आहे. सदगुरु महिमा अगाध आहे.

----------------------------------------------


मुख्य उपासनालक्षण ।

नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण ।
बोलिलें असे ॥१०॥


भावार्थ :- 


यामधे उपासनचे मुख्य लक्षण ,  नाना प्रकारच्या काव्यांची लक्षणे, नाना प्रकारच्या चतुरपणाची लक्षणे स्पष्ट केली आहेत . जसे की अनुशासनप्रिय श्री दत्त महराजांच्या उपासनेत शिस्तपालन हा सात्विक आचरणाचा अविभाज्य घटक आहे. सम्बंधित स्वामी शिस्त आपल्या जीवनातील मानसिक व बौद्धिक त्रुटी शमन करून एक आध्यात्मिक परिपक्वता विकसित करते.त्यायोगे आपण आपल्या जीवनातील भूत , वर्तमान व भविष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टीचे आत्मविश्लेषणात्मक तत्वावरून सहजच आकलन करू शकतो. त्याअर्थी आपल्या जीवनाच्या पुढील पायवाटा अधिक स्पष्ट व हेतु साध्य विकसित होतात. आध्यात्मिक शिस्तबद्ध आचरणाने आपल्या आत्म सन्मानात भरीव व असाधारण वाढ होते. याचे परिणामस्वरूप आचरणातून आपल्या सहज प्रतिबिंबीत होते.


--------------------------------------


मायोद्भवाचें लक्षण ।

पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण ।
बोलिलें असे ॥११॥

भावार्थ :- 


मायेच्या उत्पतिचे लक्षण,  पंचमहाभूताची लक्षणे आणि कर्ता कोण त्याची लक्षणे कोणती याचे वर्णन आहे.



तीळमात्र देहसूखा साठी संसाराच्या रहाटगाड्यातून दैनंदिन स्वरूपात अतोनात कष्ट भोगत, जीवनाच्या अंती उकिरडावर गतप्राण झालेल्या व सम्बंधित परीवारा साठी झिजलेल्या सांसारिक मानवाची श्मशान राख चार भिंतीच्या घरातहि प्रवेश करू शकत नाही.नरकरूपी संसार सागराच्या भौतिक झाडावर चडणारे भोगी व्यक्तित्वाचा अंत हा नरकात पडूनच होतो.


----------------------------------------------


नाना किंत निवारिले ।

नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले ।
नाना प्रश्न ॥१२॥

भावार्थ :-


दासबोधांत अनेक शंकांचे निवारण आहे. अनेक विकल्पांचे व भ्रमांचे म्हणजे चुकीच्या समजुतीचें निवारण येथें केलें आहे. अनेक संशय छेदून टाकले आहेत. त्याचप्रमाणें अनेक आक्षेपांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरें दिलीं आहेत.


भरकटलेला मानव ज्यावेळी आत्मरत्नाचं गाम्भीर्य अनुभवन्यास सुरुवात करतो त्याच क्षणी तो वाल्याचा महर्षी वाल्मिकी होतो. आध्यात्मिक द्रुष्टीकोनातून नाहत नादाचे भावबुद्धि पालटून अनाहत नादात परिवर्तन होते. महाराष्ट्रातील बहुतांशी संत योगीजनांचे आध्यात्मिक परिवर्तन आसक्त भावबुद्धि पालटल्यामुळेच घडते.


-------------------------------------


ऐसें बहुधा निरोपिलें ।

ग्रन्थगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें ।
न वचे किं कदा ॥१३॥

भावार्थ :-

दासबोधाची रचना कशी: अशा पद्धतीचें अनेक विषयांचे विवेचन दासबोधांत आलें आहे. 

श्रीमत दासबोध या ग्रंथाच्या माध्यमातून समर्थांची स्पष्टीकरण व अभिवचने असूनही लोक मूर्ख व अनधिकृत आध्यात्मिक दलालांच्या व धर्म मार्तंडांच्या मागे धावण्याचा उपहास करतात. आपण आपल्या जीवनात आध्यात्मिक अनुभूती घेण्याहेतूने दुसऱ्या कोणाचाही आधार मर्यादेपेक्षा जास्त घेवु शकत नाही.


आत्मानुभुति ही स्वतःच्याच अनुकरनातून घ्यावी लागते . कारण आध्यात्मिक प्रगतीत व्यक्तीत्वाची नाही तर चारित्र्याची गरज असते,  असे दास्यचरित्र्य कोणाचं अनुकरण अथवा आदर्श मानून मिळत नसतं. ते प्राप्त करण्यासाठी स्वतःला झिजाव लागतं. ग्रंथातूनच सद्गुरू महराज प्रकट होतात ज्याअर्थी आपलं बोट धरून ते संसारिक व आध्यात्मिक जीवनात पदोपदी मार्गदर्शन करतात.

------------------------------------------


तथापि अवघा दासबोध ।

दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद ।
ते ते दशकीं बोलिला ॥१४॥

भावार्थ :- 


सबंध दासबोध वीस दशकांत विभागला असून प्रत्येक दशकांत दहा समास आहेत. प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकांत सांगितला असल्यानें सगळा दासबोध स्पष्ट करुन मांडला गेला आहे. भक्तिमार्ग कसा ओळखावा व कशा प्रकारे अंत:करणात रुजवावा ह्याचे बोधक समर्पण मांडण्यात आले आहे. त्यायोगे संसारिक माणसाला वर्तमान व भविष्यात होणाऱ्या घटनांची पूर्व माहिती ग्रंथाचे अध्ययनातून मिळू शकते.


--------------------------------------------------------


नाना ग्रन्थांच्या संमती ।

उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती ।
शास्त्रेंसहित ॥१५॥

भावार्थ :- 


दासबोधांतील विषयविवेचनास अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत. त्यांमध्यें उपनिषदें, ब्रह्मसूत्रें आणि वेद हे आधार महत्वाचे आहेत. परंतु या शास्त्रप्रचीतीबरोबर प्रामुख्यानें आत्मप्रचीतीचाच म्हणजे स्वानुभवाचाच खरा आधार घेतला आहे. श्रीमत दासबोध हा ग्रंथ माणसाला संसारातील चतुर व्यवहार ज्ञान व आध्यात्मिक जीवनातील आत्मज्ञान सहज समजावून देणारा ग्रंथराज आहे. त्याच सोबत आध्यात्मिक साधकाला सद्गुरू तत्वाच्या अधीन राहून आपल्या मर्यादेचे परिपूर्ण पालन करून कश्याप्रकारे आत्मोद्धार करवून घेता येईल याचे मार्मिक व तात्विक विश्लेषण समर्थानी व्यक्त केले आहे.


------------------------------------------------------


नाना संमतीअन्वये ।

म्हणौनि मिथ्या म्हणतां नये ।
तथापि हें अनुभवासि ये ।
प्रत्यक्ष आतां ॥१६॥

भावार्थ :- 


अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला दासबोधांतील विषय खोटा किंवा चुकीचा म्हणतां येणार नाहीं. तरी त्यास खोटा व चूक म्हणणारे निघतात हे प्रत्यक्ष अनुभवास येतें. 


आयुष्यभर दुष्कर्मी ओंजळीने आध्यात्मिक जल पिणार्याना कर्माचा शेवट अवगत नसतो स्वार्थ साधण्यासाठी होणारी तडफड सहजच आध्यात्मिक चोराना अनायासे फळते त्यायोगे अज्ञानी भावनिक मुर्ख लोकांचा गळा कापला जातो. सततच्या होणाऱ्या फसवेगिरीमुळे मनुष्य मूळ आध्यात्मापासून दुरावत चालला आहे. यात बदल घडावा असा ध्यास असेल तर तत्वाचा अभ्यास करावा.


-------------------------------------


मत्सरें यासी मिथ्या म्हणती ।

तरी अवघेचि ग्रन्थ उछेदती ।
नाना ग्रन्थांच्या संमती ।
भगवद्वाक्यें ॥१७॥

भावार्थ :- 

मत्सरी माणसे यास खोटा म्हणतील. पण तसें म्हणत असतां सर्व थोर आधारग्रंथांना व प्रत्यक्ष भगवंताच्या वचनांना, अर्थांत सगळ्या वेदान्त ग्रंथांना, खोटें मानावें लागेल हें त्यांच्या ध्यानांत येत नाहीं.
    
मुळात आध्यात्म अगदी सोपे व सरळ आहे. आजच्या धर्म मार्तंडानी स्वतःच्या मतलबासाठी पुस्तकी ज्ञानाद्वारे मुद्दाम प्रकाशन विस्कळीत आणि अशुद्ध करवून घेतलेलं आहे ज्यात अज्ञानी मूर्ख सहज फसतात यातून बाहेर पडायचय तर तत्व एकमेव आश्रयस्थान आहे. वस्तुतः धर्म मार्तंडाना कोणाचीही आध्यात्मिक प्रगती होवू दयावयाची नाही कारण ते स्वतः अशुद्ध आणि सडलेले असतात.

--------------------------------------------------


शिवगीता रामगीता ।

गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता ।
वेद आणी वेदांत ॥१८॥

भगवद्‍गीता ब्रह्मगीता ।

हंसगीता पांडवगीता ।
गणेशगीता येमगीता ।
उपनिषदें भागवत ॥१९॥

इत्यादिक नाना ग्रन्थ ।

संमतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ ।
निश्चयेंसीं ॥२०॥

भावार्थ :- 


शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदान्त किंवा शारीरभाष्य,भगवद्गीता, ब्रह्मगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदें, भागवत, इत्यादि अनेक ग्रंथांचा आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे. प्रथम कोणत्याहि विषयाचे स्वरुप विवेकानें निश्र्चित केले आहे. नंतर त्यास आधार देणारी व बरोबर तसाच अर्थ असणारी भगवंताची वचनें घेतली आहेत


तसेच श्रीमत दास बोध ग्रंथापूर्वी त्या ग्रंथनामावर इतके आत्म विवेचन आहे ,  की हे आत्म निरूपण कधीही लिहून पूर्ण होणार नाही. ' श्री ' मताने ग्रंथनाम समजावून घेवुन ग्रंथ पठणासाठी आरंभ केल्यास ,  प्रामाणिक व पारदर्शक मनोवृत्तीतून अध्ययन सुरू केल्यास स्वतः ' श्री स्वरूप सद्गुरू महाराज'  आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यावेळी आपल्यात आणि महाराजांमधे कोणीही मध्यस्थी नसते.फक्त मी आणि माझे सद्गुरू महाराज हीच अभिव्यक्ती उर्वरित राहाते. हेच आत्मकर्तव्य आपल्याला आपल्या जन्म मरणातून मुक्त करणारे एकमेव मुक्तिदाता " श्री दत्तात्रेय स्वामी "  महाराजांच्या चरण कमळापर्यंत पोहोचवते.


----------------------------------------------------


भगवद्वचनीं अविश्वासे ।

ऐसा कोण पतित असे ।
भगवद्वाक्याविरहित नसे ।
बोलणें येथीचें ॥२१॥

भावार्थ :-


दासबोधांतील विषयप्रतिपादन भगवंताच्या मतास अनुसरुन आहे. भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी क्षुद्र व हीन माणूस असेल असें वाटत नाही. आपण किती प्रामाणिक व पारदर्शक आहोत या आधारावर आपली आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून राहते, आणि त्याच आधारावर आपल्याला दत्त महाराज सहकार्य करतात.



-------------------------------------


पूर्णग्रन्थ पाहिल्याविण ।

उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान ।
मत्सरें करी ॥२२॥


भावार्थ :-


क्षुद्र टीकाकार व त्यांची टिका: एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचतां जो मनुष्य त्याला उगाच नांवें ठेवतो तो दुष्टबुद्धीचा असतो. केवळ मत्सराने आपला दुराभिमान, आपली हीन वृत्ती तो प्रगट करतो. आपण सर्व प्रथम  काया ,  मन  आणि वाचा शुद्ध व पवित्र ठेवले पाहिजे . त्यायोगे आचरणातही सत्वता यायला पाहिजे.


------------------------------------------------


अभिमानें उठे मत्सर ।

मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार ।
प्रबळे बळें ॥२३॥

भावार्थ :-


दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो, मत्सरांतून तिरस्कार प्रगट होतो आणि त्यांतुन मग तीव्र क्रोधाचा विचार पोसला जातो आणि ह्याच  क्रोधामुळे वाईट सवयी जडल्या जातात जसे की चाहाडी करणे , द्रोह , ईर्ष्या करणे , धाडस करणे,  इतरांचे धन हिसकावुन घेणे, इतरांच्यात दोष पाहणे, शिव्या देणे आणि इतरांशी वाईट पद्धतीने वागणे. कोणतीही व्यक्ती कितीही बुद्धिमान असला तरी त्याला कोणती ना कोणती एखादी वाईट सवय अवश्य असते आणि हीच वाईट सवय त्याच्या पतनाचे कारण ठरते.



-------------------------------------

ऐसा अंतरी नासला ।

कामक्रोधें खवळला ।
अहंभावें पालटला ।
प्रत्यक्ष दिसे ॥२४॥


भावार्थ:- 

अशारीतीनें ज्याचें मन विकृत झालें आहे, ज्याच्या अंतर्यामीं कामक्रोध खवळलेले असतात तो केवळ अहंकाराने या नासक्या मनःस्थितीला पोंचतों असें जगांत प्रत्यक्ष आढळतें. अहंकाराचे तीन प्रकार असतात ,  मनुष्य प्राण्यामधे राजसिक अहंकाराचा प्रभाव असतो, कारण तो वासनेतुन उत्पन्न होतो. यातून सूटकेसाठी आपण भक्ती मार्गाद्वारे नामसंकीर्तन करत कर्माक्रमाने अंत:करणा पायवाटेने दत्त दरबारात स्थित आत्मगुहेतील भगवत्मय अंत:करण सद्गुरू चरण आंतरी  धरून पोहोचू शकण्यात तत्पर असल्यास  दास्यभक्तितील मुक्ती नाम धारणा फार अंतरावर नाही. ते तर महराज स्वतः हून अनुग्रहाच्या माध्यमातून सम्बंधीत साधकाच्या अभिव्यक्तीला परिचालीत करतात .


------------------------------------------


कामक्रोधें लिथाडिला । 

तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । 
मृत्य राहो ॥ २५ ॥

भावार्थ :- 


जर कामक्रोधांनी  एखादा माणूस बरबटलेला असेल तर तो चांगला असूंच शकत नाही. काम , क्रोध , मोह , अहंकार आणि लोभ हे माणसाचे शत्रु आहेत. या सगळ्याचा अतिरेक हा पतनाचा मार्ग आहे. उदा. राहू वास्तवीक अमृत प्याला,  मग तो अमर व्हायला हवा होता. पण कामक्रोधांमुळे अमर होण्याऐवजी मरुन मात्र गेला. 


-----------------------------


आतां असो हें बोलणें । 

अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । 
हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥

भावार्थ :- 


खरतर हया विषयावर आतपर्यंत खूप बोलणं झाल आहे त्यामुळे हा विषय बोलणें आतां पुरें.  म्हणून आता आपल्याला सोसेल, झेपेल आणि  समजेल तेवढेंच प्रत्येकाने  दासबोधांतून घ्यायला हवे . परंतु हे सगळे करताना अहंकार बाजूस ठेवणे हेच हिताचे राहिल. जेणेकरून  सगळ्यांत उत्तम जे आहे ते घेता येईल.



मागां श्रोतीं आक्षेपिलें ।

जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । 
संकळीत मार्गें ॥ २७ ॥

भावार्थ :- 


सुरुवातीला श्रोत्यांनी जो  प्रश्न केला होता  की " या ग्रंथांमधे नेमके काय सांगितले आहे ? " आणि त्याचे उत्तर हे आतांपर्यंत थोडक्यांत सांगितले गेले आहे. संसारिक माणसाला भक्त आणि दास या दोन अभिव्यक्तीतील फरक ओळखणे हेतु समर्थानी हया कल्पवृक्षाची आत्मनिरूपणाद्वारे सुस्पष्ट व अत्यंत सोपी अशी रचना केली आहे .


-----------------------------


आतां श्रवण केलियाचें फळ ।

क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ ।
येकसरां ॥ २८ ॥

भावार्थ :- 


दासबोधाचा अभ्यास केला तर काय फळ तें आतां सांगतों. अभ्यास करणार्‍या माणसाचें वागणें एकदम बदलतें. त्याचे सारे संशय तत्काळ समूळ नाश पावतात.  श्रीमत दासबोध या परमतत्वात समर्थानी कोणाच्या मताने आध्यात्मिक जीवन जगावे हे स्पष्ट केले आहे . श्री मताने आपलं जीवन योग्य व सुरक्षितरित्या परिपूर्णतेला जाऊ शकते. इतर कोणतेही माध्यम विश्वासू व नितिमत्तेला अनुसरून आहे याची खात्रीच नाही .



मार्ग सांपडे सुगम । 

न लगे साधन दुर्गम । 
सायोज्यमुक्तीचें वर्म ।
ठांइं पडे ॥ २९ ॥

भावार्थ :-  


दासबोधाचा अभ्यास केल्याने ईश्र्वर दर्शनासाठीचा सोपा व सुखाचा मार्ग सांपडतो. त्यामुळे परमार्थ साधण्यासाठीं कठीण व कष्टदायक साधनांची जरुरी राहात नाहीं. सायुज्यमुक्तीचें रहस्य सहजपणें हातीं येतें. 


भक्ति मार्ग कसा ओळखावा व कशाप्रकारे अंत:करणात रुजवावा ह्याचे बोधक समर्पण मांडलेले आहे. श्रीमताने आपलं जीवन योग्य व सुरक्षितरित्या परिपूर्णतेला जावु शकते. याची शाश्वती आहे.


-----------------------------


नासे अज्ञान दुःख भ्रांती ।

शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती ।
ईये ग्रंथीं ॥ ३० ॥

भावार्थ :- 


या ग्रंथाच्या अभ्यासाचें खरें फळ असें आहे कीं, त्यानें अज्ञान, दुःख तसेच  खोट्या समजुती हया समूळ नाहींशा होऊन आपल्याला  चटकन ज्ञानप्राप्ति होते अशी हया ग्रंथाची फलश्रुती आहे.  त्यामुळे आपल्या जीवनात आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी कोणाचाही आधार मर्यादेपेक्षा जास्त घेण्याची आवश्यकता नाही . ग्रंथाचे शीर्षक नाम हे सम्पूर्ण ग्रंथ संग्रहाचे बीज नाम मानले जाते. हे बीज आपल्या अंत: करणात व्यवस्थित आत्मसात व्हायला हवे. हया ग्रंथनाम बीजातूनच महान ग्रंथाचे निरूपण आपण यथार्थ समजावून घेवु शकतो.


----------------------------------


योगियांचे परम भाग्य ।

आंगी बाणे तें वैराग्य । 
चातुर्य कळे यथायोग्य।
विवेकेंसहित ॥ ३१ ॥

भावार्थ :- 


इथे योगी पुरुष हे वैराग्याला मोठें भाग्य समजतात. तें वैराग्य माणसाच्या अंगी बाणतें. त्यामुळे अंतर्यामीं विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारांत चातुर्यानें व प्रसंग पाहून कसें वागावें तें समजतें. जगात असा कोणताही आनंद नाही जो वैराग्याने मिळवता येतं नाही. वैराग्यात परमानंद आणि आनंद आहेच. जसे की कमळ पाण्यात असूनही कोरडेच राहते. त्याचप्रमाणे संसारात राहूनही संसाराला मनात घुसू देता कामा नये.


-----------------------------


भ्रांत अवगुणी अवलक्षण ।

तेचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण ।
समयो जाणती ॥ ३२ ॥

भावार्थ :- 


भ्रमिष्ट म्हणजे वेड्या व चुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी, दुर्गुणी आणि हीनलक्षणी माणसें उत्तम लक्षणी बनतात. दुसर्‍याची लबाडी ओळखण्याची धूर्तता अंगीं येते. तर्क चालविता येऊन सूक्ष्म विचार करतां येतो. तसेंच वेळप्रसंग जाणतां येतो. हा ग्रंथामुळे  माणसाला संसारातील व्यवहार ज्ञानातील चतुराई व आध्यात्मिक जीवनातील दास्यभक्ति चे आत्मज्ञान सहज समजावून घेता येते.



--------------------------------------


आळसी तेचि साक्षपी होती ।
पापी तेंचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती ।
भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥

भावार्थ :- 


इथे आळशी माणसें ही उद्योगी बनतात.  तर पापी माणसें ही पश्चाताप पावून पावन होतात. तसेच भक्तिमार्गाची निंदा करणारीं माणसें स्वतः आदरानें भक्ति करुं लागतात. आध्यात्मिक अनुभव आणि प्रगती हवी पण ती डोळस व प्रत्यक्ष प्रत्ययास येणे शक्य असल्याच्या आधारावरच असली पाहिजे. आणि त्यासाठी योग्य माध्यमाची आवश्यकत अनिवार्य आहे. मनाला दैवी आधार प्राप्त करणेसाठी माध्यम ही तितकंच शाश्वत हवं. जेणेकरून मानवी जीवनातील बदल हे नकारात्मकतेतुन सकारात्मकतेत बदलतील.


-----------------------------


बद्धचि होती मुमुक्ष । 

मूर्ख होती अति दक्ष ।
अभक्तचि पावती मोक्ष । 
भक्तिमार्गे ॥ ३४ ॥

भावार्थ :- 


प्रपंचीं गुंतलेल्या स्वार्थी माणसांना ईश्र्वरदर्शनाची इच्छा उत्पन्न होते. बेशिस्त माणसें व्यवस्थित वागूं लागतात. नास्तिक माणसें भक्तिमार्गानें चालून मोक्षापर्यंत पोंचतात. आध्यात्मिक जीवनात तत्व आचरण होण्यासाठी  आपण नियमांच्या चौकटीत बसायला हवे. म्हणून आपल्या  कोणत्या सवयी नियमांच्या आड येतात याचा अभ्यास करून सदर सवयीचे दैनंदिन जीवनातून समूल उच्चाटन केल्यास मानवी जीवनाचा कायापाळट झाल्याशिवाय राहत नाही.

त्यासाठी तत्वांच आपल्या मानसिक, शारीरिक,  आर्थिक,  सामाजिक आणि अध्यात्मिक जीवनात असलेल महत्व अनिवार्य आहे.

----------------------------


नाना दोष ते नासती । 

पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती ।
श्रवणमात्रें ॥ ३५ ॥ 

भावार्थ :- 


अभ्यासातून मानसाचे अनेक दोष नष्ट होतात. अपवित्र माणसें पवित्र होतात. माणसाला उत्तम गति लाभते. मानवी मनाला जर योग्य उपदेशाआधारे दीर्घकालीन वाटचाली अंती अंतर्मुख केले तर मानवाचे ८० टक्के दुःख आणि शारीरिक व  मानसिक व्याधी दूर होतील. मानवी मन हे डोळ्यांनी दिसत नाही . पण ते कार्य करते म्हणुनच आपण त्याचे परिणाम अनुभवतो. आपल्या चांगल्या आणि वाईट क्रुतीस मनच जबाबदार असते.     


-----------------------------


नाना धोकें देहबुद्धीचे ।

नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे ।
नासती श्रवणें ॥ ३६ ॥

भावार्थ :- 


" मी देहच आहे " या घट्ट समजुतीनें वागणार्‍याला जीवनांत अनेक कठीण प्रसंग येतात. दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात. तसेंच नाना प्रकारच्या संशयांनी निर्माण होणारे भ्रम नाहीसें होतात. संसारांतील दुःखाचे व निराशेचे अनेक प्रसंग लोपतात. अजूनही महत्वाच म्हणजे  श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणे गरजेचं आहे .जेणेकरून जीवनातील कठीण प्रसंगी बुवा-बाबा आणि भगत यांच्या आंधळ्या प्रलोभनाना बळी पडणे टाळता येईल. आणि आपल्याला परिपक्व मानसिक अवस्था प्राप्त करून घेता येईल.


-------------------------------


ऐसी याची फळश्रुती । 

श्रवणें चुके अधोगती । 
मनास होय विश्रांती । 
समाधान ॥ ३७ ॥

भावार्थ :- 


दासबोधाच्या अभ्यासाचें हें फळ आहे. त्यानें जीवाची अवनति थांबते. माणसाच्या मनाला खरी विश्रांति व समाधान मिळतें. यासाठी सर्वप्रथम माणूस म्हणून मानवतावादी गरजेचे आहे , मग आध्यात्म समजून घेण्यासाठी भक्ति मार्ग परायण होणे,  आध्यात्मिक अस्तित्व ऐकांतात व्यतीत करणे,  आपल्या आवडत्या ग्रंथाचे ' ग्रंथनाम ' समजून घेणे ,  ग्रंथ नामाच्या आत्मपचना तून आंतरिक प्रतिक्रिया समजावून घेणे व त्यायोगे पुढील आध्यात्मिक मार्ग क्रमण करने, ग्रंथाचे सखोल विश्लेषण ग्रंथ नामाच्या मदतीने करणे, यथाशक्ति अंतर्मुख अभिव्यक्ति होणे ,  जेणेकरून सद्गुरू शिष्य संवाद होवून दासबोध अभ्यासाचे फळ मिळेल.


-----------------------------


जयाचा भावार्थ जैसा । 

तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । 
तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥

भावार्थ :- 


वर सांगितलेले सर्व खरें आहें. परंतु अभ्यास करणार्‍याची मनोवृत्ति जशी असेल तसें फळ त्याला मिळेल. मत्सरवृत्ति व दोषदृष्टि ठेवून ग्रंथ वाचणार्‍याला तसेंच फळ मिळेल. स्वतःचा अहंकार दूर ठेवून स्वतः चे गुणगान करण्या ऐवजी दैवताचे गुणानुवाद केल्याने ' अहं  ' विसरन्यास मदत होते. श्रीमतानी  दासबोधात आध्यात्मिक तत्वज्ञानाची स्पष्टता व त्यामूळे त्या सम्बन्धी होणारी निर्णयात्मक भूमिका प्रत्ययास आणून दिली आहे.


------------------------------------


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



त्र्यंबकेश्वर सेवा माहिती

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी



दासबोध परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below