श्री स्वामी समर्थ उपासनेचा अर्थ, भावार्थ, मथितार्थ आणि सजगता Swami samarth Upasana


उपासना= उप् +आस् = बसणे, प्रवेश करणे या धातू पासून उपासना हा शब्द बनला आहे.  आपल्या इष्ट किंवा आराध्य देव देवतेच्या जवळ समजून - उमजून मनाने आणि सद्सद् विवेकाने पोहोचणे असा या शब्दाचा अर्थ व भावार्थ आहे. उपासनेच्या द्वारे भक्त अथवा उपासक आपल्या इष्ट देव-देवतेच्या जवळ जातो व त्यांच्या कृपेने कृतार्थ होतो, अशी भावना अथवा श्रद्धा आहे.  पुराणात 'भक्तीला' उपासनेचा प्राण मानले असून योगाला तिचे अंग मानले आहे. 'प्रणाविना जसे शरीर राहू शकत नाही,  त्याचप्रमाणे भक्ती व योगाशिवाय उपासना घडू शकत नाही.  म्हणून उपासनेत भक्तीचा मनोभाव व योगाचे कृतीशील आचरण याच्या समन्वयाला महत्व आहे.  शास्त्रशुद्ध योगाभ्यास-ध्यान-धारणा-प्राणायाम केल्याने तन आणि मन निरोगी, सुदृढ रहाते.  त्यामुळे इच्छित उपासना सक्षमतेने व गुणवत्तापूर्ण होऊ शकते.

'ईश्वर'  हा उपासनेचा श्रेष्ठ विषय आहे.  सर्व धर्मात ईश्वरालाच उपासनेचा विषय मानले आहे,  परंतु तो निर्गुण निराकार (निर्गुण निराकाराचे स्पष्टीकरण याच ग्रंथात पुढे येणार आहे.)  असल्यामुळे उपासक अथवा भक्त आपल्या आवडीप्रमाणे एखाद्या 'सगुण' साकार स्वरूपात ईश्वराची, उपासनेसाठी निवड करतात.  येथे आपण अक्कलकोट निवासी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थांची 'ईश्वर' म्हणून उपासनेसाठी निवड केलेली आहे.  त्यांची उपासना व त्यातून मिळवावयाची फलप्राप्ती हाच येथे मुख्य विषय आहे.  म्हणजे त्यांच्या उपासनेची मुळे निट अभ्यासली, कृतीत आणली की त्याची रसाळ-गोमटी फळे मिळणारच.


श्रीस्वामी समर्थांची सगुण उपासना करणारे संख्येने अधिक आहेत.  ही संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे.  श्रीस्वामींच्या सगुण उपासनेत ' श्रीस्वामी समर्थांची' मूर्ती, प्रतिमा, फोटो, पादुका यांची उपासना केली जाते.  श्रीस्वामी उपासनेची फलप्राप्ती,  उपासकाची श्रीस्वामीं प्रती असलेली निष्ठा, समर्पणाचा मनोभाव, उपासनेतील आचार-विचारांची शुद्धता, शुचिर्भूतता,  निर्मोहीपणा यावर अवलंबून असते.  जर उपासक, साधक अथवा भक्ताचे चित्त आसक्त,    षडरिपूंनी लिप्त अथवा माखलेले असेल, कर्म भावनेत अथवा काम वासनेत रेंगाळत असेल, तर अशा उपासकास श्रीस्वामी समर्थांचीच काय पण कुणाही देव-देवतेची उपासना फलदायी ठरत नाही.  तेव्हा उपासनेच्या ह्या मुळाकडे म्हणजे मूलभूत बाबींकडे लक्ष देणे अंतिमतः उपासक, भक्त, सेवेकऱ्यास फलदायी ठरते.

'उपासना' करतांना शारीरिक, मानसिक त्रास, ताण-तणाव, कौटुंबिक आघात, नैराश्यजनक प्रतिकूल परिस्थिती, अपयश, अडी-अडचणी इत्यादी प्रकारे चोहीकडूनच उपासकाची कधी - कधी नाकेबंदी होऊ शकते.  उपासनेची वाटचाल खडतर व दुर्गम होऊ लागते.   उपासकाच्या मनात तऱ्हे-तऱ्हेचे विकल्प निर्माण होऊ लागतात...   


' उपासना '  घेऊन आपण काही चूक तर केली नाही नां ?  असे वाटू लागते पण उपासकांची निष्ठा, अढळ अव्याभिचारी असेल तर याही परिस्थितीतून ते सहीसलामत सुटतात. ते जर कच्चे-अपरिपक्व असतील म्हणजे ज्यांच्या उपासनेची वैचारिक बैठकच कुजकी असेल तर असे भक्त-सेवेकरी मध्येच ' उपासना ' सोडून देतात अथवा धर-सोड करतात,  परंतु सद्गुरू श्रीस्वामी कसोटी पहात आहेत असे समजून मनात कुठलाही किंतु, शंका अथवा विकल्प आणू नये.  श्रीस्वामींवरील निष्ठा दृढ असेल, त्यांचे स्वरूप-सामर्थ्य-मनात पक्के ठसलेले असेल तर या नाकेबंदीची पर्वा वाटत नाही.  उपासनेच्या दृढतेमुळे हे सर्व अडथळे हळू-हळू दूर होतात.  उपासनेचा मार्ग सुखकर होत जातो.  हे सर्व करीत असताना उपासकाने कधीही आपल्या उपासनेची इतरांच्या उपासनेशी तुलना करु नये.

व्यक्ती,  त्याचा स्वभाव व इतर अनेक बाबतीत भिन्नता असते.  म्हणून सर्वांचीच उपासना सारखी कशी असेल?  त्यामुळेच इतरांची उपासना श्रेष्ठ-कनिष्ठ-दुय्यम असा भेदा-भेद ही मनात आणू नये.  आपण जाणीवपूर्व स्वतःला सर्वच बाबतीत झेपेल, जमेल अशी उपासना स्वीकारली आहे तिच श्रेष्ठ समजून 'उपासनेला दृढ चालवावे'  

धीर धरा रे धीरा पोटी ।  असती फळे रसाळ गोमटी ।।  
या संत तुकारामांच्या उक्तीनुसार उपासनेची फलप्राप्ती मिळणारच यात कोणतीही शंका नसावी.  पण ह्याचा अर्थ असाही नव्हे की, मनाला, सैरभैर सोडून उपासनेबाबत विस्कळीत, बेशिस्त, दिशाहिन वागावे.

स्वतःचीच उपासना :-  

उपासनेची अनेक मूलतत्त्वे आहेत.  त्यातली पहिले मूळ स्वतःच स्वतःची उपासना काळजीपूर्वक सजगतेने निवडणे व ती करणे.  ही स्व उपासना, स्व-ध्यान धारणा जमू लागली, की त्यातून योग्य ती दिशा-साधकास मिळते.  ह्या मुख्य मुळाला नंतर आपोआप उपमुळे फुटतात.  त्यातुनच पुढे इच्छित फलप्राप्ती, निखळ समाधान आणि शांती लाभते.  त्यासाठी स्वतःकडे त्रयस्थ भावनेतून पहाणे,  स्वतःमधील दोष काढून टाकणे व आत्मपरीक्षण करीत स्व सुधारणा करणे हा स्वतःच्या उपासनेवरचा साधा-सोपा-सरळ उपाय आहे.  तो प्रत्येक व्यक्ती किती प्रामाणिकपणे करते हे ज्या-त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती रहस्य !

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील प्रत्यक्ष डोळस भेद कसा करावा...?

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?

गणपती अथर्वशीर्षातुन ( Ganapati Atharvshirsh ) गजाननाचे आवाहन कसे करावे ?

नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?
Post a Comment

0 Comments

0