नामस्मरण साधनेतील धोके
श्री स्वामी समर्थ नामस्मरण साधनेच्या पायवाटेने जेव्हा एखादा स्वामी सेवेकरी चालतो, तेव्हा तो / ती आपण श्रीस्वामी समर्थांची सेवा करतो/करते. या कृतीने अनेकदा फुशारुन जाण्याची शक्यता असते. आपण कुणी तरी मोठे नाम-जप साधक आहोत, श्री स्वामींचे श्रेष्ठ जेष्ठ सेवेकरी आहोत, असे वाटू लागते. यातूनच उपासनेचा गर्व आणि ताठा वाढतो. हा ताठा, वृत्ती, कृती वाणीतून व्यक्त होते. इतरांबद्दल अकारण तुच्छतेची, कमीपणाची भावना निर्माण होते. इतरांच्या नाम-साधनेशी तुलना करण्याची प्रवृत्ती बनते. ह्यातूनच स्वतःच्या नामजप साधनेकडे दुर्लक्ष होते, हे टाळावे. येथेच उपासकाचा अथवा सेवेकऱ्याचा घात होतो.
या उपासनेची अंतर्ज्ञानाकडे जाणारी वाटचाल स्वतःसाठी असते. ती आपण उपासक आहोत असे दाखविण्यासाठी अथवा फुशारकीने इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी नसते. म्हणून कितीही साधना अथवा उपासना झाली अथवा केली तरीही सद्गुरूंकडून स्पष्ट आदेश झाल्याशिवाय मार्गदर्शन करु नये. अपवादात्मक स्वरुपात मार्गदर्शन करावयाचे झाल्यास श्री स्वामीच कर्ते-करविते आहेत, आपण फक्त वाढप्याचे अथवा पोस्टमनचे काम करणारे आहोत, अशी विनम्र भावना त्या मार्गदर्शना मागे असावी.
" मी हे केले, मी ते केले, हे माझे, ते माझे, मी असा आहे तसा आहे. मी काहीही करु शकतो, मला अशक्य काहीही नाही", असा 'अहंभाव' , मीपणाची भावना श्रीस्वामींच्या उपासनेत अपेक्षित नाही. ही भावना उपासकाच्या 'उपासना' हेतूचा मूळ उद्देशच नष्ट करते. उपासनेचे मूळ खराब करणारी आहे. त्यामुळे 'उपासना'करूनही इच्छित फलप्राप्ती मिळत नाही. उपासनेच्या वाऱ्या अथवा फेऱ्या मात्र चालू असतात. पदरी लाभ मात्र शून्य. उलट अशा अहंभावी, दिखाऊ उपासनेने काळ-वेळ-श्रम-वित्त इ. अनेक गोष्टींचा अपव्यय होतो. ऱ्हास होतो. यासाठी साधनेतील या धोक्यावर पुढील उपाय करुन पहावेत.
सावधानता
'श्री स्वामी समर्थ' नाम उपासना स्वीकारल्यावर, अतिशय शांत मनाने, प्रपंच म्हणजे काय ? तो आपण कसा करतो ? कसा करावा ? त्यात आपली कर्तव्ये काय ? याचा आढावा उपासकाने त्रयस्थपणे सतत घेत रहावा. थोडक्यात म्हणजे स्वतःच स्वतःचे आत्मचिंतन करावे. आपण आपल्याला प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधावीत. टी.व्ही. रोज पाहिलाच पाहिजे कां ? पत्ते, कॅरमसारख्या खेळात वेळ दवडलाच पाहिजे कां ? वायफळ, अनावश्यक गप्पा मारल्याच पाहिजेत का ? या सर्वांचा जीवनाची उभारणी करताना किती उपयोग होतो, यासारखे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारावेत. उपासनेसंबंधी आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करावे. त्यातून आत्मबोध करून घ्यावा. स्वतःची पायवाट स्वतःच तयार करून त्या पायवाटेने चिवटपणे चालण्याचा म्हणजे श्री स्वामींची उपासना करण्याचा प्रयत्न करावा.
काही साधक, सेवेकऱ्यांच्या मनात असाही विचार येईल की, चांगले खाऊच नये का ? उत्तम कपडे , दागदागिने वापरुच नयेत का ? टी.व्ही. पाहूच नये का? रेडिओ अथवा टेप रेकॉर्डवरची गाणी, कार्यक्रम ऐकूच नयेत का ? पत्ते, कॅरम अथवा अन्य खेळ खेळू नयेत का ? गप्पाटप्पा मारुच नयेत का ? ह्यात काय गैर आहे ? एक ध्यानात ठेवावे. या सर्व बाबींना अध्यात्म अथवा उपासना मनाई करीत नाही. फक्त याचा अतिरेक करून स्वतःची शरीरप्रकृती, आर्थिक बाजू किंवा अर्थाजन करण्याचे साधन इकडे दुर्लक्ष करणे गैर आहे.
एवढाच याचा अर्थ ! पण अनेकदा उपासक-भक्त-सेवेकरी बंधु-भगिनींचे अध्यात्मातील इष्ट देव-देवतेबाबत त्यासाठी करावयाच्या उपासनेबाबत भान सुटते. अन्य अनेक कारणांनी आलेले अपयश, दुःख, यातना आदींच्या वास्तव कारणांच्या मुळाशी न जाता आपण देवालाच जबाबदार धरतो. काही बाबी देवावर ढकलून मोकळे होतो. बऱ्याच काही बाबतीत देवाचे निमित्त पुढे करतो. पण हे सर्वथा चुक आहे. हे केवळ हिंदू धर्मीयांमध्येच नाही तर इतर धर्मीयांमध्येसुद्धा असते. फक्त देव-देवता भिन्न असतात इतकेच. परंतु ह्या अशा विचारसरणीने आणि कृतीने उपासना रुपी वृक्षाची मुळेच आपण खराब करतो याचे ज्ञान आणि भान आपणास रहात नाही हेच खरे.
दंगे-धोपे करायला निमित्त हवे म्हणून निमित्त देवाचे.
स्वार्थ साधायला, लपवायला कारण हवे म्हणून निमित्त देवाचे.
चोचले पुरविण्यासाठी निमित्त हवे म्हणूनही निमित्त देवाचे.
सर्वकाही झटकून मोकळे होता यावे म्हणून निमित्त देवाचे.
टाळायचेच असते बरेच काही म्हणून निमित्त देवाचे.
उपासना करणारे असे काही उपासक - भक्त , कारण मिमांसा न शोधत अथवा करता देवालाच वेठीस धरतात. देवालाच दोष देतात. हे सर्वथा चुकीचे आहे.
श्री स्वामींना ही अशी वृत्ती-प्रवृत्ती-मानसिकता मुळीच आवडत नाही. हे उपासकाने लक्षात ठेवावे. कारणांचा वेध आणि शोध घेत उपासनेची मुळे कशी निरोगी, सशक्त, रसरशीत रहातील ते पहावे हीच अपेक्षा. उपासनेबरोबरच स्वतःच्या दररोजच्या जीवनात समतोल वृत्तीने वागल्यास शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्वास्थ्य लाभेल. ताण-तणाव, रोगराई, कलह आदी प्रकार बंद होतील. उपासनेची चिंतन-मननाची बैठक पक्की होईल. जीवन व्यवहार, सुरळीत होतील यासाठी अर्थातच थोडा वेळ लागेल. " धीर धरा रे धीरापोटी ।। असती फळे रसाळ गोमटी ।।" या संत वचनाचा निश्चितच प्रत्यय येईल.
या ठिकाणी एक गोष्ट संक्षिप्त स्वरुपात सांगाविशी वाटते, " फार पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा एका युवकाजवळ पेटलेला कंदील होता. त्याला एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे होते पण रात्र झाली. काळोख दाटला. हातांत उजेड देणारा कंदील असलेला तो युवक काळोखाच्या भीतीने दुसऱ्या गावी जाण्याची वाट दिसणार नाही, या चिंतेने एका झाडाखाली विसावला. दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते पण कसे जाणार ? तो हातांत कंदील घेऊन विचार करीत बसला. तेवढ्यांत तेथे जवळच्या झोपडीतील वृद्ध म्हातारी आली. तिने कंदीलधारी त्या युवकास विचारले, ' का रे बाबा ! का थांबलास ? ' तरुणाने उत्तर दिले, 'आजी, रात्र झालेली आ,हे.
काळोख दाटलेला आहे. वाट दिसत नाही. मी पुढे कसा जाऊ ? मला वाट कशी दिसेल ? " त्यावर ती म्हातारी म्हणाली, 'अरे , तू खुळा की काय ? तुझ्या हातात उजेड देणारा कंदील आहे. एक-एक पाऊल कंदीलाच्या प्रकाशात पुढे टाक. कंदीलाच्या प्रकाशात तुला तुझी वाट दिसेल. त्या वाटेने चालत रहा. तू तुझ्या इच्छित स्थळी निश्चित पोहोचशील." म्हातारीच्या या उपदेशाने कंदीलधारी तरुणाच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला तो उठला आणि स्वतःच त्याची वाट शोधत, कंदीलाच्या प्रकाशात चालू लागला.
हेच श्री स्वामी उपासनेचे मुख्य मूळ आहे. तुझा तूच घड, तुझा तूच वाढ, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो. हे उपासना सूत्र लक्षात ठेवावे. मनांत, हृदयसिंहासनावर राजाधिराज योगीराज लीलाधारी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोमन स्थापना करावी. ( प्रकाशदायी कंदील ) त्यांच्या किमान नामस्मरण उपासनेला लागावे. उपासनेच्या तीव्र इच्छेने उपासनेचा मार्ग सापडत जाईल. पुढे-पुढे हाच उपासना मार्ग अधिक सुस्पष्ट, सुखकर आणि सोपा होत जाईल. विचारपूर्वक, श्रद्धायुक्त प्रयत्नच उपासनेची वाट दाखवील. ' असाध्य ते साध्य । करिता सायास, तुका म्हणे ।।' या उक्तीची प्रचिती येईल.
उपासनेच्या मुळात सावधानता, सातत्य, मनोनिग्रह आणि सरळपणाचे खतपाणी घातल्यास उपासकास निश्चितच अतिशय मधूर-रसाळ, फळे मिळतील. पण हे साध्य करण्यास धीर धरावा लागेल. 'पी हळद अन हो गोरी' असा झटपट मामला उपासनेत नसतो. तो नसावा. येथे हे नमूद केले पाहिजे की, बहुसंख्यांना झटपट, काहीही खटपट न करता फायदा हवा असतो.
श्री स्वामींचे स्मरण करताच त्यांची थोडीशी उपासना करताच त्यांनी मनोकामना पूर्ण करावी ह्याची घाई-तातडी अनेकांना झालेली असते, परंतु त्यातून अंतिमतः काहीही साध्य होत नाही. म्हणून उपासना निखळ, सरळ, सात्विक आणि अवडंबर विरहित असावी. 'मनीचा भाव तोच देवा ठाव' हे उपासनेचे मूळ सूत्र आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. याबाबत जगद्गुरू संत तुकाराम महाराज साधकाच्या किंवा उपासकाच्या एकूणच अवस्थेबाबत मार्गदर्शन करतांना एका अभंगात म्हणतात.
" साधकाची दशा उदास असावी । उपाधी नसावी अंतर्बाही ।।१।।
लोलुपता काय निर्देने जिणावे । भोजन करावे परिमित ।।२।।
एकांती लोकांती स्त्रीयाशी वचन । प्राण गेल्याजाण बोलो नये ।।३।।
संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहर्निशी ।।४।।
तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ।।५।।
( शब्दार्थ व टिपा :-- ( जीणावे-जिंकावे) अहर्निशी-दिवस रात्र, लाहे-प्राप्त होईल, निर्देने-कठोरपणाने, निर्दयपणाने)
हा अभंग उपासनेचे मूळ काय आहे ? साधक अथवा उपासकाने उपासनेत कोण-कोणती पथ्ये पाळावित याचे उत्तम मार्गदर्शन करणारा आहे. उपासक हा वृत्तीने 'उदास' असावा. म्हणजे षडरिपू विरहित असावा. त्याला संसार-प्रपंचात राहूनही त्याची आसक्ती नसावी. त्याने अतिरिक्त निद्रेस जिंकावे. आहार सात्विक व मर्यादित असावा. त्याने एकांतात अथवा समूहात स्त्रियांशी संभाषण करु नये. थोडक्यात म्हणजे उपासकाने जेथे-जेथे मन गुंतून अथवा गुरफटून राहील ते सर्व निश्चयपूर्वक टाळावे. परमार्थ आणि प्रपंच ह्याचा योग्य तो विवेकी समतोल साधीत रहावा.
' मनी नाही भाव, देवा मला पाव ' या सूत्रास उपासनेत अजिबात थारा नाही. भक्ती विरहित उपासनेचे केलेले अवडंबर, मांडलेला थाटमाट, षोडशोपचारे केलेला झगमगाट हे सारं-सारं आंतरिक भक्तीशिवाय निरोपयोगी ठरत. याचा अर्थ उपसनेमध्ये, पूजे-अर्चेत, धूप, दीप, नैवेद्य, वस्त्र, अलंकार आदींचा थाटमाट करु नये असे नाही, वातावरण निर्मितीसाठी ते ठीक आहे. परंतु याशिवाय उपासना करता येणारच नाही असा अट्टहास धरु नये.
प्राधान्य उपासनेला द्यावे. थाट-माट नंतर. आळस, चालढकल अकारण उपासनेत खंड, अनियमितता इ. उपासनेच्या मुळांची कीड आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त करणे म्हणजे उपासनेचा वृक्षसशक्त करण्यासारखे आहे. उपासनेबाबत अनेक सल्ले दिले जातात. मतमतांतरे व्यक्त केली जातात. तेव्हा अपरिपक्व साधक बहकण्याची, चुकीच्या वाटेने, दिशेने जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्या उपासनेचे मूळ काळजीपूर्वक सद्सद्-विवेकाने तपासून घ्यावे.
सोपे उपाय / कृतीशील विचार
१) वटवृक्ष कुठेही असो, श्रीस्वामींचा सगुण वास तेथे असतो, असे मानून वटवृक्षाचे दर्शन घ्यावे. वेळ असल्यास तेथे एक चित्तावस्थेत बसून ।। श्री स्वामी समर्थ ।। या षडाक्षरी मंत्राचा किंवा 'श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ' हा जप करावा.
२) श्री स्वामींच्या फोटोची घरच्या घरी मनोभावे नियमित उपासना करावी. व्यावहारिक जीवन आणि आध्यात्मिक उपासना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे समजून उपासकाने आचरण करावे. व्यवहारात उपसनेकडे आणि उपासनेत व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. दोहोंची विचारपूर्वक सांगड घालावी. प्रपंच आणि अध्यात्म दोन्हीही 'व्रतस्थ' वृत्तीने करावीत.
३) तुम्ही कोठेही वावरत असताना जवळपास श्री स्वामी समर्थ केंद्र अथवा मठ, मंदिर असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास तेथे जाऊन श्री स्वामींचे मनोभावे दर्शन घ्यावे. दर्शन घेताना हार, नारळ, उदबत्ती शक्य झाल्यास खडी साखर, कापूर, पेढे अर्पण करावे. रिक्त हस्ते देव दर्शन घेऊ नये असा संकेत आहे. पण तसे अर्पण करता येणे शक्य नसले तरी मनास खंत वाटू देऊ नये, शुद्ध भक्ती-भाव अर्पण केला तरी पुरेसा असतो. हे लक्षात ठेवावे.
४) जेथे कोठे श्री स्वामींच्या पादुका असतील तेथे जाऊन त्या पादुकांचे अनन्यभावे दर्शन घ्यावे. ते 'ब्रम्हांडनायक' असल्यामुळे त्यांचा वास अथवा अस्तित्व त्यांच्या पादुका, मठ अथवा केंद्र हेच आहे आणि इतरत्र नाही, असा संकुचित विचार मनात आणू नये. ते सर्वव्यापी, सर्वत्र आहेत, हा भाव सदैव मनी ठेवावा. एक दृश्य स्वरुप म्हणून त्यांच्या स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे हा भाव येथे आहे इतकेच.
५) या चराचरात, अणुरेणूत श्री स्वामी आहेत. त्यांच्यासाठी आपण आपले हृदयसिंहासन अनन्य भक्तीने खुले ठेवल्यास ते केव्हाही सहजपणे त्यावर विराजमान होतील, एक वेगळीच अनुभती देतील, हा भाव मनोमन सदैव दृढ असू द्यावा.
श्री स्वामी समर्थास नैवेद्य
आपण दररोज जो साधा शाकाहार घेत असतो त्याचा भोजन करण्यापूर्वी नैवेद्य दाखवावा. त्यांना कांदा भजी, कडबोळी, गोड गरमा-गरम पुरण पोळी, खीर आदी स्वामींना प्रिय पदार्थ असावेत. प्रसंगानुरूप अधून-मधून याचाही नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. नैवेद्य भरपूर एक-दोन माणसांचे पोट भरेल इतका असावा. पुढील पद यावेळी म्हणावे,
" प्रेमभावे भातुके नैवेद्य हा केला । तन मन अर्पण करूनि तुजला वाहिला ।।१।।
मूळ शून्य स्वरूप रूपी ही मिळाला । भ्रांत विभव कृपे सहजचि नासला ।।२।।
निजानंद रंग रूपी हो भरला । आनंदाचा नाथ भावे डुलविला ।।३।।
प्रेमभाव भातुके नैवेद्य हा केला । तन मन अर्पण करूनि तुजला वाहिला जसा ।।४।।"
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दैविक आत्मोपचारिक उपायानुरुप साधकांचे स्वलिखित अनुभव पोस्ट ( Sadhak Experience Documented )
ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
अंकशास्त्रातून भाग्योदय
आगामी पुस्तके
ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
अंकशास्त्रातून भाग्योदय
आगामी पुस्तके
0 Comments