जपाचे प्रकार किती आहेत ? कोणत्या प्रकारचे कोणते फळ मिळते ? How many types of chanting are there?


जपाचे मुख्यतः  १)  वैखरी,  २)  मध्यमा (उपांशु),  ३)  परा (मानसिक) असे तीन प्रकार आहेत.  'नमः शिवाय'  हा पंचाक्षरी, 'ॐ नमः शिवाय'  हा षडक्षरी,  ' ॐ ह्नीं सूर्याय नमः' हा सप्ताक्षरी,  'ॐ नमो मृत्युंजयाय' हा अष्टाक्षरी,  ॐ ऐं ह्नीं क्लीं चामुंण्डायै विच्चे' व ''ॐ गं गणपतेय नमः"  हे नवाक्षरी  'त्रिगुणात्मिकादिशक्तये नमः"  हा एकादशाक्षरी,  'ॐ नमो भगवते वासुदेवाय।' हा द्वादशाक्षरी,  'श्रीराम जय राम जय जय राम' हा त्रयोदशाक्षरी,  इत्यादि सर्व मंत्र लघु, मध्यम व महापुरश्चरणासाठी वापरले जातात.  वरील सर्व मंत्र मानसिक जपासाठी आहेत.  त्याचप्रमाणे मंत्रराज गायत्री हा देखील मानसिक जपासाठी घेतात.  

सामान्यतः कोणत्याही पुरश्चरणासाठी मानसिक जपाचीच आवश्यकता असते.  पण कोणताही मंत्र एकदम मानसिक रित्या जपला जात नाही.  त्यासाठी प्रारंभी त्या मंत्राचा वैखरीनेच जप करणे प्राप्त असते.  वैखरीचा साक्षात संबंध मानवाच्या जड शरीराशी आहे तर उपांशुचा (मध्यमा) संबंध मानवाच्या वासनादेहाशी आहे.  मानसिक जपाचा संबंध मानवाच्या मनोदेहाशी आहे.  मानसिक जपाच्या पुढचा प्रकारही आहे.  पण तो प्रगत अवस्थेत अनुभूतीला येतो.
  


परावाणीने केलेला जप रक्ताच्या पेशीमधून भिनतो व मानवाच्या सर्व कोशांना व्यापून उरतो.  त्यामुळे परावाणीने जप करणाऱ्या साधकाच्या श्वासातूनही त्या जपाचा उच्चार श्रवण होतो.  अर्जुन आणि तुकाराम महाराज ही दोन परावाणीच्या जपाची उत्कृष्ट उदाहरणे म्हणून दिली जातात.  सामान्यतः वैखरीचा अयुतचतुष्टय म्हणजे चाळीस हजार जप केल्यावर उपांशु जपाची पात्रता येते.  त्याचप्रमाणे उपांशुचा अयुतचतुष्टय जप केल्यावर मानसिक जपाची पात्रता येते.  



आवश्यक ती पात्रता आली नसेल तर जप करताना मन आणि वाणीला अत्यंत शिणवटा येऊन शरीर थकून जाते.  ज्यावेळी जपामुळे उत्साह वाटेल त्यावेळी पात्रता आली असे समजावे.  म्हणून जपाचे प्रमाण एकदम न वाढविता क्रमाक्रमाने वाढवावे लागते.  त्यासाठी लघुपुरश्चरण,  मध्यमपुरश्चरण व महापुरश्चरण असे विविध प्रकार दिलेले आहेत.  केव्हाही प्रथम महापुरश्चरण न करता काही लघुपुरश्चरणे व मध्यमपूरश्चरणे झाल्यावर मगच महापुरश्चरण करावयास घ्यावे.  अनेक महापुरश्चरणानंतर परेला भिडलेला मंत्र मानवाच्या अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत सर्व कोश व्यापून टाकतो.



Post a Comment

0 Comments

0