जपमाळेने जप करण्याविषयी कोणते नियम व संकेत आहेत ?


जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माला ठेवून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढवेत.  माळेचे मणी एकमेकांवर आपटणार नाहीत याची काळजी घ्यावी.  त्यासाठी माळेचे मणी गाठविलेले असावेत.  जप करताना मणी आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो,  असे शास्त्र आहे.  त्या मागील एकच तत्व म्हणजे मणी वरचेवर आपटल्यास ते झिजून फुटण्याची शक्यता असते.  जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी.  

कुठल्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून पुढे जप करू नये.  चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम करावेत.  त्याचप्रमाणे जप करताना हातातून माळ गळून पडणे हे अशुभ सूचक होय.  त्यासाठीही सहा प्राणायाम करावेत.  जप करताना जपमाला तुटून पडल्यास ते अरिष्टसूचक असल्यामुळे अरिष्टपरिहारार्थ महामृत्युंजयाचा जप करावा.  हा जप किती करावा याविषयी काटेकोर नियम नसले तरी सामान्यतः  ' अपमृत्युपरिहारार्थ अयुतचतुष्टय'  (म्हणजे चाळीस हजार)  जप करावा.  पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरून जपसंख्या कमी करता येते.  



जपमाळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी.  गोमुखी नसल्यास किमान एखादे वस्त्र वापरून हात झाकून घ्यावा.  एका व्यक्तीने एकच ठराविक माळ वापरावी.  दुसऱ्या व्यक्तीची माळ कधीही वापरू नये.  जपमाला हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे.  जप झाल्यावर माळेला वंदन करावे.  जपमाळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत किंवा वाटीसारख्या पात्रात ठेवावी.  जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत ठेवू नये.  

एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देता येत नाही.  परंतु गुरू आपल्या शिष्यास ती देऊ शकतो.  मात्र अशा तऱ्हेने गुरूकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीचे स्मृतिचिह्न असलेल्या माळेचा  उपयोग जपासाठी करता येत नाही.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





वास्तु दिशा रहस्य - Real unknown secrets explained



Post a Comment

0 Comments