कर्पूरहोम हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण, अतिप्रभावशाली व अत्यंत उपयुक्त पण गुप्त मानला गेलेला असा विधी आहे. नारळ पूर्ण सोलून त्यावर कापराची वडी ठेवावी व ती प्रज्वलित करावी. पहिली वडी संपत येताच दुसरी सरकावून ठेवावी. अशा प्रकारे कापराची ज्योत तेवत ठेवावी. यालाच कर्पूरहोम असे म्हणतात. यामागे कल्पना अशी आहे की,
नारळातील पाणी म्हणजे हरद्वारच्या ब्रह्मकुंडातील गंगा होय. कारण ब्रह्मकुंडातील गंगा पूर्णतया प्रदूषणरहित व स्फटिकासारखी शुद्ध व पवित्र असते. नारळाचे पाणीही त्या पाण्याप्रमाणेच अत्यंत शुद्ध व पवित्र असते. नारळाचे कवच म्हणजे हरद्वाराचे ब्रह्मकुंड होय. या गंगाकाठावर बसून यज्ञयाग केल्यास त्याचे कोटिगुण फळ असते अशी श्रद्धा असते. कर्पूरहोमाचे फळही असेच कोटिगुण असते.
उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीस घर खरेदी करावयाचे आहे त्यास एकदम दोन तीन चांगली घरे दृष्टीपथात आली तर 'हे घेऊ की ते घेऊ' अशी त्याच्या मनाची संभ्रमावस्था होते. एखादी उपवर मुलगी एकदम दोन तीन ठिकाणी पसंत पडून होकार आल्यास तशीच द्वैतावस्था होते. त्याचप्रमाणे एकाच वेळी दोन नोकऱ्यांच्या नेमणुकींची पत्रे आल्यास कोणती स्वीकारावी या कल्पनेने मन दोलायमान होते. अशा वेळी कुणाचा सल्ला घ्यायला जावे तर सल्ला देणारी व्यक्ती निरपेक्ष सल्ला देईल याची खात्री नसते.
प्रत्येकजण सल्ला देताना स्वतःकडे जोखम न घेता द्वितीयमत (सेकंड ओपिनिअन) देतो. कारण सल्ला चुकल्यास त्याचा वाईटपणा स्वतःकडे घेण्यास कुणीच तयार होत नाही. अशा वेळी एखाद्या त्रिकालदर्शी पुरुषाचा सल्ला घ्यावयास जावे तर हल्ली तसे पुरुष आढळत नाहीत. या सर्व पेचप्रसंगी कर्पूरहोमासारखा उत्कृष्ट पर्याय नाही.
कर्पूरहोम करताना कोणताही मंत्र अथवा स्तोत्र म्हटले नाही तरी चालते. पण एखाद्याने आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण, मंत्रजप किंवा स्तोत्रपठण केलेच तर कर्पूरहोमाचे अधिक फळ मिळते.
कर्पूरहोमाचा आणखी एक महान फायदा म्हणजे ज्यावेळी शोक, दुःख, अपमान इत्यादि भावनांचा अतिरेक होऊन परमनैराश्य प्राप्त होते. त्यावेळी कर्पूरहोम केल्यास नैराश्य दूर पळते व मनाला दुप्पट उत्साह व उमेद वाटून पुढील कार्ये सुकर ठरतात. एखादे मोठे धर्मसंकट समोर येताच कर्पूरहोम केल्यास अनाकलनीयरीत्या मार्ग सुचतो.
हा चमत्कार कोणालाही अनुभवण्यासारखा आहे. जात, धर्म, लिंग, वय, अवस्था इत्यादि कोणत्याही गोष्टींचा कर्पूरहोमास अडथळा येत नाही. कर्पूरहोम करताना एकाच नारळावर हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळता येतो. नारळ जळत नाही. पण काही दिवसांनी पाणी आटते किंवा तो सुकून जातो. दर अमावस्या, पौर्णिमेस नारळ बदलावा. जुन्या नारळाचा प्रसाद सर्वांना घेता येतो.
नारळ बाद झाला असल्यास पाण्यात किंवा शेतात विसर्जन करावा. केरकचऱ्यात टाकू नये. देवाकडून योग्य निर्णय वा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी व आत्मनिवेदन, ध्यानधारणा, त्राटकाचा अभ्यास करावयाचा असल्यास शेंडी आपल्याकडे करावी.
ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments