मरणशांती म्हणजे काय ? मरणशांती आणि निधनशांती यातील नेमका भेद कोणता ?


निधनशांती हा विधी सर्व मृत व्यक्तींच्या बाबतीत केला जातो.  कारण निधन हीच घटना अशुभ मानली गेल्याने तिच्या परिहारार्थ शांती करणे संयुक्तिक आहे.  मरणशांती मात्र सर्वच मृत व्यक्तींच्या बाबतीत असेल असे नाही.  

मरणसमयी धनिष्ठा,  शततारका,  पूर्वाभाद्रपदा ,  उत्तराभाद्रपदा व रेवती ही पंचकनक्षत्रे,  पुनर्वसु,  उत्तराषाढा,  कृत्तिका,  उत्तरा,  पूर्वाभाद्रपदा व विशाखा ही त्रिपाद नक्षत्रे असताना मरण घडल्यास प्रथम पुत्तलविधी करावा.  पुत्तलविधीमध्ये यवाच्या पीठाचे पुतळे (गोळे) करून ते प्रेताच्या प्रधान अवयवांवर ठेवले जातात.  जर दहन करताना ते नक्षत्र  संपलेले असले तर पुत्तलविधी केला नाही तरी चालतो.  त्यानंतर दहाव्या दिवसानंतर नदीवर नक्षत्रशांती करावी.  त्रिपाद नक्षत्री तीन व पंचकनक्षत्री पाच वेळा ती घटना घडते,  अशी समजूत आहे.  केवळ मरणच नव्हे तर अन्य घटनांनादेखील हा संकेत लागू आहे.  म्हणून मरणासारखी अशुभ घटना तरी पुनः पुन्हा घडू नये यासाठी पुत्तलविधीनक्षत्र मरणशांती हे विधी दिलेले आहेत.  

इतके करूनही काही वेळा घटनांची पुनरावृत्ती होतेच.  काही वेळा कोणत्याही प्रकारची शांती लागली असूनही काहीही शांतीकर्म केलेले नसतानादेखील कोणतीही दुर्घटना वर्षभरात घडून आलेली दिसून येत नाही.  यावरून पंचकादिनक्षत्रांचा संकेत अनुभवसिद्ध म्हणता येणार नाही.  तथापि त्यातील तथ्यांतथ्य पूर्ण सिद्ध होईपर्यंत निदान मानसिक धास्ती कमी होण्यासाठी मरणशांती करणे हे केव्हाही प्रशस्त ठरते. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
Post a Comment

0 Comments

0