नारायणनागबली व त्रिपिंडी श्राद्ध करण्याआधी ही पोस्ट वाचा. ह्या श्राद्धबद्दल तुम्हाला हे माहित नसेल ? Narayanagabali and Tripindi Shraddha


'नारायणनागबली' हा शब्द एकदम उच्चारामुळे तो एकच विधी असल्यासारखा वाटतो.  पण वास्तवात नारायणबलीनागबली असे दोन शब्द असून त्यांचेद्वारा सूचित होणारे विधीही पूर्णतया भिन्न आहेत.  त्यांची प्रयोजने व स्वरूपही भिन्न आहे.  पण दोन्ही विधी एका मागोमाग करण्याची प्रथा असल्यामुळे नारायणनागबली असा संयुक्त उच्चार करण्याची प्रथा रूढ झाली.

'नागबली' हा विधी नागहत्या घडली असल्यास तिच्या परिहारार्थ तसेच कुटुंबात वंशपरंपरा चालत आलेल्या स्थावर जंगम मालमत्तेच्या बाबतीत नागाचे वास्तव्य अथवा नागसंमंधाचा दोष असेल तर त्याच्या परिहारार्थ करतात.  पुत्रप्राप्तीस्तव पंचमी व्रत केले असल्यास व त्याची सांगता न होताच त्या व्यक्तीचे निधन घडल्यास पंचमी व्रताचे उद्यापन पुत्रादिकांनी केल्यावरही नागबली केल्यास दोषपरिहार होतो.  


हा विधी घरात करता येत नाही.  वाहत्या नदीच्या काठी किंवा समुद्रावर तो करावा.  काही वेळा असे योग्य स्थान न मिळाल्यास गायीच्या गोठ्यातही हा विधी करता येतो.  या विधीमध्ये सुवर्णनागप्रतिमेची पूजा,  पीठाच्या नागाचे दहन,  त्यास उद्देशून बाकीचे गतिप्रद विधी केले जातात.

नागबलीप्रमाणे नारायणबली केला जातो.  त्यासाठी ब्रह्मादि  देवता,  यमदेवता,  नारायणरुपी प्रेत इत्यादिंची प्रतिष्ठापना करून पूजाविधान केले जाते.  पिष्टमय प्रेताचे दहन केले जाते,  त्याच्या सद्गतीसाठी  इतर नेहमीचे विधी केले जातात.  नारायणबलीची अनेक प्रयोजने आहेत.  एखाद्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले असल्यास वर्षश्राद्धानंतर नारायणबली अवश्य करावा.  

एखाद्या व्यक्तीची मंत्रक्रियायुक्त अंत्येष्टी झालेली नसली तरी नारायणबली करावा.  एखाद्या मृत व्यक्तीस पिशाचावस्था प्राप्त झालेली असेल अशी शंका आली तरी नारायणबली करावा.  ज्यावेळी घरातील शांती नष्ट होते,  कर्जाची सातत्याने भुणभुण चालू असते,  घरात सर्वांचा एकमेकांशी बेबनाव असल्यामुळे चिडाचिडी चालू असते,  अपरंपार कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही,  घरातील व्यक्तीचे आरोग्य अनाकलनीय आजाराने वारंवार बिघडते,  शील,  चारित्र्य अशुद्ध होऊ लागते,  आवक मंदावते व खर्च वाढत जातो अशा वेळी घरातील स्वास्थ्य बिघडवणारा एखादा प्रेतात्मा ठाण मांडून बसला असण्याची शक्यता असते.  अशा वेळी नारायणबली अवश्य करावा.  


एखादी व्यक्ती बरीच वर्षे बेपत्ता असेल व ती जिवंत असण्याची शक्यता कमी असते.  अशा वेळी बारा वर्षांनी त्याची मंत्रक्रिया करून नंतर वर्षभराने नारायणबली करावा.  एखाद्या जोडप्यास संतान होत नसेल,  संतान होऊन ते मानसिक व शारीरिक दृष्टया विकृत वा अल्पायुषी होत असेल तर नारायणबली करावा.  मात्र असा नारायणबली गर्भावस्था असताना केल्यास अपेक्षित फळ मिळत नाहीत तर नारायणबली झाल्यावर गर्भधारणा व्हावी.  एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे धन घेऊन बुडविले असल्यास व धनको हयात नसल्यास ऋणकोने नारायणबली करावा.


या सर्व निमित्ताने नारायणबली करावाच.  पण वरील कोणतेही निमित्त नसले तरी नारायणबली केला तरी चालतो.  हल्लीच्या काळात तर नारायणबली वारंवार करण्याची जरुरी निर्माण झालेली आहे.  वारंवार जमले नाही तरी निदान तीन वर्षांतून एकदा नारायणबली करावा.

नारायणबली शक्यतो तीर्थक्षेत्रावर करावा.  त्यातल्या त्यात दक्षिणवाहिनी नदी असेल तर त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात. हा विधी शक्यतो शुद्ध एकादशी दिवशी करावा.

नारायणबलीचा प्रामुख्याने वासनामय लोकांशी संबंध आहे.  या विधीमध्ये आपल्याच वंशातील त्याचप्रमाणे दुसऱ्या वंशातील पण आपणाला उपद्रविक ठरणारे प्रेतात्मे अंतर्भूत असतात.  नारायणबली केल्यावर त्यांचा उपद्रव शमतो.
त्याचप्रमाणे,  आपल्याच वंशातील पण इष्ट गती न मिळालेल्या पूर्वपिढीतील व्यक्तींना उद्देशून त्रिपिंड हा विधी केला जातो.  हा विधी नारायणबलीप्रमाणेच नदीकाठी,  तीर्थक्षेत्री करण्याचा दंडक आहे.  त्रिपिंडीमध्ये तीन लोकी वास करणाऱ्या पितरांना तृप्ती मिळावी हा उद्देश असतो.  एरवीचे श्राद्ध वसु-रुद्र-आदित्य या त्रयीपुरतेच म्हणजे तीन पिढ्यापुरतेच मर्यादित असते.  पण त्रिपिंडीविधीमुळे त्यापूर्वीच्या पिढ्यातील पितरांनादेखील तृप्ती मिळते.  

हा विधी वारंवार करण्याची आवश्यकता नाही.  त्यामुळे प्रत्येक पिढीत दोनदा म्हणजे दर बारा वर्षांनी केला तरी चालतो.  पण ज्या कुटुंबात संमंधिक बाधा असते तेथे हा विधी वारंवार करण्याची आवश्यकता असते.  विशेषतः कोकणात ब्रह्मसंमंध,  मुंजासंमंध असण्याचे प्रमाण अधिक आहे.  मूळ,  ब्राह्मण,  मूळपुरुष,  महापुरुष इत्यादि नावे असलेली दैवते काही वेळा संमंधिक स्वरूपात असण्याचीही शक्यता असते.  त्यामुळे प्रत्येक पिढीतील किमान एखाद्या व्यक्तीस बौद्धिक,  मानसिक व शारीरिक अक्षमता (विकृती) येण्याची शक्यता असते.  अशा कुटुंबातील व्यक्तींनी वारंवार त्रिपिंडी करून निदान आपल्या कुटुंबियातील दोष तरी निरस्त केला पाहिजे.  

त्रिपिंडीमध्ये पृथ्वी,  द्यौ,  अंतरिक्ष अशा तीन लोकांस अनुसरून तीन विविध धान्यांचे पिंड केले जातात.  म्हणून या विधीस त्रिपिंडी अशी संज्ञा आहे.

वरीलपैकी नारायणबली व नागबली हे तीन दिवसांचे असून त्रिपिंडी हा एक दिवसाचा विधी आहे. ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments

0