पंचमहायज्ञ म्हणजे काय ? त्यांची कितपत आवश्यकता असते ? Panchmahayadnya kase karave ?


प्रत्येक घरात स्वतःसाठी संध्या,  कुटुंबकल्याणासाठी देवपूजा व कौटुंबिक ऋणातून उतराई होऊन उत्कृष्ट संस्कार होण्यासाठी पंचमहायज्ञ होणे आवश्यक आहे.  यापैकी ब्रह्मयज्ञ हा स्वाध्यायरूप आहे.  दररोज आपल्या शाखेचे अध्ययन करणे हा ब्रह्मयज्ञ होय.  त्यानंतर देव,  ऋषी,  पितर  यांना उद्देशून तर्पण करणे हे ब्रह्मयज्ञाचे महत्त्वाचे अंग आहे.  त्यानंतर देवांना उद्देशून अग्निमध्ये आहुती दिल्या जातात.  त्यासाठी अग्नी सिद्ध करण्यासाठी अगदी छोटे तंत्र वापरले जाते.  याला वैश्वदेवतंत्र म्हणतात.  

यामध्ये वैदिक मंत्रांनी अग्नीचे आवाहन करून प्रतिष्ष्ठापणा करतात.  नंतर अग्निप्रार्थना करून अग्नीच्या भोवती परिसमूहन व पर्युक्षणात्मक उदकसिंचन करून आठ दिशांना अक्षता ठेवून अग्न्यलंकार झाल्यावर समोर ठेवलेल्या चरुवर (शिजविलेला भात) संस्कार करून त्याच्या आहुती देतात.  पुन्हा परिसमूहनादि झाल्यावर अग्निपूजा,  विभूतीधारण व प्रार्थना झाल्यावर बलिहरण केले जाते.  


बलिहरणात देव,  पितर,  मानव यांना उद्देशून आहुती दिल्या जातात व शेवटी घराबाहेर थोडा चरू (भात) ठेवला जातो.  त्यास काकबली असे म्हणतात.

अन्न तयार करताना कांडणे,  चिरणे,  चाळणे,  दळने इत्यादि क्रियांमधून होणारी सूक्ष्मजीवांची हत्या अटळ असते.  त्यासाठी या 'पंचसुना' (म्हणजे पंचदोष)  निवृत्ती होऊन अन्न सुसंस्कारित व्हावे या उद्देशाने पंचमहायज्ञ केला जातो.  


पंचमहायज्ञासाठी अग्निकुंड,  चरू इत्यादि संभार शक्य नसल्यास तांदूळ,  फळे इत्यादि पदार्थांनीही हा विधी करता येतो.  अतिसंकटसमयी केवळ उदकानेही तो विधी करता येतो.  प्रवासात असल्यानंतर केवळ वैश्वदेवसूक्त किंवा वरील विधी नुसता तोंडाने म्हणूनही पंचमहायज्ञाचे फळ मिळते.  ज्या घरात पंचमहायज्ञ होत नाही तेथील अन्न संस्कारित नसल्यामुळे संन्यासी, सत्पुरुष, व श्राद्धामध्ये पितर तेथे अन्नग्रहण करू शकत नाहीत.  

विशेष म्हणजे ज्या घरात पंचमहायज्ञ करून उरलेले अन्न भक्षण केले जाते तेथे गृहशांती व अन्नपूर्णानिवास असतो.  अतिथीधर्मपालन हे संस्कृती ब धर्माचे महत्त्वाचे अंग असल्यामुळे पंचमहायज्ञात अतिथीधर्माचा आवर्जून समावेश केलेला आहे. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

संतांच्या दुर्लभ माहिती


श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहणPost a Comment

0 Comments