शिवपूजेच्या बाबतीत निरनिराळ्या पंथांमध्ये निरनिराळ्या प्रथा व रूढी प्रचलित आहेत. शिवास अर्पण केलेला नैवेद्य, पत्र, फूल, फल व जल ही अग्राह्य ठरतात. पण शालग्राम शिलेच्या संपर्काने त्या वस्तू पवित्र होतात. शिवतीर्थ अग्राह्य आहे. पण स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ ग्राह्य आहे.
घरच्या पूजेतील शिवलिंगाचे तीर्थ ग्राह्य आहे. शिवपूजा करताना एकार्तिक्य म्हणजे नीरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखविण्याचा प्रघात आहे. कारण शिवास नैवेद्यास उशीर झालेला चालत नाही अशी समजूत आहे. शिवास शंखाचे पाणी घालून स्नान घालू नये.
शिवदीक्षा घेतलेल्या साधकास त्याच्या गुरूकडून परंपरागत चालत आलेल्या विधींची माहिती सांगितली जाते. दीक्षा न घेतलेल्या साधकासाठी शिवपूजा करताना सामान्य नियम पाळले तरी चालतात. शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही.
भस्मधारण केल्याखेरीज शिवपूजेस प्रारंभ करू नये. तसेच शिवपूजा करताना गळ्यात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी. काहीजण शिवलीला ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कानात, गळ्यात, मस्तकावर, मनगटांत, दंडांत इत्यादि विविध अवयवांवर विधानोक्त संख्यांनी रुद्राक्ष धारण करून शिवपूजा करतात.
शिवपूजेच्या बाबतीत शैव, कापालिक, गोसावी, वीरशैव इत्यादि विविध पंथांनुसार विविध प्रकारची विधाने असून त्यामध्ये पार्थिवलिंग, कंठस्थ (गळ्यात घालावयाचे चांदीच्या पेटीतील) लिंग, स्फटिकलिंग, बाणलिंग, पंचसूत्री, पाषाणादिलिंग अशी अनेक प्रकार ची लिंगे शिवपूजेसाठी वापरली जातात.
शिवपूजा करताना एकार्तिक्य होऊन नैवेद्य (तांबूल, फल, दक्षिणा) समर्पण केल्यावर शंखनाद करण्याची प्रथा प्रचलित आहे. शिवमंदिरात पूजा केल्यावर प्रदक्षिणा करताना फक्त तीर्थन्हाणीपर्यंतच प्रदक्षिणा करण्यात येते. पण हा संकेत सर्रास चोहीकडे पाळला जात नाही. याबद्दलच्या निरनिराळ्या समजुती प्रचलित आहेत.
काहीजणांच्या मते शिवाच्या जटातून निघालेली गंगा तीर्थन्हाणीतून वहात असल्यामुळे तिला ओलांडणे बरे नाही. पण या समजुतीपलीकडे शिवाच्या 'अर्ध्या' प्रदक्षिणेस तसा गंभीर अर्थ नाही. विशेषतः मानवनिर्मित पाषाणाची लिंगे वा मूर्तीच्या बाबतीत कडक निर्बंध आहेत. पण स्वयंभू लिंगाच्या बाबतीत हे निर्बंध पाळण्यात येत नाहीत. त्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात तीर्थग्रहण, पूर्ण प्रदक्षिणा इत्यादि सर्व गोष्टींविषयी प्रतिबंध असत नाही.
ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments