मूर्तीमध्ये देवत्व कसे येते ? How does divinity come in idols?


वास्तविक चराचरात परमेश्वर भरलेला असतो.  त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच याविषयी संदेह नाही.  पण मानवाच्या उन्नतीसाठी व आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वरविषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही.  कारण त्याला हवा असतो 'देव' आणि तोही चराचरातील नव्हे,  तर समोर ठेवलेल्या मूर्तीमधील.  अशा वेळी मनाचे,  नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा फोटोवाचून गत्यंतरच नसते.  

मूर्तीमुळे त्याची देवविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते.  तो आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो,  त्या मूर्तीकडे पाहताच त्याला जप करावा वाटतो व मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचे चरित्र मनात सारखे घोळत राहते.  अशा वेळी मूर्ती निर्जीव व चेतनाहीन असूनही वरील कार्ये घडतात.  तर मग त्या मूर्तीतून कंपने,  स्पंदन लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकेल?  ही कंपने व स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात.  


मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसांचे वास्तव्य घडले की आपोआपच त्या मूर्तीमधील देवत्व जागृत होऊ लागते.  शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा (प्रतिष्ठा) सांगितलेली आहे.  त्यात जलाधिवास,  धान्यराशीकरण,  प्राणप्रतिष्ठा,  होम अशी अनेक अंगे आहेत.  ती सर्व प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत.  केवळ नुसती स्थापना केलेली एखादी मूर्तीदेखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते.  

ज्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहीत नसेल तेव्हा त्या मूर्तीची समंत्रक (किंवा अमंत्रक) षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करूनदेखील त्या मूर्तीमध्ये देवत्व येते.  वरचेवर पंचामृत अभिषेक,  उद्वार्जन (लिंबू,  भस्म लावून देव स्वच्छ करणे),  आरती,  नवरात्रविधी इत्यादि सोपस्कारांनी मूर्तीमध्ये देवत्व सिद्ध होऊन ती मूर्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकते. 



Post a Comment

0 Comments

0