ज्ञानेंद्रियांच्या ताब्यात मन गेल्यावर तन ज्ञानेंद्रियांची ईच्छा पुर्तीसाठी कार्य करते . मग ते कार्य चांगले असेल तर जनकौतुक होते व वाईट असल्यास जन निंदा . पण ज्ञानेंद्रियाना केवळ त्यांची भोग लालसा पुर्ण करणे हेच ध्येय असल्याने ज्ञानेंद्रियांचे मनाने ऐकणे हे पापास कारक ठरते . भोग पुण्य निर्माण करीत नाहीत . भोगामुळे पाप आणि पापामुळे आत्म्यावरील मायेचे व अज्ञानाचे आवरण अधिक घट्ट होते . आणि तसा तसा आत्मा जीवापासुन दुरावत जातो . पुन्हा जन्म मरण चक्रात फिरण्यास बाध्य होतो. म्हणून मनाने ज्ञानेंद्रियांचे कधीच दास बनु नये . दास बनावे सदविचारांचे - नामाचे . मग मन बाहेर न भटकता आंतर्मुख होवुन एकाजागी बसुन रहातं. मन स्थिर झाले कि मग आत्म्याला पुर्व दत्त अनुग्रह स्थिती प्राप्त करुन देणे सुलभ होते .
मन विचार रहीत होणे हे मनुष्य आध्यात्मिक होत असल्याचे सुलक्षण आहे . ज्याचे मन सल्ले देत असेल त्याने स्वत: चा लवकरच बॅंड वाजणार असे समजावे
सुर नर ऋषी मुनि सब फंसे त्रिस्ता जगमोह | मोह रुप संसार है ,गिरे मोह निधि जोह ||
देव ,मनुष्य ,ऋषि, मुनी सर्वच मृगजळाच्या तृष्णेने व्याकुळ झाले आहेत . पण मृगजळ आजपर्यत कुणालाच मिळाले नाही . परिणामी सर्वच अतृप्त आहेत . हे जग असंच मोहात आपल्याला फसविते . सर्वच लोक ह्या मोहरुपी समुद्रात वारंवार बुचकळ्या मारत आहेत . ह्या सगळ्या क्रियाकलापामुळे ईश्वराचे नामस्मरण करण्याचे राहुन जाते .
उपदेश म्हणजे काय ?
उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे जागा . उपदेश म्हणजे जवळ बसण्याची जागा असा शब्दशः अर्थ आहे . भावार्थाने दुर अंतरावर असलेली वस्तु दुर नसुन ती कशी जवळ आहे हे उमगुन देणे असा अर्थ आहे .उपदेश हा अधिकारी करुन देउ शकतो. परमात्मा आत्म्यापासुन दुर आहे व त्याचेपासुन भिन्न आहे असे साधकाचे अज्ञान असते. तो परमात्मा त्याचेजवळ आणि त्याचेपासुन कसा अभिन्न आहे याबाबत गुरुंचे मार्गदर्शन म्हणजे उपदेश होय .
जो साधक आत्म्याच्या सत्य स्वरुपापासुन दुर सरकतो . त्यावर आनंद आणि दु: ख यांचा मारा सतत त्याचेवर होत असतो . अशा परिस्थिती पासुन साधकाचे रक्षण करुन त्याला त्याच्या आत्म स्वरुपात स्थापित करणे हे गुरुचे कार्य उपदेशातच मोडते
विकल्प हे मनाचे खेळ आहेत . मनाला बाहेर भटकण्याची आणि त्यात गुंतण्याची व्याधी जन्म जन्मांपासुन जडलेली आहे . नामा आधारे मन अंतर्मुख करुन आत्म्याच्या खुंट्याला बांधुन टाकले कि त्याने कितीही आदळापट केली तरी त्याकडे साक्षीभावाने पहावे . म्हणजे मन विचारहीन होते . मनाची विचार रहित अवस्था हीच मी कोण आहे ? याच्या शोधास कारण होते . एकदा का मी आणि तो एकच आहे याचे ज्ञान झाले कि माया पण अज्ञानाच्या लयाने पळ काढते . मोक्षास कारण बनते . ईतराने अनुभवलेला आत्ममार्ग आपल्याला वाचुन उपयोग नाही . कारण प्रत्येकाला तो स्वतंत्रपणे चालुनच पार करावा लागतो .
स्व देहातुन देहापलिकडे जाण्यासाठी दुस- याचे ज्ञान चक्षु वापरता येत नाही . आपले आंतरिक ज्ञान चक्षु वापरावे लागतात गुरु आणि ईश्वर मोक्ष देत नाही . मोक्षाचा मार्ग दाखवितात . आपल्याला त्या मार्गाचा अवलंब करावा लागतो . हीच सुळावरची कसरत आहे
आपल्याला आत्म्याचे ज्ञान होत नाही तोवर जन्म मरण , आनंद दु: ख , माया ह्याची बंधने असतात .
ज्या माणसाने देहांतर्गत व बाह्य ईंद्रियांवर ताबा मिळविला व मनाची स्थिरता व समतोल साध्य केला त्याला सर्वव्यापी आत्म्याचा अनुभव येतो . तो एकांतवास करतो . त्याचे मन एकाग्र असते . त्याचे मनातील विकार नष्ट होतात . तो उपाध्याच कर्म करतात व आत्मा निष्क्रिय आहे या स्थितीला समजतो व निष्क्रिय होतो . निर्गुण होतो . सतत परमानंदात रहातो.
सध्या आपली स्थिती अशी आहे कि आपण जागेपणी अथवा स्वप्नात जे स्वत: ला मी असं समजतो तो आत्मा आहे . पण तो प्रत्यक्षात आत्मा नसतो . तर ती शरीराला चिकटलेली उपाधी आहे . जीला आपण अज्ञानामुळे आत्मा म्हणण्याची चुक करतो . आपण एकदा का दोरीला साप म्हटले कि ती दोरी खरोखरच साप बनतो . मग आपण त्याला घाबरतो . मग तो साप आपल्याला चावतो . आपण खरोखरच मरतो . साप खरा नाही . पण त्याचं खोटेपण आपण ओळखलं नाही . म्हणून आपण मेलो हा गोंधळ दुर होणं हेच आत्मज्ञान आहे.
दुःखच नसेल तर सुख म्हणजे काय हे नक्की ठरवायला माझ्याकडे काही उपाय रहात नाही. जिवंत राहण्यास दरक्षणी श्वास घेणे जरुरी आहे या कायमच्या बंधनाबद्दल कोण दुःख करतो?! श्वास घेतल्यावाचून जगायला हवे ही इच्छा प्रबळ नाही म्हणून निरंतर श्वास घेण्याचे जे कष्ट होतात त्याचे कधीच दुःख होत नाही ! अध्यात्म वाचुन करता येत नाही . अध्यात्म जगता आलं तर काही मिळेल अन्यथा सगळं अनाठायी आहे पण अध्यात्म जगताना होणारे हाल उपाध्याना पचविणे जड जाते. प्रश्न उपाध्याना पडतात कि बुद्धीला हे ओळखणे अत्यंत अवघड असते . कधी कधी अनुभवी वरिष्ठ साधकही ते ओळखण्यात गल्लत करतो . अशावेळी फक्त साधना करावी. हे वळण धोकादायक आहे . वाहन हळु चालवा.
निस्पृहो ना धिकारी स्यान्नाकामी मंडनप्रिय: | ना विदग्ध: प्रियं ब्रूयात सप्ष्टवक्ता न वंचक: ||
ज्याला कशात रस नाही असा अलिप्त मनुष्य एखाद्या विषयावर अधिकारवाणीने बोलु शकत नाही . म्हणजे त्याकडे त्याविषयी सखोल ज्ञान नसेल. ज्याला सौदर्य रसिकता नसेल तो साजशृंगाराकडे लक्ष देणार नाही . मुर्ख व्यक्ती मधुर बोलु शकत नाही . कोल्ह्यागत चतुर व्यक्ती आपल्या फायद्यासाठीच गोड बोलते . पण आपले मत स्पष्टपणे मांडणारा कटु बोलत जरी असला तरी तो धुर्त नक्कीच नसतो . म्हणून व्यक्तीने स्पष्टवक्ता बनावे .
मोक्षाची ईच्छा बाळगणा- यानी मनातील कचरा बाहेर फेकावा . त्याचे विश्लेषण करीत बसु नये . जी तत्वे आत्म्याला झाकुन टाकतात त्यांचा त्याग करायचा एवढेच साध्य करायचे . ते एकदा का साध्य झाले कि जग स्वप्नवत भासु लागेल . जर आपण स्वत: मध्ये गुंतुन रहात असाल . आणि तोच विचार कायम रहात असेल तर आपण अंतर्मुख झालो असे समजावे .
प्रारब्धाशी फक्त बहिर्मुख मनाचाच संबंध येतो . अंतर्मुख मनाचा नाही . मनाला आवरुम आत्म्याचा शोध ज्याला घ्यायचा त्याला कोणत्याही अडथळ्यांची भिती वाटत नाही . कधी कधी ह्या अडथळ्यामुळे शोक होईल . पण त्याला माया म्हणणे उचित होणार नाही . कारण ही रामकसोटी आहे . त्यात एका दिवसात सफलता येत नाही .
आत्मनिष्ठ होण्यासाठी संन्यासाची गरज नाही . विचारांची परिपक्वता शरीराप्रती आसक्ती नष्ट करण्यास पुरेशी आहे . आसक्ती मनात असते . ब्रम्हचर्य शरीराशी संबंधित आहे . शरीराच्या योगे मनाची आसक्ती नष्ट करता येत नाही .
मात्र संन्यस्त आश्रमातील शिस्तीमुळे अंगी वैराग्य बाणवता येते . पण शरीराच्या सांसारिकाने असे आयुष्य घालविण्यापेक्षा मनातुन संसाराचा त्याग करावा . अशा प्रकारचा त्याग हाच दिगंबर होण्याचा खरा मार्ग आहे . शरीराने दिगंबर होवुन उपयोग नाही .