आनंद उत्सव दर्शन - श्री स्वामी समर्थ Utsav Darshan


उत्सव एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वर्गालाच आवडतात असे नाही, तर सर्वांना आवडतात. सर्वांना मधुर वाटतात, म्हणूनच ते सर्व ग्राह्य आहेत. महाकवी कालिदासाने ' उत्सवप्रिय: खलू मनुष्य:' असे यथोचित म्हटले आहे.

उत्सव आपल्याला आवडतात.  कारण ते आपल्याला रोजच्या रुक्ष जीवनातून अल्पकालीन मुक्ती देतात.  धंदा, रोजगार व शुष्क जीवन-व्यवहार ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला मानव उत्सवाच्या दिवशी थोडा मुक्त श्वास घेऊन कृतज्ञता अनुभवतो.  जीवनातल्या जडतेला मोकळे अंगण सापडते.  क्षणभर त्यात मुक्तपणे बागडून मानव स्वतःच्या मनाची खिन्नता दूर करून आनंद प्राप्त करतो.

कधीमधी येणारा माणूस जसा आपल्याला स्वागतार्ह वाटतो तसे अधूनमधून येणारे उत्सव आपल्याला प्रिय वाटतात.  उत्सवामध्ये असलेला उल्लास जर त्याचा ' प्रेय ' भाग असेल तर उत्सवात असलेले जीवनदर्शन हा त्याच्यातील ' श्रेय ' भाग आहे.  कोणताही उत्सव साजरा करण्यामध्ये प्रेय आणि श्रेय दोहोंचा समन्वय असला पाहिजे.  उत्सव चांगल्या रीतीने साजरे करणे  यात सांसारिक सुख आहे, तर उत्सवामागे असलेले भाव-रहस्य समजून उत्सव साजरे करण्यात कल्याण आहे.  

मनुष्याला जे वर नेतात-उन्नत बनवतात, द्विज बनवतात, संस्कारी बनवतात ते उत्सव.  सांस्कृतिक उत्सव संस्कारपूर्वक साजरे करण्याने मनुष्याला द्विजत्व प्राप्त होते.


उत्सवामागे भावाचे महत्व आहे.  भावशून्य अंत:करणाने साजरे  केलेले उत्सव यंत्रवत बनतात आणि मानवाच्या जीवनात जडत्व निर्माण करतात.  गतानुगतिक परंपरेने साजरे केलेल्या उत्सवातून काही अर्थ निघत नाही.  परिणामतः वेळ, शक्ती किंवा संपत्तीचा व्यय उत्सवानिमित्ताने  होत असलेला दिसतो.  भावपूर्ण अंत:करणाने व सारग्राही बुद्धीने जर उत्सव साजरे करण्यात आले तर ते जीवनात आनंद निर्माण करतात, तसेच जीवनातील निराशेला झटकून टाकून नवीन आशेचा संचार करतात.


उत्सव मूकवाणीने आपल्या जीवन-विकासात उपयोगी असे संदेश देतात.  सम्यक दिशा दाखवतात ते संदेश.  या दृष्टीने उत्सव एक उत्कृष्ट मार्गदर्शक व जाणीव यांची गरज पुरी करतात.  महापुरुषांच्या जयंतीचे जे उत्सव आपण साजरे करतो ते त्यांची महानता आपल्यासमोर दृष्टिगोचर करून आपल्यालाही महान बनण्याचा संदेश देतात.


महापुरुषांचे जीवन हे आपल्या जीवनात फार मोठे आश्वासन आहे.

' कृष्णओ भुत्वा कृष्ण यजेत।' ' रामो भुत्वा रामम यजेत ।' ' शिवो भुत्वा शिवम यजेत।' असे संदेश गोकुळाष्टमी, रामनवमी, किंवा महाशिवरात्रीसारखे उत्सव आपणाला देतात.


संक्रांत, होळी किंवा दिवाळीसारखे उत्सव आपल्यासाठी मार्गदर्शक बनले आहेत. हृदयातील स्वाभाविक भावनांचे नियमन कसे करावे, कोणत्या दिशेला अंतकरणाच्या वृत्तीची गती असली पाहिजे वैगेरे सुंदर मार्गदर्शन यात साठलेले आहे.


  • संक्रांतीचा उत्सव खरी संघनिष्ठा शिकवून सम्यक क्रांती निर्माण करण्याचा संदेश देतो.
  • होळी आपल्याला राग-द्वेष, खोटे तर्क-कुतर्क तसेच उच्च-निचतेचे भेद जाळून टाकण्याचा संदेश देते.
  • दिवाळी आपल्याला दीक्षा घेऊन जीवन उन्नत बनवण्याचा संदेश देते.
  • भाऊबीज व रक्षाबंधन स्त्री जीवनाकडे पाहण्याची भावमधुर दृष्टी देतात व महान वीर बनण्याचा संदेश देतात.
  • गणेश चतुर्थी ही गणप्रमुख कसा असला पाहिजे ते समजावते.

कर्मवीरांच्या जीवनात तर उत्सव नवा प्राण भरतात.  होळीची धांदल-गडबड, गोकुळाष्टमीचे खेळ किंवा नवरात्रीचा रासगरबा वगैरे आपल्याला चेतनेची थोडी झलक दाखवितात.  कार्याच्या सातत्यामुळे निर्माण झालेल्या नीरसतेला दूर करून, नित्यनाविनतेला आमंत्रण देऊन कार्यकर्त्यांच्या हृदयात उत्साह निर्माण करून, त्यांची रसिकता टिकवून धरण्याचे काम उत्सव करतात.

भारताचा सांस्कृतिक इतिहास, पुस्तकाच्या पानात नाही तर त्याच्या जीवंत उत्सवात लिहिलेला आहे.  त्या उत्सवांच्या पाठीमागे असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमि असलेल्या मंत्राचे जर मनन झाले तर या सांस्कृतिक इतिहासाच्या निर्मात्या ऋषींसमोर मानव कृतज्ञता बुद्धीने नतमस्तक होईल. ही संस्कृती टिकविण्यासाठी रक्ताचा थेंबनथेंब खर्च करणाऱ्या पूर्वजांबद्दल आदर निर्माण होईल. शास्त्रकारांवरील श्रद्धा वाढेल; दृढ होईल.


उत्सव ऐक्याचे साधक, प्रेमाचे पोषक, प्रसन्नतेचे प्रेरक, धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक आहेत.  उत्सवात केवळ सुटीची मजा अनुभवणारे आपण जीवनातून मजेलाच सुटी देऊन बसलो आहोत असे वाटते. मनोमंथन-विरहित नुसते मनोरंजन उत्सवातील उत्सवपणाचे हनन करते.


आपले उत्सव आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले, उपयोगात आणले, सांभाळले, संस्कारी ठेवले, समुन्नत बनविले तरच उत्सव साजरे करण्याला काही अर्थ आहे


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



0