दीपोत्सव रहस्य व जागृत साधना दिव्यदर्शन - श्री स्वामी समर्थ Dipawali Special


दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्लासाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव !  दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही, तर उत्सवाचे स्नेहसंमेलन आहे.  धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी,  दिवाळी, सुरू होणारे नवे वर्ष आणि भाऊबीज असे पाच उत्सव,  पाच विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन ह्या उत्सवात सम्मिलित झालेले आहेत.  पूर्ण जाणीवपूर्वक जर हा उत्सव साजरा करण्यात आला तर मानवाला समग्र जीवनाचे सुस्पष्ट दर्शन ह्यातून मिळेल.


धनत्रयोदशी : 

धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस.  भारतीय संस्कृतीने लक्ष्मी तुच्छ किंवा त्याज्य मानण्याची चूक कधी केली नाही.  लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानली आहे.  वैदिक ऋषीनी तर लक्ष्मीला उद्देशून गाइलेले आहे.
ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही l तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ll

' महालक्ष्मीला मी जाणतो.  (ज्या)  विष्णुपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मन-बुद्धीला प्रेरणा द्यावी.'सुईच्या छिद्रातून उंट निघून जाईल पण श्रीमंताला स्वर्ग मिळणार नाही.  ह्या ख्रिस्ती धर्माच्या विधानाशी भारतीय विचारधारा सहमत नाही.  भारतीय दृष्टीने धनवान लोक भगवंताचे लाडके मुलगे आहेत.  गेल्या जन्मातील योगभ्रष्ट जीवत्मे आहेत. 

'शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोSभिजायते ।' तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनिम् । यस्यां हिरणयं विंदेय गामश्च पुरुषानहम ।।


' हे जातवेदस ! जी प्राप्त होताच मी सुवर्ण, गायी, घोडे, आणि इष्टमित्र मिळवू शकेन अशी अविनाशी लक्ष्मी मला तू दे.'


लक्ष्मी चंचल नाही तर लक्ष्मीवान मानवाची मनोवृत्ती चंचल असते.  चित्त ही एक शक्ती आहे.  त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानवदेखील होऊ शकतो.  लक्ष्मीला भोगप्राप्तीचे साधन समजणारा मानव पतनाच्या खोल गर्तेत गडगडत जातो तर लक्ष्मीचे मातृवत पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद समजणारा मानव स्वतः पवित्र बनतो व सृष्टीला पावन करतो.  विपरीत मार्गाने वापरली जाते ती अलक्ष्मी,  स्वार्थात वापरले जाते ते वित्त,  परार्थे वापरली जाते ती लक्ष्मी आणि प्रभुकार्यार्थ वापरली जाते ती महालक्ष्मी.  


महालक्ष्मी हत्तीवर बसून वाजत गाजत येते.  हत्ती हा औदार्याचे प्रतीक आहे.  सांस्कृतिक कार्यात उदार हाताने लक्ष्मी खर्च करणाराच्या घरात ती पिढ्यानुपिढ्या राहिलेली आहे.  रघुवंश ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे.  लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्यामुळे ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे.  त्यामुळे त्याचा सुयोग्य उपयोग होतो.  राजर्षीचे गुणगान करणारी आपली संस्कृती Philosopher-King ची कल्पना देणाऱ्या ग्रीक तत्त्वचिंतक प्लेटोच्या मनात हेच विचार खेळविते.

नरकचतुर्दशी :  

ह्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन सांगितले आहे.  परपीडनासाठी वापरली जाते ती अ-शक्ती,  स्वार्थासाठी वापरतात ती शक्ती,  रक्षणासाठी वापरतात ती काली व प्रभुकार्यासाठी वापरतात ती महाकाली.  स्वतः च्या स्वार्थासाठी शक्ती वापरणारा दुर्योधन,  दुसऱ्याच्या चरणावर शक्ती वाहणारा कर्ण तसा प्रभुकार्यात शक्ती हवन करणारा अर्जुन.  महाभारतात ह्या तीन पात्रांचे उत्कृष्ट चित्रण करून महर्षी वेदव्यासांनी आपल्याला स्पष्ट जीवनदर्शन दिले आहे.

नरकचतुर्दशीला कालीचतुर्दशी देखील म्हणतात.  नरकचतुर्दशीची कथा अशी आहे : प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता.  एवढेच नाही तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता.  त्याने स्वतःच्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते.   भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला.  


स्त्री-उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला.  भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले.  चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला.  त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला.  अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला त्यांनी प्रकाशित करून टाकले.  आसुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला निघाले.


दिवाळी : 

दिवाळी म्हणजे वैश्यांचा वह्या पूजनाचा दिवस.  संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस.  ह्या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे.  राग-द्वेष, वैर-जहर, ईर्ष्या-मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साह वाढावा ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.


नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात.  तेजस्वी वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला.  त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदेचा उत्सव साजरा होऊ लागला.  बलि दानशूर होता.  त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात असलेले शुभत्व पाहाण्याची दृष्टी देते.  कनक व कान्ता ह्यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो.  म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णुने कनक व कान्ता ह्यांच्याकडे पाहाण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून तीन दिवसांचा उत्सव करण्याचा आदेश दिला.  


दिवाळीच्या दिवशी कनक म्हणजे लक्ष्मीकडे पाहाण्याची पूज्य दृष्टी जोपासण्याचे शिक्षण व भाऊ बीजेच्या दिवशी समस्त स्त्रीजातीकडे आई किंवा बहीण ह्या दृष्टीने पाहायचे शिक्षण घ्यायचे.  स्त्री ही भोग्य नाही तशी त्याज्य देखील नाही.  ती पूज्य आहे ही मातृदृष्टी देणारी संस्कृतीच मानवाला विकारांसमोर स्थिर राहाण्याची शक्ती देऊ शकते.  मोह म्हणजे अंधकार.  दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह ह्यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान-प्रकाशाकडे प्रयाण !


दिवाळी म्हणजे दीपोत्सव.  बाहेर तर दिवे पेटवायचेच पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे.  हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत.  दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे.  हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे.  धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची.  


नरकचतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारणे.  दिवाळीच्या दिवशी ' तमसो मा ज्योतिर्गमय ' मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा.  जीवनाच्या वहीचा आढावा घेतेवेळी जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी ह्यासाठी प्रभुकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे.

नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैरविष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.  नवे वर्ष म्हणजे शुभसंकल्पाचा दिवस.  भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे पाहाणाऱ्या भद्रदृष्टीची शिकवण घ्यायची आणि बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रूपात स्वीकारायचा.  सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सवा समान बनेल.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

वाहन सुखाचा मंत्र सिद्ध हनुमान यंत्र - सुरक्षा कवच0