उपनिषदात म्हटले आहे, ' मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद l ' ज्याला योग्य आई-बाप आणि गुरु मिळतात त्यालाच श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. हे सदभाग्य फारच थोड्या लोकांना लाभते. अशांपैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रेय. अत्रिऋषी व महासती अनसूया ह्यांचे ते पुत्र. ' अत्रि ' म्हणजे त्रिगुणातील आणि ' अनसूया ' म्हणजे असूया रहित. सत्व, रज व तम या तीन गुणात रममाण न होता तिन्ही गुणांना जो स्वेच्छेने खेळवू शकतो तो अत्रि आणि स्त्रीसुलभ असूयेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिलेला नाही अशा प्रकारचा जिवंत मनमोकळेपणा म्हणजे अनसूया. अशा आई-बापांच्या कुशीतच दत्तासारखा तेजस्वी पुत्र अवतरतो.
नवे नवे विचार आणि प्रेरणा देण्याची तसेच नवे नवे प्रयोग करण्याची आगळी सर्जक प्रतिभा कार्यप्रमुखाजवळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे कार्याचे नित्य पोषण होत राहावे यासाठी कार्यरत झालेल्या लोकांवर प्रेमाची पकड बसवणाऱ्या विष्णूचा प्रेमप्रवाह देखील त्याच्याजवळ वाहाता असला पाहिजे. विसर्जन व सर्जन मिळूनच श्रेष्ठ नवसर्जन होते. ह्या दृष्टीने पाहता शंकराची संहार-शक्ती देखील त्याने आत्मसात केली पाहिजे. सद्विचारांचे सर्जन, सदवृत्तीचे पोषण आणि दुर्गुण, दूरवृत्ती व दुर्विचार ह्यांचा संहार करण्याची त्रिमुखी प्रतिभा ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक बनू शकतो.
दत्तात्रेयाच्या हातात कमंडलू, माळा, शंख, चक्र, त्रिशूळ व डमरू आहे. ही सहा प्रतिकें देखील विशिष्ट अर्थांची सूचक आहेत. कमंडलू व माळा ब्रम्हाची आहे. शंख व चक्र विष्णूचे आहेत तर त्रिशूळ व डमरू भगवान शंकराचे आहेत.
कोणतीही निर्मिती प्राणवान केव्हा होते? जेव्हा तिच्या पाठीमागे भक्ती असते तेव्हा. माळ हे भक्तीचे प्रतीक आहे. कोणतीही कला भगवंताच्या चरणावर अर्पण झाली की, तिचा रंगच बदलून जातो. तिची प्रतिमा सोळा कलांनी फुलून उठते. कदाचित हीच गोष्ट लक्षात ठेवून भारतातील सर्वच कला मंदिरात म्हणजे भगवंताच्या चरण-कमलाजवळ विकास पावलेल्या आहेत. तुम्हाला भारतातील उत्कृष्ट शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला किंवा संगीत-प्रवीणता पाहायची असेल तर भारतातील मंदिरांचीच मुलाखत घ्यावी लागेल.
विष्णु ही पोषण करणारी पालक देवता आहे. तिच्या हातात शंख व चक्र आहेत. शंख ध्वनि प्रेरक आहे आणि चक्र गतीसूचक आहे. कार्याचे पालन करू इच्छिणारा कार्यप्रमुख समग्र कार्यक्षेत्रात चक्राप्रमाणे फिरता असला पाहिजे. असाच शंखाप्रमाणे तेजस्वी विचारांचा उदघोष (द चा पाय) करून त्याने अन्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला पाहिजे.
शंकर हा संहारक देव आहे. त्याच्या हातात त्रिशूळ व डमरू आहे. त्रिशूळ हे संहाराचे प्रतीक आहार तर डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. संहार व संगीत स्वतःबरोबर बाळगणारा हा देव, महादेव गणला जातो. संहार किंवा मृत्यु ही काही भयंकर घटना नाही हे समजाविण्यासाठी भगवान शंकर स्मशानात राहतात. मृत्यु म्हणजे जीवाचे शिवाला भेटायला जाणे. भगवान शंकर डमरू हातात घेऊन संगीतासह सहर्ष सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभे असतात. विसर्जन एक महान संस्था आहे. तिचे कार्य देखील महान आहे. जुने जाणे व नवे निर्माण होणे हीच संसारात असलेली प्रवाह-नित्यता आहे.
अशा प्रकारची आगळी प्रतिभा असलेल्या दत्तांनी स्वतःच्या जीवनात अनेक लोकांना गुरू समजून त्यांचे गुण घेतले आहेत. ही त्यांची अतुलनीय नम्रता आहे. स्वमताग्रहाऐवजी गुणाग्राही बनलेला माणूस अनेक लोकांच्या अनुभवांना आत्मसात करून महान कार्य उभे करू शकतो, हे दत्त आपल्या आचरणाने समजावत आहेत.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments