श्री परम पूजनीय सद्गुरु तात्या महाराज Sadguru Tatya Maharaj - Swami Samarth


आयुष्य हे एक गूढ, अगम्य, अतक्र्य अशी गोष्ट आहे. मानवाला कसलाही अंदाज करता येऊ नये अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगामधून त्याला जावे लागते. नेमका मार्ग कोणता? व कोणत्या मार्गाने जावे? म्हणजे आपले सार्थक होईल, आपणास हवे ते प्राप्त होईल | असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उदभवत असतात. या सर्व विवंचनेत त्यांच्या मनास वेदना होत असतात. कोणाचे सहाय्य घ्यावे | कोण आपल्याला मदत करेल | आपले दुःख, आपल्या अडचणी कोण निवारण करील | किंवा यातून मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करेल | असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आलेले असतात. तो बेचैन होतो. आपले दुःख कोणाला सांगावे? कुणाला कळतील आपल्या वेदना | कोण जाणून घेईल आपले दुःख? अशा भयानक विंवचनेत तो सापडलेला असतो. आणि अशा नेमक्या वेळी त्याला परमेश्वराची आठवण होते. 

'सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी.' या उवती प्रमाणे तो परमेश्वराचा धावा करतो. हाच परमेश्वर आपले दुःख दूर करेल, तोच आपणला मार्ग दाखवेल कारण परमेश्वर हाच माऊली होय तीच आईच्या मायेने आपणावर पाखर घालेल, सहाय्य करेल हा दृढ विश्वास त्याच्या मनाला वाटत असतो. हळू हळू तो त्या परमेश्वर माऊलीच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतो. त्याची वाटचाल सुरू होते.

सद्गुरु तात्या महाराज ही अशाच परिस्थितीने आई वडिलांच्या गरिबीने शिक्षणाची झालेली ससेहोलपट कुटुंबात खाणारी तोंडे दहा आणि कमावणारे एकटे वडिल त्यामुळे खर्चाचा वाढता बोजा व मर्यादित उत्पन्न यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे एस. एस. सी. (मॕट्रिक) पास झालेले श्री तात्या महाराज कुठेतरी नोकरी मिळते का? या विचारात फिरत होते. फलटण येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी (जी. डी. सी अँड ए) हा कोर्स घेण्याचे ठरवले. फलटणाला जाऊन तो कोर्स घेतला. दुसर्या क्रमांकाने पास झाले. नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखतीला बोलावणे आले. मुलाखत दिली. अधिकार्याने विचारले कोणाचे पत्र (वशिला) आणला आहे का? नाही म्हणताच जावा म्हणून सांगितले व कमी गुण मिळालेल्या त्यांच्या मित्राला वशिल्यामुळे नोकरी मिळाली हे कळताच जिवाची घालमेल झाली. आणि ठरवले कि हे जग वशिलेबाजांचे आहे, 

वशिला लावला तर परमेश्वरालाच लावीन असा निश्चय केला व तडक गाणगापूर गाठण्याचे ठरले. आत्मिक शांतीसाठी साधना करणार्यांचे आवडते श्रध्दास्थान गाणगापूर. श्री तात्या महाराज गाणगापुरी आले. श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार इथली वाट फार अवघड होती, दुर्गम होती. पण मनांत सद्गुरुंची दाखविलेला आश्वासक प्रकाशमयी आवाज होता.

हजारो वर्षापासून रंजित, दुःखी कष्टी लोकांच्या व्याधी दूर करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनी भिमा, अमरजा नदीच्या संगमावर अवतार घेतला. येणारा, येताना भयग्रस्त असेल पण तिथून परत जाताना मात्र तो निर्भय होऊनच जाईल. जाताना चेहऱ्यावर आनंद घेऊनच जाईल मनातील सारे विचार, सारी दुःखे, वेदना, चिंता स्वच्छ होऊन निर्मळ अंतःकरणाने प्रसन्न होऊनच बाहेर पडण्याचे ठिकाण म्हणजे 'गाणगापूर' श्री तात्या महाराजांनी याच संगमावर उभे राहून प्रार्थना केली व साधनेला सुरुवात केली.

      श्री गाणगापूर येथे तप साधनेला सुरुवात झाली. सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी श्री गुरुचरित्र सारखा दुसरा ग्रंथ नाही. एका पायावर उभे राहून श्री गुरुचरित्राच्या पारायणास सुरुवात केली. भल्या पहाटे संगमावर स्नान करुन शरीर व मन शुचिर्भूत करायचे मनात श्री दत्तात्रयांच्या नामस्मरणाचा जप चालू ठेवायचा औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण सुरु करायचे अशी २१ पारायणे महाराजांनी तेथे केली. 

साक्षात सद्गुरु दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. समाजाचे 
कल्याण कर! असा आर्शिवाद दिला. मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तू कार्य करीत रहा तुला यश येत राहील! हा क्षण महाराजांच्या तापसी आयुष्यातील अमर झालेला क्षण! ज्याचे वर्णन शब्दाने करता येणार नाही असा हा क्षण आहे.

परोपकार करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनीही त्यांना तसाच आर्शिवाद देऊन उपकृत केले होते त्या आनंदाचा हा क्षण होता. सर्व काही योजल्या प्रमाणे घडले होते. प्राप्त झाले होते. श्री तात्या महाराजांना तो साक्षात्काराचा प्रसंग पुनःपुन्हा जसाच्या तसा डोक्यापुढे सारखा दिसत होता. हा प्रसंग केव्हा एकदा आईला सांगेन अशी ओढ निर्माण झालेली ती रात्र सतत आठवतच दिवस उजाडला. आई वडिल, प्रेमळ भावंडाचा सहवास केव्हा एकदा लाभतो आहे असे त्यांना झाले होते.

      घरी येताच सर्व अत्यानंदाने त्यांना केव्हा एकदा आईच्या चरण स्पर्शाने पुलकित होऊ असे झालेले. आईने धावत येवून त्यांना मिठीत घेतले. दोघांच्याही डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. वडीलांनाही त्यांना जवळ घेवून योग्य मार्ग हाताळातो आहेस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत अन सर्वांचे कल्याण करत राहा असा आर्शिवाद दिला.

      यानंतर मात्र श्री. तात्या महाराज पुरुषांच्या भटकंती नंतर दहिवली, ता. माण जि. सातारा येथे स्थिरावले. लोक उत्कंठेने प्रश्न विचारीत त्यांना समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान करत. दुःखीतांचे दुःख निवारण, रंजले- गांजलेल्यांना उपदेश देवून त्यांना आनंद देत असत. महाराज स्वतः विज्ञाननिष्ठ होते. भोंदूगिरीला त्यांचा विरोध असे. श्रध्दा ही हवीच जगण्यासाठी ती आवश्यकही असते पण, अंधश्रध्दा त्यांना अमान्यच होती. जात- धर्म- पंथ हे भेद त्यांना मान्य नव्हते. अनेक ईश्वर सेवा करण्यापेक्षा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले.

      महाराजांच्या मनामध्ये आता वेगळेच विचार सुरु झाले होते. योगी पुरुषांना कसलाही व कशाचाही मोह नसतो. अगदी स्वतःच्या शरीराचाही मोह नसतो. एकदा का परमानंदाची प्राप्ती झाली की मग देहासारख्या नश्वर गोष्टीचीही त्यांना फिकीर नव्हाती. हा देह एक दिवस जाणार आहे. एकेदिवशी श्री. तात्या महाराज आईंना म्हणाले, 'मी समाधी घेण्यास निघालो आहे' केवळ ३२ व्या वर्षी! मनाने एकदा वैराग्यवृत्ती धारण केली. सर्व सामानांच्या वयाच्या आणि सुखाच्या फूटपट्टया कशा निकामी ठरतात याचे हे एक सुंदर उदाहरण १९७१ या वर्षी हा समाधी योग होता व त्यानंतर ८६ वर्षानंतर तसा योग येणार होता आणि तोपर्यंत थांबण्याची त्यांच्या मनाची तयारी नव्हती.

     ८ जानेवारी १९७१ रोजी असलेल्या योगाप्रमाणे समाधी घेण्याचे निश्चित केले. ८ जानेवारीला आईला 'मी समाधी घ्यायला जातो आहे' असे तीन वेळा सांगितले. अगदी सावधपणे आणि आपल्या निश्चयाच्या दिशेने महाराजांची वाटचाल सुरु झाली. आता सद्गुरु हेच माझे गुरु, तेच काय ते ठरवतील असे म्हणून समाधी घेण्याचे त्यांनी निश्चित केले. आईनेही नेहमी मळ्यात समाधीला बसण्यास जातो त्याप्रमाणे आजही तो निघाला असेल असे समजुन तिनेही आनंदाने त्यांना निरोप दिला.

   ऐहिक अर्थाने जगाचा निरोप घेतला. नाशिवंत देह जाणार सकळ! हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. नेहमीसाठी हे शरीर संपवायचे या निश्चयानेच या अंतिम प्रवासावर त्यांनी शिक्का मोर्तब केले व ते मळ्यातील पर्णकुटीकडे चालू लागले. मळ्यातील पर्णकुटीत आले, कपडे काढून आत अडकवले व टॉवेल घेवून विहीरीवर आले आंघोळ केली. ओल्या अंगाने पर्णकुटीत आले. सद्गुरुंच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रार्थना पूर्वक सद्गुरुंचा विनवणी केली व अष्टांगयोग समाधीचे आसन (शवासन) घातले व डोक्याखाली दैनंदिनी घेऊन समाधी लावली. 

आपले अर्धेशरीर आपल्या हाताने संपवले व वडिलांना दृष्टांत दिला व दृष्टांतात सांगितले. वडिलांना ते भाऊ म्हणून संबोधतात! त्याप्रमाणे ते भाऊना दृष्टांतात म्हणाले, "भाऊ मी माझे उजवे शरीर संपवले आहे. उरलेले अर्धे (डावे शरीर) अग्नीला अर्पण करावे." वडील खडबडून जागे झाले. मुला-भावंडासह मळ्यात झोपडी जवळ आले. पर्णकुटीचे दार उघडले तर दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे उजवे शरीर नाशिवंत पावलेले. पित्याचे - भावंडांचे मन गलबलून गेले. भावंडांनी गहिवर घातला. आईंची अवस्था तर शब्दांच्याही पलिकडची. बघता बघता तिचा पुत्र काळाच्या पडद्याआड गेलेला. आता फक्त आठवणी आणि आठवणीच !

   आज जिथे महाराजांचे मंदिर आहे तीच श्री तात्या महाराजांची दहनभुमी आहे. तिथेच आता महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. लोक कल्याणार्थ समर्पित झालेल्या महानपुरुषाची ही कथा आहे व ऐकणार्यालाही ही सत्यकथा प्रेरणादायी आणि वाचवणार्यालाही प्रेरणादायी ठरते आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

Post a Comment

0 Comments

0