संत श्री कलावती आई


परमार्थात आईंनी नियमीत उपासनेला महत्त्व दिले आहे. आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो. निद्रादेवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्री हरी देखील आपली वाट बघत असतो म्हणून नियमीत आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामुहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे पटवून दिले.   दक्षिण कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर येथील श्री बाबूराव व पत्नी सीताबाई या परोपकारी, सत्यनिष्ठ, मेहनती व गुणी जोडप्याला लग्नाला आठ वर्षे झाली तरी संतती झाली नव्हती. इ.स. १९०७ मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने त्यांनी सहस्त्रलिंगार्चन केले, त्याच्या समाप्तीच्या म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी, त्या रात्री 'मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे' असा देवीने बाबुरावांना दृष्टान्त दिला आणि त्याची प्रचिती पुढे लवकरच आली आणि पुढे १९०८ च्या २ सप्टेंबर म्हणजे भाद्रपद शुक्ल पंचमी ऋषीपंचमी या शुभदिनी, ब्राम्ही मुहुर्तावर पहाटे ४.५५ ला कारवार येथे आईंचे अवतरण झाले. कारवार मधील मंजनाथ भट्ट या प्रसिद्ध ज्योतिषाने ही पत्रिका दुर्लभात दुर्लभ असून ही व्यक्ती बोलेल ते खरे होईल, लक्ष्मी व सरस्वती या दोघी आशीर्वाद देऊन हिच्या पाठीशी उभ्या राहतील असे भविष्य वर्तविले. या अवतारी मुलीचे नाव ठेवले 'रुक्माबाई' परंतू लाडाने हिला 'बाळ' म्हणून सर्वजण हाक मारत. शुक्ल चंद्राप्रमाणे बाळ वाढू लागली, तिचे असाधारणपण, वेगळे पण तेव्हापासून इतरांना जाणवू लागले. १० व्या महिन्यात चालायला लागली आणि पहिल्या वाढदिवसाला 'हरि' हाच तिने शब्द प्रथम उच्चारला. लहानपणापासून बाळ कडे सहनशक्ती, सोशिकता, शांतवृत्ती, दुसर्याला मदत करण्याची वृत्ती होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून बाळ मराठी, हिंदी, कानडी, गुजराथी भाषेतील भजने म्हणत असे, ती लहानपणापासून स्वयंसेवक होती, स्वतःची कामे स्वतः करत असे. 

देवपूजेची, देवाचे कौतुक/लाड करण्याची तिला लहानपणापासूनच आवड होती, म्हणून ती कीर्तन भजन करुन देवाचे गुणगान करत असे. त्याचप्रमाणे तिर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे, नदीकाठी वाळूची पिंड तयार करुन त्याचे पूजन करणे तिला आवडत असे. वयाच्या सातव्या वर्षी बाळला पूर्णानंद यतिराज भेटले आणि प्रसादरुपात कृष्ण दिला आणि तेव्हापासून बाळ हरीभजनात तल्लीन होत असे, बरोबरच्या मुलींमध्ये खेळणे आवडत नसे. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचा काळ हरीसेवेत, मनन अभ्यासात घालवला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी बाळ एकदम मोठी झाली या रुक्माबाईचे लग्न राजगोपाल यांच्याशी झाले. 

वर्हाड गावाला निघाले असता हुबळीत चार दिवस राहून वधु-वरांनी सिध्दारुढ महाराजांचे दर्शन घेतले, सेवा केली. रुक्माबाईंचा पाय हुबळीतुन निघेना परंतू राजगोपाल तुला प्रेम देतील व सद्गुरु योग्य वेळेला बोलावतील असे सांगून पाठवून दिले. पुढे सतराव्या आणि एकोणिसाव्या वर्षी रुक्माबाईंना दोन सुपुत्र झाले. परंतु नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांच्या पतीचे निधन झाले आणि मुलांचा त्याग करून रुक्माबाई गुरुचरणी निघून गेली. गुरुंची सेवा, अध्ययन, मनन, चिंतन चालू झाले, संसार विसरुन गेली. पुढे १९२८ साली ही रुक्माबाई सर्व कलात निपुण झाली म्हणून तिचे 'कलावती' हे नामकरण केले आणि दसर्याच्या शुभ मुहुर्तावर कीर्तन करण्याची गुरुआज्ञा दिली आणि  देशो देशी फिरून हरिनामाचा प्रसार करण्यास सांगितले, बारा वर्षाच्या तपानंतर कलावती बेळगाव मधील 'हरि मंदीरात' स्थिर झाल्या आणि त्या सर्व जगाच्या आई झाल्या. बारा वर्षे लोकांना उपदेश केला, भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हरिसेवेच्या सुपंथाचा मार्ग दाखविला. संसार करता करता परमार्थ कसा करायचा हे आईंनी जनाला शिकवले. 

परमार्थात आईंनी नियमीत उपासनेला महत्त्व दिले आहे. आपला आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो. निद्रादेवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्री हरी देखील आपली वाट बघत असतो म्हणून नियमीत आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामुहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे पटवून दिले. 'कलीयुगी नामःस्मरण सुलभ व श्रेष्ठ' आहे म्हणून नामस्मरणाचा मार्ग दाखविला. नाम घेतांना परमेश्वराचे स्मरण केल्यास ते त्याच्यापर्यंत पोहचते असे सांगितले आहे. नामःस्मरणाबरोबर कलीयुगात भजन मार्ग हा सोपा आहे, भजनाच्या माध्यमातून आपण लवकर तल्लीन होतो आणि ईश्वराशी समरुप होणे सोपे जाते म्हणून त्यांनी सातही वारांची आणि विविध उत्सवांची भजने तयार केली. यातील काही भजने सर्व संतांची असून काही रचना आईंनी स्वतः केल्या आहेत. 

सर्व भजनांना त्यांनी स्वतः चाली दिल्या आहेत. मुलांसाठी बालोपासना, प्रवासात देखील ईश्वराचे स्मरण व्हावे म्हणून नित्योपासना तयार केली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गोपाळकाला, सत्वशीलराजे, संतमेळा, सुबोधभान, त्रिवेणीसंगम अशी गोष्टीरुप पुस्तके लिहून प्रत्येक गोष्टीतून एक संस्कार, उपदेश दिला. श्रीकृष्णप्रताप, कथासुमनहार ही पुस्तके लिहली, सर्व संतांच्या आणि आपले गुरू श्री सिध्दारुढ स्वामी यांचे चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे उद्देश लोकांना समजण्यासाठी 'सिध्दारुढवैभव' हा ग्रंथ लिहीला. मनाला बोध करणारा, विषयासक्त मनाला अंतिम सत्य काय आहे, मनाने कसे वागावे हे सांगण्यासाठी आईंनी 'बोधामृत' हा ग्रंथ लिहून जनमुढांना खरे अमृत दिले आहे. आईंनी जी भजने लिहली, हरिस्तुती, नमस्काराष्टक, गुरुस्तुति, उपकाराष्टक लिहिली, त्याच्या मुद्रिका लिहीतांना कला, कलावंत, कलिमलदहन, रुक्मिणीरमणा अशा दिल्या आहेत. पुढे ८ फेब्रुवारी १९७८ रोजी बेळगाव येथे समाधी घेतली व आपले अवतार कार्य संपविले. परंतू आईंनी लाखोंच्या संख्येने भक्त समुदाय तयार केला आहे आणि आजही भक्तगण वाढत आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments