जगत् गुरु संत तुकाराम महाराज


तुकोबा निर्गुणाने कधीच रमले नाहीत. त्यांना सगुणांतच गोडी व आनंद वाटायचा. त्यामुळेच ते म्हणतात. आम्ही मोक्षपद तुच्छ मानले आहे कारण आम्हाला भगवत चिंतना करिता पत्येक युगांत जन्म घ्यायचा आहे. हरी विषयीचा हा भक्ती रस अविट आहे, आनंदरुप आहे. पुन्हा पुन्हा त्याचेच सेवन करावेसे वाटते. निर्गुण निराकार देवाला सगुण साकार होण्यास आम्हीच आमच्या भक्तीच्या बळावर भाग पाडले आहे. आता पुन्हा त्याला आम्ही निर्गुण-निराकार होऊ देणार नाही.


   
संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक निखळ भक्ती मार्गी संत होत. त्यांच्या जन्म शतकाबाबत एका वाक्यात इतिहासात आढळून येत नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीतल्या पुढील सर्वच प्रसंगातील घडामोडीच्या शतकांत फरक आढळुन येतो. परंतु त्यांचे निर्वाणाबाबत विशेष वाद नाही तरीहि थोडाफार फरक आढळून येतोच. रा. वि. ल. भावे यांच्या मते शके १५७१ फाल्गुन वद्य व्दितीया शनिवारी ते वैकुठांत गेले. तर रा. पांगारकरांचे मते १५७२ विकृतनाम संवत्सरे फाल्गुन वद्य व्दितीया सोमवारी त्यांचे प्रयाण झाले. शके बाबत दुमत असलं तरी तिथी बाबत एकवाक्यता आहे ही खरे तर भाग्याची गोष्ट आहे.

   तुकारामांचा जन्म पुण्याच्या उत्तरेस वीस मैल म्हणजे आजचे ३० किं.मी अंतरांवर देहू या गावी मोरे परिवारांत झाला. ते कुणबी असून त्यांचा किराणा व धान्य विक्रीचा व्यवसाय होता. त्यात ते व्यवस्थीत गुजराण करण्याइतपत भरपूर कमाई करीत असत. घराण्यांचे कुलदैवत पंढरीचा पांडुरंग हाच होता. त्यांचे पूर्वज विश्वभंर बुवा होत. त्यांच्या पत्नी आयाबाई यासुध्दा विठोबाच्या अनन्य भक्तच होत्या. तिचे दोन पुत्र हरि व मुकुंद लढाईत मारले गेले व त्यावेळी मुकुंदाची बायको सती गेली. हरीची बायको पतिनिधनकाळी गंर्भार होती. ती प्रसुत होऊन मुलगा झाला. त्याचे नावा विठोबा होते. या विठोबाचा मुलगा पदाजी त्या पदाजीचा मुलगा शंकर, शंकरचा-कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा व या बोल्होबाचा मुलगा म्हणजे तुकाराम महाराज होत. यामागील पिढीत पंढरपुरची वारी होती. या सर्व पूर्वजांचे परम पुण्याईने 'शुध्द बीजापोटी | फळे रसाळ गोमटी | ह्या न्यायाने मोर्यांच्या सर्व वंशाचा उध्दार करुन तिन्ही लोकी आपल्या सत्कीर्ती झेंडा मिरविणारा सत्पुत्र बोल्होबास कनकाईच्या पोटी झाला |


   संत तुकाराम महाराजांचे चित्ती पांडुरंगांची मूर्ती ठसली होती. त्यातच आलेल्या दुष्काळामुळे द्रव्य व व्यवसाय प्रतिष्ठा यांचे वाटोळे होऊन पहिली बायको राखमाई अन्नाला दशा होऊन मेली. दुसरी बायको अवलाई ऊर्फ जीजाबाई ही कर्कशा होती. या सर्व आपत्ती वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांचेवर येऊ न पडल्या त्यामुळे त्यांचे मन संसाराविषयी उदास झाले. सामान्य मनुष्य खचला असता पण तुकोबांनी या आपत्तीचा उपयोग आत्मकार्याकडे करुन घेतला. अशा गोष्टी प्रभूची इच्छा म्हणून 'बरे देवा निघाले दिवाळे' या अभंगात ते म्हणतात. त्याच सुमारास तुकोबांना पांडुरंग व नामदेवांनी स्वप्नामधे दर्शन देऊन त्यांना आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यास सांगितली.


   तुकोबांनी आपली परमार्थ बुध्दी दृढ करण्यासाठी विठ्ठल मंदिराचा जिर्णोध्दार करावयास प्रारंभ केला. एकादशी व्रत धरले, कीर्तन करण्यास सुरुवात केली. संसाराचा वीट आल्याने आप्त स्वकियांच्या कान गोष्टी कडे दुःर्लक्ष करुन, चिती एक रखुमाईचा पति' धरिला. या सर्व साधनेमुळे त्यांची देहबुध्दी नाहीशी होऊन आत्मबुध्दीकडे ते वाटचाल करु लागले. बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात "रामकृष्ण हरि," हा आवडीचा सोपा मंत्र दिला. मंत्र प्राप्त होताच ते आनंदले व भंडारा डोंगरावर एकांतात जावून बसू लागले. त्यांना ज्ञान प्राप्त झाली.


   तुकोबा स्थितप्रज्ञ झाले. कनक आणि कांता यांचा मोह त्यांनी जिंकला. आता जिंकण्यासारखे जगात काहीच उरले नव्हते. पण कांता म्हणजे परस्त्री लोभ पातक समजल्या जाते, पण स्व स्त्री लोभ अनर्थावहच असतो. त्यांची दुसरी पत्नी जीजाबाई ही कर्कशा होती. तरी पण ती पतिव्रता होती. तुकोबांना जेवू घातल्याशिवाय आपण अन्नग्रहण करत नसे. जेवणाची शिदोरी घेऊन ती तुकोबासाठी रानमाळ भटकत असे. अशी ही पतिव्रता, म्हणून जीजाई व तुकोबांचे भांडण होते. ते प्रवृति व निवृती ह्यांच्या भांडणासारखे होते.


   तुकोबा पूर्णपणे कर्मयोगी होते. सर्वत्र निरपेक्ष वृत्तीत ते वावरत. त्यांच्या या पांडुरंग भक्तीवर प्रसन्न होऊन शिवरायांनी त्यांना नजराणा पाठविला होता. तुकोबांनी तो परत केला त्यांना फार वाईट वाटले. ते तडक विठोबा कडे गेले व म्हणाले, "बा विठोबा ! तुझी ही खोड बरी नव्हे." असली चिरीमिरी देऊन तू मला वाटेला लावणार असशील तर याद राख ! मी तुझ्या पायाला घट्ट मिठी मारुन बसलेलो आहे.

   तुकोबांना आध्यात्मात परमार्थात असलेला ढोगीपण अजिबात सहन होत नसे. ते म्हणजे एक परखड गाथाच होते.

   वेदांचे खरे रहस्य आम्हालाच ठाऊक आहे. बाकीचे वैदिक म्हणजे वेद पठण करणारे भारावाहक (हमाल) आहेत. ज्याप्रमाणे धनाचा हंडा घेऊन जाणार्या मजूरास आतील धनाचा लाभ होत नाही. तसेच हे आहे. परंतु आमचे हातात या सर्व वेदांचे मूळ असा जो पाडुंरंग तोच आमच्या हाती लागल्यामुळे आमच्या हाती सर्व फळासह निधान लागले आहे. त्याचे दृष्टीने वेदांचे सार म्हणजे नाम होय.


    तुकोबा निर्गुणाने कधीच रमले नाहीत. त्यांना सगुणांतच गोडी व आनंद वाटायचा. त्यामुळेच ते म्हणतात. आम्ही मोक्षपद तुच्छ मानले आहे कारण आम्हाला भगवत चिंतना करिता प्रत्येक युगांत जन्म घ्यायचा आहे. हरी विषयीचा हा भक्ति रस अविट आहे, आनंदरुप आहे. पुन्हा पुन्हा त्याचेच सेवन करावेसे वाटते. निर्गुण निराकार देवाला सगुण साकार होण्यास आम्हीच आमच्या भक्तीच्या बळावर भाग पाडले आहे. आता पुन्हा त्याला आम्ही निर्गुण-निराकार होऊ देणार नाही.


                           (तुकाराम गाथा)

                        जयजय रामकृष्ण हरि

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments